Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरुख खान : 'किंग ऑफ रोमान्स'च्या आयुष्यातल्या या 55 रंजक गोष्टी

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (10:21 IST)
वंदना
बॉलिवुडच्या 'किंग खान'चा आज वाढदिवस आहे. गेली 29 वर्षं शाहरुख खाननं रूपेरी पडद्यावरून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रोमान्स म्हणजे शाहरूख खान, असं समीकरणच अनेकांच्या मनात बसलं आहे. अनेकांना त्याची कहाणी तशी माहिती आहेच. पण बॉलिवूडच्या या बादशहाच्या आयुष्यातल्या या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या का?
 
1. शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 ला ताज मोहम्मद खान आणि लतीफ फातिमा यांच्या कुटुंबात झाला. सुरुवातीची पाच वर्षं तो आपल्या आजीजवळ मंगळुरूमध्ये आणि नंतर बेंगलुरूमध्ये वाढला.
 
2. शाहरुखची आई मूळ हैदराबादची होती. वडील वकील आणि मूळचे पेशावरचे होते.
 
3. शाहरुखचे आजोबा इफ्तेकार काश्मीरचे होते आणि मंगळुरू बंदरात मुख्य अभियंता होते. मंगळुरूमधल्या ज्या हार्बर हाउसमध्ये शाहरुख रहायचा ते आता एका पर्यटनस्थळ झालं आहे.
4. त्यानंतर शाहरुख दिल्लीत लहानाचा मोठा झाला. सेंट कोलंबा शाळेत शिकताना तो खेळात कायमच पुढे होता. हंसराज कॉलेजमधून त्याने अर्थशास्त्रात बी. ए. केलं आणि मास कम्युनिकेशनमध्ये एम. ए. करायला जामिया मिलीया इस्लामियात प्रवेश घेतला, पण ते शिक्षण पूर्ण केलं नाही.
5. फुटबॉल खेळताना एकदा जखमी झाल्यानंतर दिग्दर्शक बॅरी जॉन्सन यांनी शाहरुखला आपल्या एका नाटकासाठी ऑडिशन द्यायला सांगितलं. त्या नाटकात शाहरुख मुख्य डान्सर होता आणि त्याला एक डायलॉगही मिळाला. बॅरी जॉन्सनना शाहरुखचं गाणंही खूप आवडलं होतं.
 
6. शाहरुख 15 वर्षांचा असताना त्याचे वडील कॅन्सरने वारले. तरुण वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यानं त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. पुढे जाऊन ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविरुद्ध निवडणुकीत उभे राहिले आणि हरले. त्यांनी अनेक व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नही केले.
 
7. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी शाहरुखचं जवळचं नातं होतं. 1974 पर्यंत तिथली खानावळ त्याचे वडील चालवायचे आणि शाहरुख त्यांना सोबत करायचा. रोहिणी हट्टंगडी, सुरेखा सिक्री, रघुवीर यादव आणि राज बब्बरसारख्या बड्या अभिनेत्यांना त्यानं तिथं काम करतांना पाहिलं. इब्राहिम अलकाझींबरोबर 'सूरज' आणि 'सातवा घोडा' यासारख्या नाटकांच्या तालमी बघताना त्याची नाटक आणि सिनेमाशी तोंडओळख झाली.
8. पंकज उधासच्या एका कार्यक्रमात कार्यकर्ता म्हणून काम करताना मिळालेलं पन्नास रुपये मानधन ही शाहरुखची पहिली कमाई होती. या पैशांतून शाहरुख ट्रेननं आग्र्याला गेला.
 
9. 1988 साली लेख टंडन यांनी शाहरुखला हेरलं आणि 'दिल दरिया' या सीरियलमध्ये काम दिलं. पण त्यांची एक अट होती - शाहरुखनं आपले लांब केस कापावे.
 
10. पण, टीव्हीवर शाहरुखची पहिली सीरियल आली ती कर्नल कपूर दिग्दर्शित 'फौजी' (1989). कर्नल कपूर यांनी काही मुलांना ऑडिशनसाठी बोलवलं होतं. ते त्यांना धावायला घेऊन गेले आणि त्यातले थोडेच तरुण परत आले. शाहरुख त्यांच्यापैकी एक होता.
11. लहान असताना शाहरुखला सैन्यात भरती व्हायचं होतं. त्यानं कलकत्त्याच्या सैनिकी शाळेत प्रवेशही घेतला होता. पण त्याच्या आईला हे मान्य नव्हतं.
 
