जेव्हा शाहरुख खानला पोलिस कोठडीत रात्र घालवावी लागली होती...

बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (11:00 IST)
आपल्या प्रत्येक फिल्मधून शाहरुख खान हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतोच. पण नेटफ्लिक्सवरच्या डेव्हिड लेटरमन शोमध्ये ही गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली.
 
या शोचं नावच 'माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इन्ट्रोडक्शन विथ डेव्हिड लेटरमन' असं आहे.
 
स्वतःबद्दल, स्वतःचं कुटुंब, करियर आणि मुलांबद्दल शाहरुखने या इंटरव्ह्यूमध्ये दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत.
 
स्वयंपाकघरात जेवण बनवणारा शाहरुख या मुलाखतीमधून पहिल्यांदाच त्याच्या फॅन्सना पहायला मिळाला.
 
जेव्हा शाहरूख तुरुंगात गेला होता...
अनेक वर्षांपूर्वी एका मासिकामध्ये छापून आलेल्या एका लेखाचा उल्लेख करत डेव्हिड लेटरमन यांनी शाहरुखला त्याच्या तुरुंगवारीबद्दल विचारलं. शाहरुखने सांगितलं, की हा लेख छापून आल्यानंतर नाराज होऊन रागातच त्याने या मासिकाच्या संपादकांना फोन लावला. यावर 'ही चेष्टा असल्याची' सारवासारव या संपादकाने केली.
 
पण रागाच्या भरात त्य़ा मासिकाच्या ऑफिसमध्ये जात आपण शिवीगाळ केल्याचं शाहरुखने कबूल केलं.
 
यानंतर एका फिल्मचं शूटिंग सुरू असताना पोलिस सेटवर आले आणि त्यांनी शाहरुखला सोबत यायला सांगितलं. गंमत म्हणजे सुरुवातीला शाहरुखला हे पोलिस आपले फॅन्स असून आपल्याला भेटायला आल्याचं वाटलं होतं. म्हणूनच त्याने त्यांना आपल्या कारमध्येही बसायला सांगितलं.
 
पण त्या मासिकाच्या संपादकाने तक्रार केल्यामुळं हे पोलिस आपल्याला अटक करायला आल्याचं शाहरुखच्या नंतर लक्षात आलं.
 
शाहरुखनं सांगितलं, "मग मी त्यांच्यासोबत गेलो. आयुष्यात पहिल्यांदाच मी पोलिस कोठडी पाहिली. ती अतिशय लहानशी जागा होती. तिथं अतिशय घाण होती. अगदी लघवी - विष्ठाही दिसत होती."
 
शाहरुखला त्या कोठडीत एक दिवस घालवाला लागला. त्यानंतर त्याला जामीन मिळाला.
 
जामीन मिळाल्यानंतर आपण त्याच संपादकाच्या घरावरून गेल्याचं शाहरुखने सांगितलं.
 
'त्या' बोल्ड सीनचा किस्सा
1993मध्ये आलेल्या 'माया मेमसाब' सिनेमात शाहरुखला चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या बायकोसोबतच एक प्रणयदृश्य चित्रित करायचं होतं. ही फिल्म 90च्या दशकातली एक बोल्ड फिल्म मानली जाते. शाहरुखसह इतर कलाकारांनीही या सिनेमात बोल्ड दृश्यं दिली होती.
 
चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी एकमेकांची ओळख व्हावी आणि प्रणय दृश्य शूट करता यावं म्हणून शाहरूखला त्यांची पत्नी दीपा साहीसोबत एक रात्र घालवायला सांगितली होती, असं 'सिने ब्लिट्झ' मासिकात छापून आलं होतं.
 
हा लेख वाचून शाहरुखला राग आला आणि त्याने या मासिकाच्या कार्यालयात जात हा लेख लिहिणाऱ्याला जीवे मारायची धमकी दिली होती.
 
शाहरुख आणि घोडेस्वारी
शाहरुख खान आपल्या फिल्म्समध्ये रोमान्स करताना दिसतो, अॅक्शन सीनही करतो. पण 'अशोका' सोडल्यास त्याने कधीच घोडेस्वारी केली नाही.
 
या घोडेस्वारीबद्दल शाहरुख सांगतो, "अशोका - द ग्रेट" फिल्मचं शूटिंग सुरू असताना अॅक्शन डायरेक्टरनं आश्वासन दिलं होतं, की अॅक्शन म्हटल्याबरोबर घोडा धावू लागेल आणि शाहरूखला फक्त स्वतःच्या अभिनयाकडे लक्ष द्यायचं आहे.
 
