डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वी शॉ या मुंबईच्या क्रिकेटपटूला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही कारवाई केली आहे.
पृथ्वीवर ही बंदी फेब्रुवारी महिन्यापासूनच पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्याच्यावर ती लागू असेल.
22 फेब्रुवारी 2019 ला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान इंदोरमध्ये BCCIच्या डोपिंगविरोधी धोरणाचा भाग म्हणून पृथ्वीची युरीन टेस्ट घेण्यात आली होती. या तपासणीमध्ये त्याच्या शरीरात टर्ब्यूटालाईन आढळून आलं, असं BCCIने एका पत्रकात सांगितलं.
टर्ब्यूटालाईन हा कोणत्याही कफ सिरपमध्ये सर्वसाधारपणे आढळणारा पदार्थ आहे. हा पदार्थ जागतिक तसंच देशांतर्गत स्पर्धांमध्ये वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच WADAच्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीमध्ये आहे.
पृथ्वीने हा पदार्थ निष्काळजीपणे घेतल्याचं BCCI ने म्हटलं आहे. पृथ्वी शॉने मात्र हे आरोप स्वीकारताना, आपल्याला खोकला असताना कफ सिरप घेतल्यामुळे नकळतपणे हे आपल्या शरीरात गेल्याचं सांगितलं आहे.
घशाच्या इन्फेक्शनमुळेच त्याने औषध घेतलं होतं. परफॉर्मन्समध्ये वाढ करण्यासाठी ते घेण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण पृथ्वीने दिलं.
BCCIने पुरावे तपासले आणि हे त्याने हेतूपुरस्सरपणे केलं नसल्याचं निदर्शनास आलं. पण त्याने याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली, अशी माहिती BCCIने या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
16 जुलै रोजी पृथ्वी शॉ याच्यावर अँटी डोपिंग रूल व्हायोलेशन (ADRV) चे आरोप लावण्यात आले. अखेरीस BCCIच्या अँटीडोपिंग नियमांमध्ये कलम 2.1 अंतर्गत त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.
पृथ्वी शॉसोबतच विदर्भ संघाचा अक्षय दुल्लरवार याच्यावर आठ महिने तर राजस्थानचा दिव्य गजराज याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे, असं बीसीसीआयने कळवलं आहे.