12. शाहरुख आणि त्याच्या शाळेतल्या चार मित्रांची एक 'सीगँग' होती. त्यांचा स्वतःचा एक लोगोसुद्धा होता. सरदार गँग, P.L.O. गँग सारख्या इतर गँग्सना शाहरुखचं हे उत्तर होतं. पुढे जाऊन 'जोश' चित्रपटात शाहरुखने एका गँगच्या म्होरक्याचा रोल केला होता.
13. जेव्हा शाहरुख गौरी छिब्बाला भेटला तेव्हा ती शाळेत होती. तिचे वडील लष्करात होते. एका डान्स पार्टीत या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर हा रोमॅन्स बहरत गेला.
 
एकदा गौरी तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला मुंबईला गेली तेव्हा शाहरुख तिच्या पाठोपाठ गेला, तिचा कुठलाही ठावठिकाणा माहीत नसताना! तिला पोहायला आवडतं हे ठाऊक असल्यानं शाहरुख मुंबईच्या सगळ्या बीचवर गेला आणि अखेर एका बीचवर त्याला गौरी भेटली.
 
या सगळ्यांत त्याला एक रात्र रेल्वे स्टेशनवरही काढावी लागली. 25 ऑक्टोबर 1991 ला शाहरुख-गौरी लग्नाच्या बेडीत अडकले.
14. त्याची आणि गौरीची पहिली भेट झाली तो दिवस शाहरुखला आजही आठवतो - 09/09/1984. त्याच दिवशी त्याला ड्रायव्हिंग लायसन्सही मिळालं होतं.
 
15. 'वागले की दुनिया', 'दुसरा केवल' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर शाहरुखला मोठा ब्रेक मिळाला तो रेणुका शहाणेबरोबर 1989-90 मध्ये आलेल्या 'सर्कस' या मालिकेत.
 
शाहरुखची आई त्यावेळी खूप आजारी होती आणि दिल्लीच्या बत्रा हॉस्पिटलमध्ये होती. त्यांना सर्कसचा एपिसोड दाखवण्यासाठी विशेष परवानगी काढण्यात आली, पण त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्या शाहरुखला ओळखूही शकत नव्हत्या.
एप्रिल 1991 मध्ये त्यांचं निधन झालं. आईच्या निधनानंतर ते दुःख विसरण्यासाठी शाहरुख मुंबईत आला आणि मग त्यानं मागे वळून पाहिलंच नाही.
 
16. 1991 साली शाहरुखनं मणी कौलच्या 'इडियट' या सिनेमात खलनायकाचं काम केलं. पण तो पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला होता तो प्रदिप किशन आणि अरुंधती रॉय यांच्या 'इन विच अॅनी गिव्हस् इट दोस वन्स' या चित्रपटात. पण त्यातला त्याचा रोल नंतर कापण्यात आला.
17. 1991 सालीच शाहरुखला हेमा मालिनींबरोबर 'दिल आशना है' हा त्याचा पहिला चित्रपट मिळाला. पण 25 जून 1992 रोजी 'दिवाना' रिलीज झाला आणि नायकाच्या भूमिकेत तो पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला.
 
18. शाहरुखची गाणी आठवलीत तर त्यातला हात पसरुन उभा असलेला शाहरुख लगेच आपल्या डोळ्यांपुढे उभा राहतो. पण, याच शाहरुखला सगळ्यांत मोठी भीती याची वाटते की कुणीतरी त्याचे हात कापून टाकेल.
 
19. त्याच्या शाळेचे प्रमुख ब्रदर डिसूझा यांना तो आपला मार्गदर्शक मानतो. तारुण्यात लक्ष्य एकवटण्यात त्यांनीच आपल्याला मदत केली, असं तो सांगतो.
20. 'राहुल, नाम तो सुना होगा' हे वाक्य ऐकलं की फक्त शाहरुखच डोळ्यापुढे उभा राहतो. 'डर', 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', 'जमाना दिवाना', 'यस बॉस', 'कभी खुशी कभी गम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' अशा किमान 9 चित्रपटांत शाहरुख राहुल बनून प्रेक्षकांसमोर आला आहे.
 