पण अॅक्शन म्हटल्यानंतरही घोडा धावला नाही. म्हणून मग मागून घोड्याला चाबूक मारण्यात आला आणि घोडा धावायला लागला.
 
"आता घोडा असा काही पळायला लागला, की थांबेच ना. माझा सीन शूट झालेला होता पण घोडा पळतच होता. घोडा थांबत नसल्याचं मी फेरी मारून परत तिथे आल्यावर अॅक्शन डायरेक्टरला सांगितलं. यावर तो म्हणला, की मी घोडा धावेल असं म्हटलं होतं. कसा थांबेल हे कोणालाच माहीत नव्हतं."
 
तेव्हापासून शाहरूख खान परत घोडेस्वारीच्या वाट्याला गेलेला नाही.
 
शाहरुखचे गुरू
आई-वडील, बालपण आणि कॉलेजविषयीही शाहरुखने या मुलाखती गप्पा मारल्या आहेत. हॉलिवुड अॅक्टर मायकल फॉक्स यांना आपण प्रेरणास्रोतच नाही तर गुरू मानत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय.
 
लहान असताना जर आपल्याला कोणत्या इंग्रजी कलाकारापासून प्रेरणा मिळाली वा शिकायला मिळालं असेल तर ते मायकल फॉक्स यांच्याकडून असल्याचं शाहरुखने या मुलाखतीत सांगितलं. फॉक्स यांची अभिनयाची पद्धत, त्यांचा उत्साह आपल्याला आवडत असल्याचं शाहरुख म्हणतो. शाहरुख त्यांचे अनेक सिनेमे पाहत असे आणि अॅक्टिंगमधल्या अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडे पाहून शिकल्याचं शाहरुख सांगतो.
 
'आर्यनला अभिनयात रस नाही'
तीन मुलांपैकी सर्वात मोठा आर्यन याचं शिक्षण आणि करियरविषयी शाहरुखने लेटरमन यांना सांगितलं.
 
21 वर्षांचा आर्यन न्यूयॉर्कमध्ये फिल्म प्रशिक्षण घेत असून तो एक चांगला लेखक आहे. पण तो अॅक्टिंग करेल, असं आपल्याला वाटत नसल्याचं शाहरुखने म्हटलंय.
 
आपल्या मुलाने स्वतःच आपल्याला ही गोष्ट सांगितल्याचं शाहरुखनं म्हटलं आहे.
 
शाहरुखने सांगितलं, "आर्यनने मला सांगितलं, की जर तो एक चांगला अभिनेता झाला तरी लोक दरवेळी त्याची माझ्याशी तुलना करतील. तो यशस्वी झाला किंवा अयशस्वी झाला तरीही तुलना होईल. आणि त्याला या अशा विचित्र परिस्थितीत सापडायचं नाही."
 
मुलगी सुहाना खान हिच्या करियरविषयी फारसं न बोलता शाहरुखने एक बाप म्हणून आपण बजावत असलेल्या भूमिकेविषयी सांगितलं.
 
आपल्या तीनही मुलांचा मित्र होण्याचा आपला प्रयत्न असल्याचं शाहरुखनं सांगितलं. आपली मुलं आपल्या गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडविषयीच्या अडचणीही आपल्यासोबत शेअर करत असल्याचं शाहरुखने सांगितलंय.
 
शाहरुख म्हणाला, "बॉयफ्रेंडसाठी कोणती भेटवस्तू घेऊ हे सुहाना कधीकधी मला विचारते. मी अनुभवी आहे. एखादा मुलगा माझ्या मुलीसाठी योग्य आहे वा नाही हे मला कळतं, पण मी काही बोलत नाही. त्यावेळी मी फक्त भेटवस्तू घ्यायला सुहानाला मदत करतो."
 
शाहरुख बनवतो मुलांसाठी जेवण
या मुलाखतीमध्ये लोकांनी पहिल्यांदाच शाहरुखला स्वयंपाकघरात जेवण बनवताना पाहिलं. या शोमध्ये शाहरुखने मुलाखतकार डेव्हिड लेटरमन यांच्यासाठी जेवण तयार केलं.
 
पण मुलांसाठी सध्या आपण पदार्थ बनवायला शिकत असल्याचं शाहरुखनं सांगितलं. रात्री दोन वा तीन वाजता मुलांना भूक लागल्यावर त्यांच्यासाठी आपण खायला करत असल्याचं शाहरुखने सांगितलं.
 
आपण सध्या इटालियन पदार्थ बनवायला शिकत असल्याचं शाहरुखनं सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण