Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन वाझेः वरुण सरदेसाईंना वाचवण्यासाठी सचिन वाझेंची पाठराखण?- नितेश राणे

सचिन वाझेः वरुण सरदेसाईंना वाचवण्यासाठी सचिन वाझेंची पाठराखण?- नितेश राणे
, सोमवार, 15 मार्च 2021 (17:04 IST)
सचिन वाझे यांना अटक आणि निलंबित केल्यानंतर आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षानं आज या प्रकरणी नवे आरोप केले आहेत.
भाजपचे नेते नितेश राणे, राम कदम यांनी आज नवे आरोप उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र सरकार काही बडे नेते आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केले आहेत असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. त्याचप्रमाणे नितेश राणे यांनीही शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत.
वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात काय संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासावेत अशी मागणी आदार नितेश राणे यांनी केली आहे. वाझे यांच्याबरोबर शिवसेना नेत्याचे टेलिग्राम चॅटही आहेत अशी माहिती राणे यांनी दिली आणि ते तपासण्याची मागणीही राणे यांनी केली.
नितेश राणे म्हणाले, 'एका पोलीस अधिकाऱ्याच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते, सामनाचे संपादक पुढे येतात तेव्हा त्यामागे काही कारणे आहेत.' तसेच, 'काय आहे असं सचिन वाझेकडे की त्यासाठी या लोकांना सगळं पणाला लावावं वाटतं?' असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला.
नितेश राणे यावेळेस म्हणाले, 'गेल्या वर्षी आयपीएल खेळलं गेलं. त्या टुर्नामेंटअगोदर बेटिंगचं रॅकेट मुंबईत चालतं. काही लोक फ्लॅटमध्ये, हॉटेलमधून करतात. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझेचे फोन जातात. आणि त्यांना सांगितलं जातं.
तुम्ही जे करत आहात ते सगळं आम्हाला माहिती आहे. मग ते लोक घाबरल्यावर तुमची अटक, छापे टाळायचे असतील तर दीडशे कोटी रुपये द्या अशी मागणी केली जायची. ती पूर्णपणे माझ्याकडे पोहोचवा किंवा मी छापे मारेन असं सांगितलं जायचं. तुमची बदनामी, अटक करू अशी धमकी दिली गेली.
नितेश राणे पुढे म्हणाले, 'अशी रक्कम मागितली गेल्यावर वाझेंना एका व्यक्तीचा फोन जायचा. तू इतकी रक्कम मागितली आहेस, त्यात आमचे किती, आम्हाला किती देणार असं संभाषण केलं जायचं. ही व्यक्ती कोण? विधिमंडळात मी ज्याचं नाव घेतलं, त्याला वाय प्लस संरक्षण दिलेलं आहे, पालिकेच्या सर्व टेंडरमध्ये ज्याचं नाव आहे अशा वरुण सरदेसाईचं वाझेशी हे संभाषण झालं होतं. हा सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे, तो कोणाच्या आशीर्वादाने फोन करायचा, त्याला कोणी अधिकार दिले? ही सगळी चौकशी झाली पाहिजे. वाझेचे आणि सरदेसाईचं भाषण तपासलं पाहिजे. वरुण सरदेसाईचा सीडीआर काढा, या महिन्यात त्या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाले होते का हे चौकशीतून उघड होईल.'
'वाझेचा गॉडफादर, मायबाप कोण चौकशीशिवाय बाहेर येणार नाही. हा माणूस इतका महत्त्वाचा आहे, त्याला मुख्यमंत्री, सामनाचे संपादक का मदत करतात हे यातून स्पष्ट होईल. कोरोनाच्या काळात वाझे आणि ख्वाजा युनूससंदर्भातील चार लोकांनाच पुन्हा सेवेत का घेतलं? हे तपासायला हवं' असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.
सचिन वाझे कोण आहेत?
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.
 
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
 
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
 
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
 
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.
स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.
मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन वाझे अटक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं मौन सोयीचं की अडचणीचं?