21. शाहरुखला 'राज' हे नावंही अनेकदा मिळालं. 'राजू बन गया जेंटलमॅन', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'मोहब्बतें', 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटांतून तो राज म्हणून प्रेक्षकांपुढे आला.
 
22. 'बाजीगर', 'डर', 'अंजाम', 'दिल से', 'राम जाने', 'डुप्लीकेट', 'देवदास', 'शक्ती', 'कल हो ना हो', 'ओम शांती ओम' आणि 'रा वन' या चित्रपटांतला समान दुवा काय आहे?
 
या सगळ्या चित्रपटांत शाहरूखच्या पात्राचा मृत्यू होतो. 'करन-अर्जून'मध्ये तर त्याच्या आणि सलमानच्या पात्रांचा पुनर्जन्म होतो.
 
23. शाहरुख वर्कोहॉलिक म्हणून ओळखला जातो. तो दिवसातले फक्त 4-5 तास झोपतो. आयुष्य झोपेत घालवण्यासाठी नसतं, असं तो सांगतो.
24. अभिनय म्हणजे काय, यावर शाहरुख आपल्या मुलीसाठी एक पुस्तकही लिहीत आहे. अनुपम खेरच्या एका कार्यक्रमात शाहरुखनं त्या पुस्तकाचं नाव साागितलं होतं- 'टू सुहाना, ऑन अॅक्टिंग फ्रॉम पापा'.
 
आपल्या मुलीला अभिनेत्री झालेलं पाहायला आवडेल, असंही शाहरुख म्हणाला होता. शाहरुख स्वतःच्या आयुष्यावरही गेलं दशकभर एक पुस्तक लिहीतो आहे. निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आग्रहाखातर शाहरुखनं हे लिखाण सुरू केलं होतं.
 
25. शाहरुखच्या परिवारात त्याची मोठी बहीण लालारुख सुद्धा आहे. तीनं एम. ए., एल. एल. बी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. पण तिची प्रकृती बरी नसते.
 
26. शाहरुख आणि सलमान यांनी 1996 साली 'दुश्मन दुनिया का' या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. मेहमूद यांनी दिग्दर्शित केलेला तो शेवटचा चित्रपट होता.
27. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', अर्थात 'DDLJ' च्या नॅरेशनच्या वेळी सगळ्या क्रूला असंच वाटत होतं की शाहरुखनं तो चित्रपट करायला नकार दिला आहे.
 
शाहरुख त्यावेळी रोमॅन्टिक चित्रपट करण्याच्या विचारात नव्हता. म्हणून मुख्य भूमिकेत सैफ अली खानला घेण्याचाही विचार होता.
 
पण, शाहरुखनं अखेर होकार दिला आणि आपल्या पात्राला अधिक "मर्दानगी" देण्यासाठी मारामारीचे सीन घालायला सांगितले.
 
28. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 'DDLJ' चा शूट करायला नकार दिल्यानंतर शाहरुखनं आपल्या अस्सल हरयाणवी बोलीत शेतकऱ्यांना राजी केलं. आणि 'तुझे देखा तो ये जाना सनम'चं शूटिंग झालं. 'DDLJ'चं शुटिंग सुरू असतानाच शाहरुख 'त्रिमूर्ती' साठीही शूट करत होता.
29. 'जोश' चित्रपटातलं 'अपुन बोला, तू मेरी लैला' हे गाणं शाहरुखनं स्वतः गायलं आहे.
 
30. तारुण्यात शाहरुखला कुमार गौरवला भेटायची इच्छा होती, कारण आपण त्याच्यासारखे दिसतो, असं त्याला वाटायचं.
 
31. शाहरुखची पहिली 'फॅन मोमेंट' तो 'फौजी'मध्ये काम करत असताना घडला. दिल्लीच्या पंचशील परिसरातून तो जात असताना दोन महिला ओरडल्या "ए तो बघ अभिमन्यू राय". हे त्याचं सीरियलमधलं नाव होतं.
 
32. शाहरुखचा पेशावरशी जवळचा संबंध आहे. 1978-79 साली तो पेशावरला गेला होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याची चुलत बहीण नूर जहाँने सांगितलं होतं, "आपण ज्या खोलीत बसलोय तिथंच शाहरुख झोपला होता. इथं येऊन त्याला खूप आनंद झाला होता. तो पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या नातलगांना भेटला होता. भारतात फक्त त्याच्या आईचे नातेवाईक आहेत."
33. सुरुवातीच्या काळात त्याच्या 'गाजलेल्या भूमिकांपैकी' एक म्हणजे छाब्रा रामलीलेत त्यानं केलेली भूमिका. त्यात शाहरुख चक्क वानरसेनेत होता. "सियापती रामचंद्र की..." अशी घोषणा झाल्यावर "जय" म्हणण्याचं काम शाहरुखचं होतं. रामलीलेदरम्यान मधल्या सुटीत शाहरुख उर्दू कविता ऐकवायचा आणि लोक त्याला एक रुपया बक्षीस द्यायचे.
 
34. चाहत्यांचा गराडा टाळण्यासाठी शाहरुखनं एकदा चक्क कारच्या डिक्कीतून प्रवास केला होता.
 
35. लॉस अँजेलिसमधल्या एका कार्यक्रमाच्यावेळी मडोना आल्यानंतर शाहरुख चक्क 'छैया छैया'च्या स्टेप्स विसरला होता.
 
36. 'आमिर, सलमान आणि शाहरुख' नावाच्या एका विनोदी चित्रपटात तिन्ही खानांच्या डुप्लिकेट्सनी काम केलं आहे.
 
बॉलिवूडचे तिन्ही खान 1965 मध्येच जन्माला आलेत - आमिर मार्चमध्ये, शाहरुख नोव्हेंबरमध्ये आणि सलमान डिसेंबरमध्ये.
37. 1993 मध्ये शाहरुख, आमिर आणि सैफ अली खान यांनी 'पेहला नशा' या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केलं होतं. आशुतोष गोवारीकरच्या या पहिल्या चित्रपटात जुही चावला आणि राहुल रॉयसुद्धा होते. शाहरुख आणि आमिर एकाच वेळी पडद्यावर दिसण्याचा हा एकमेव प्रसंग असावा.
 
38. शाहरुखच्या आजी-आजोबांचं बंगलुरूमधलं घर अभिनेता मेहमूद यांच्या घराशेजारी होतं.
 
39. आज पन्नाशीतही शाहरुखला खेळण्यांचं वेड आहे. त्याला हॉकी आणि फूटबॉलची आवड आहे. 'चक दे इंडिया'मधून तो भारतीय महिला हॉकी संघाचा कोच होता तर 'कभी अलविदा ना कहना' मध्ये तो फूटबॉल खेळताना दिसत आहे. शिवाय IPLच्या कोलकाता नाईट राइडर्स टीमचा 'किंग खान' मालक आहे.
 
40. शाहरुखचे वडील घरात पंजाबी भाषेतली 'हिंदको' ही बोली बोलायचे. हिंदको पाकिस्तानात बोलली जाते.
 
41. आपला पहिला 'टेड टॉक' शाहरुखनं 2017 साली व्हॅनकुवर मध्ये दिला. टेड आपला 'नयी सोच' नावाचा हिंदी शो शाहरुख खानला घेऊन सुरू करत आहे.
42. प्रीटी झिंटाच्या 'अप क्लोज अँड पर्सनल विथ पीझी' या चॅटशोमध्ये शाहरुखनं उच्चारलेला पहिला शब्द 'चंपा' होता, असं सांगितलं होतं. चंपा नावाची एक स्त्री त्यांच्या घराजवळ राहायची.
 
43. शाळेत असताना शाहरुखचं हिंदी कच्चं होतं. एकदा जेव्हा त्याला 10 पैकी 10 मार्क मिळाले तेव्हा त्याची आई त्याला देव आनंदचा 'जोशीला' हा चित्रपट पहायला 'विवेक' सिनेमात घेऊन गेली.
 
44. त्याच्या जन्मानंतर त्याला एक चांदीची वाटी भेट मिळाली होती.
 
45. तुम्ही गुगलवर 'Did Shahrukh...' असं टाईप केलं तर 'Did Shahrukh die' (शाहरुखचा मृत्यू झाला का?), 'Did Shahrukh help Peshawar?' (शाहरुखने पेशावरसाठी मदत केली का?), 'Did Shahrukh pass IIT exams' 'शाहरुख आय. आय. टी. ची परिक्षा पास झाला होता का', 'Did Shahrukh win national award' 'शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार मिळालं आहे का', असे रिजल्ट मिळतील.
46. चित्रपटात घोडेस्वारी करताना आणि किस करताना शाहरुखला अवघडल्यासारखं वाटतं. शाहरुखनं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्याचं आणि त्याच्या बहिणीचं नाव त्याच्या वडिलांकडे असणाऱ्या घोड्यांवरून ठेवलं होतं.
 
47. 1998 साली जेव्हा शाहरुखला 'झी सिने अवॉर्ड' मिळाला तेव्हा शाहरुखनं सलमानला स्टेजवर बोलवलं आणि म्हणाला, "मी ज्या सद्गृहस्थाला स्टेजवर बोलवणार आहे तो माझ्या वतीनं सगळ्यांचे आभार मानणार आहे, कारण त्याला नेहमी असं वाटतं की मला सगळे पुरस्कार मिळतात आणि त्याला कुठलेच मिळत नाहीत."
48. शाहरुखच्या नावे चंद्रावरही एक क्रेटर अर्थात एक विवर आहे. खरंच! ही गम्मत नाही! 'लुनार रिपब्लिक सोसायटी'च्या माध्यमातून शाहरुखचा एक फॅन दरवर्षी चंद्रावरचा एक तुकडा त्याच्या नावे विकत घेतो. तुम्ही तिथे 40 एकरपर्यंत जमीन विकत घेऊ शकता. यातून जमा होणारा पैसा 'लुनार रिपब्लिक सोसायटी'च्या मानवी शोधमोहीमेत आणि वसाहत विकासाच्या कामी खर्च केला जातो.
 
49. इंग्लंडमधल्या 'नाईटहूड'च्या बरोबरीचा एक मलेशियन सन्मान मिळवणारा शाहरुख हा पहिला भारतीय सिनेकलाकार आहे. 2005 साली भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि 2014 साली फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान 'लिजन ऑफ ऑनर' शाहरुखला मिळाला. एडिनबऱ्हा विद्यापीठानंही त्याला मानद डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केलं.
 
50. 2004 साली टाईम मॅगझिनच्या 'आशियातल्या 40 वर्षाखालचे हिरो' या अंकात शाहरुख कव्हरवर झळकला.
51. 2008 साली 'न्यूजवीक' मॅगझिननं जगातल्या सर्वाधिक प्रभावशाली 50 लोकांच्या यादीत शाहरुखला 41वं स्थान दिलं. बराक ओबामा यात सगळ्यांत वरच्या स्थानावर होते.
 
शाहरुख व्यतिरिक्त या यादीत सोनिया गांधी या एकमेव भारतीय 17व्या स्थानी होत्या.
 
52. फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या जगातल्या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख 8 व्या क्रमांकावर आहे.
 
53. अनेक वर्षांपूर्वी एका मासिकामध्ये छापून आलेल्या एका लेखामुळे रागाच्या भरात त्य़ा मासिकाच्या ऑफिसमध्ये जात आपण शिवीगाळ केल्याचं शाहरुखने कबूल केलं.
 
त्या मासिकाच्या संपादकाने तक्रार केल्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांना एक दिवस कोठडीत घालवाला लागला.
 
54. 1993मध्ये आलेल्या 'माया मेमसाब' सिनेमात शाहरुखला चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या बायकोसोबतच एक प्रणयदृश्य चित्रित करायचं होतं. दिग्दर्शक केतन मेहता यांनी एकमेकांची ओळख व्हावी आणि प्रणय दृश्य शूट करता यावं म्हणून शाहरूखला त्यांची पत्नी दीपा साहीसोबत एक रात्र घालवायला सांगितली होती, असं 'सिने ब्लिट्झ' मासिकात छापून आलं होतं.
 
हा लेख वाचून शाहरुखला राग आला आणि त्याने या मासिकाच्या कार्यालयात जात हा लेख लिहिणाऱ्याला जीवे मारायची धमकी दिली होती.
 
55. शाहरुख त्यांच्या मुलांसाठी अनेकदा जेवण बनवतात. मुलांसाठी सध्या आपण पदार्थ बनवायला शिकत असल्याचं शाहरुखनं सांगितलं. रात्री दोन वा तीन वाजता मुलांना भूक लागल्यावर त्यांच्यासाठी आपण खायला करत असल्याचं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments