Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल 365 मुलींना डेट करण्याचं ध्येय असणारा ‘सीरिअल डेटर’

Webdunia
शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (14:29 IST)
- गीता पांडे
 
तमिळ अभिनेते, डान्सर आणि फोटोग्राफर असलेले सुंदर रामू यांनी गेल्या काही वर्षात 335 मुलींना डेट केलंय. मात्र, त्यांचं टार्गेट अजून पूर्ण झालेलं नाही. त्यांना 365 मुलींना डेट करायचं आहे.
 
सुंदर रामू घटस्फोटित आहेत आणि त्यांना रोमांसचं वावडं नाही. मात्र, त्यांच्या सर्वच डेट्स रोमँटिक असतात, असंही नाही. फक्त आणि फक्त प्रेमाचा शोध घेणं, हा त्यांच्या डेटिंगचा उद्देश नाही.
 
चेन्नईमधल्या आपल्या घरातून बीबीसीशी बोलताना सुंदर रामूने सांगितलं, "मी खूप रोमँटिक आहे. मी दररोज प्रेमाचा शोध घेत असतो. पण केवळ स्त्री मिळवणं, हा 365 डेट्स मागचा उद्देश खचितच नाही. भारतात महिला हक्कांविषयी जागरुकता निर्माण करण्याचा माझा हेतू आहे."
 
तामिळ आणि मळयालम सिनेमांमध्ये येण्याआधी सुंदर रामूने नाटकांमधूनही अभिनय केला आहे. 1 जानेवारी 2015 पासून त्यांच्या या डेटिंग प्रोजेक्टची सुरुवात झाली.
 
सुंदर रामू यांचं फेसबुक पेज बघितल्यावर त्यांनी डेट केलेल्या महिलांच्या अनेकविध कहाण्या वाचायला मिळतात.
 
यात स्वतः सुंदर रामूंच्या 105 वर्षांच्या आजीचाही समावेश आहे. मात्र, आता त्यांचं निधन झालंय.
 
सुंदर रामूने डेट केलेल्या महिलांमध्ये त्यांच्या इमारतीत कचरा वेचणारी स्त्री, 90 वर्षांच्या आयरिश नन, एक अभिनेत्री, मॉडेल, योगा टीचर, सामाजिक कार्यकर्त्या, राजकारणी महिला आणि इतरही अनेक महिलांचा समावेश आहे.
 
बीबीसीशी बोलताना सुंदर सांगत होते, "स्त्रीला आदराची वागणूक मिळणाऱ्या घरात माझा जन्म झाला. माझ्या शाळेतही विद्यार्थी-विद्यार्थिनी असा भेद कधी नव्हता. पण, मी जेव्हा खऱ्या जगात पाय ठेवला तेव्हा स्त्री-पुरूष भेद आपल्या समाजात किती खोलवर रुजला आहे, याची मला जाणीव झाली. हा माझ्यासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता."
 
डिसेंबर 2012 ची दिल्ली निर्भया प्रकरण त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वळण ठरलं.
 
ते सांगत होते, "त्या घटनेने मी खूप अस्वस्थ झालो. अनेक रात्र मला झोप आली नाही."
 
यावर कडी म्हणजे परदेशात फिरायला गेल्यावर तिथे "भारतात स्त्रीला वाईट वागणूक का दिली जाते?", असा प्रश्न त्यांना विचारला जाई.
 
"आपल्याला कायमच असं वाटतं की हे इतरांचं काम आहे. उदाहरणार्थ सरकारचं किंवा एनजीओचं. पण, हे बदलण्यासाठी मी काय करू शकतो, असा विचार माझ्या मनात आला."
 
आणि इथूनच 365 डेट्सच्या कल्पनेचा जन्म झाला.
 
"पुरुषांनीही या समस्येवरच्या उपायाचा भाग बनायला हवं. डेटिंगविषयी त्यांचे बरेच गैरसमज आहेत. स्त्री म्हणजे केवळ एक सुंदर देह नव्हे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते."
 
"डेट्सबरोबरच्या माझ्या संभाषणाबद्दल मी लिहितो. त्यातून स्वतःला स्त्रीच्या जागी ठेवून बघा, तुम्हाला त्यांच्या समस्या थोड्या जास्त कळतील, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे."
 
सुंदर रामूने 31 डिसेंबर 2014 रोजी फेसबुकवरून 365 डेट्स प्रोजेक्टची घोषणा केली.
स्त्रियांनीच मला डेटवर बोलवावं, डेटचं प्लॅनिंग करावं, भेटायची जागा ठरवावी आणि जेवणाचा खर्च उचलावा किंवा स्वतः जेवण बनवावं, असं रामू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
 
यातून जेवणाचा जो खर्च वाचेल तो महिन्याच्या शेवटी एखाद्या चॅरिटीसाठी अन्नधान्य खरेदी करण्यासाठी वापरेन, असंही त्यांनी लिहिलं.
 
सुंदर रामू यांनी ही पोस्ट टाकली आणि काही वेळातच त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेवणासाठी आमंत्रण दिलं.
 
सुरुवातीच्या त्यांच्या डेट्स त्यांच्या ओळखीच्या महिलांसोबत होत्या. दहाव्या डेटच्यावेळी स्थानिक वृत्तपत्रांनी ही बातमी उचलली आणि बघता बघता त्यांना अनोखळी स्त्रियांकडूनही निमंत्रणं येऊ लागली. त्यांना 'द डेटिंग किंग', '365 डेटिंग मॅन', 'सीरिअल डेटर' अशी नावंही मिळाली.
 
भारतासारख्या देशात जिथे आजही 'अरेंज्ड मॅरेज' आदर्श मानले जातात आणि 'डेटिंगला' पाश्चिमात्य सभ्यतेशी जोडून बघितलं जातं तिथे सुंदर रामू यांच्या या निर्णयाने त्यांच्या मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला.
 
त्यांनी सुंदर यांना समजावण्याचा प्रयत्न केला, "तुला काय दाखवयाचं आहे की तू खूप मुलींना ओळखतो? तू असा का वागतोयस? तू प्लेबॉय वाटतोय."
 
"मात्र, मी इतरांना दाखवता यावं, यासाठी हे करतोय. या विषयावर चर्चा घडावी, प्रश्न विचारले जावे, इतरांचे विचार जाणून घेता यावे, हा यामागचा हेतू आहे. 'लैंगिक समानता' हे माझं अंतिम ध्येय आहे."
 
या प्रोजेक्टची सुरुवात झाल्यापासून सुंदर रामू यांनी आजवर भारतासह व्हिएतनाम, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, थायलंड आणि श्रीलंकेसह विविध देशांतल्या स्त्रियांना डेट केलं आहे.
 
आपली प्रत्येक डेट 'स्पेशल' असल्याचं सुंदर म्हणत असले तरी एक डेट त्यांच्यासाठी 'जादुई' अनुभव होता. ही डेट होती 105 वर्षांच्या त्यांच्या आजीसोबतची. दोन वर्षांपूर्वी वयाच्या 109 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
 
"मर्सडिजमध्ये बसण्याची तिची फार पूर्वीपासून इच्छा होती. तिच्यासाठी मी मर्सिडीज घेतली आणि कुलांचावेडी गावातल्या तिच्या घरून तिला गाडीत बसवलं. गेल्या 22 वर्षात मतदान वगळता ती कधीच घराबाहेर पडली नव्हती."
 
त्यानंतर दोघे जवळच्या एका मंदिरात गेले आणि तिथून सूर्यास्त बघण्यासाठी नदीकाठी गेले.
 
"वयोमानाने तिची कंबर जरा वाकली होती. पण, ती धडधाकट होती. आम्ही दोघांनी सारखे चश्मे घातले. ती गमतीत म्हणाली की ती थोडी तरुण असती तर माझ्या इतर सर्व डेट्स तिच्यासमोर फिक्या पडल्या असत्या."
 
"ती माझी आजी होती. पण, त्यावेळी मी पहिल्यांदा तिच्यासोबत एकट्याने एवढा वेळ घालवत होतो आणि जर आम्ही डेटवर गेलो नसतो तर आमच्यात कधी हा संवादही झाला नसता."
 
चेन्नईमधल्या एका कॉन्व्हेंटमध्ये आयरिश नन असणाऱ्या सिस्टर लोरेटोसोबतही सुंदर राम डेटवर गेले होते.
 
या अनुभवाविषयी बोलताना सुंदर रामू म्हणाले, "त्यांनी वयाची नव्वदी ओलांडली होती आणि ही त्यांची पहिलीच डेट असल्याचं त्यांनी सांगितलं. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्या चर्चेमध्ये सेवा देण्यासाठी भारतात आल्या होत्या."
 
सुरुवातीला एका वर्षातच 365 डेट्स पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, 2015 साली चेन्नईत आलेल्या पुराने शहराचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे सुंदर यांनी प्रोजेक्ट काही काळासाठी स्थगित केला. 2016 साली त्यांनी पुन्हा डेटवर जायला सुरुवात केली. मात्र, यावेळी त्यांनी यासाठी जरा अधिक वेळ देण्याचं ठरवलं.
 
याविषयी बोलताना सुंदर रामू यांनी सांगितलं, "मी अनेक मुलींबरोबर डेटवर गेलोय, तिथे फुकट जेवलोय आणि आता हा माझ्यासाठी आयुष्यभरासाठीचा प्रोजेक्ट बनलाय. हा संवाद कायम सुरू ठेवणं, ही यामागची कल्पना आहे."
मी त्यांना विचारलं डेटिंग प्रोजेक्ट्स सुरु केल्यानंतर आज समाजात अधिक लैंगिक समानता आल्याचं जाणवतं का?
 
या प्रश्नावर सुंदर रामू म्हणाले, "वेगळ्या वातावरणल्या कुटुंबात माझा जन्म झाला. मात्र, पितृसत्ताक पद्धतीची मुळं खोलवर रुजलेला देश आणि समाज मी एकटा बदलू शकतो, असा विचार करणंही खोडसाळपणाचं ठरेल."
 
"मात्र, कुठेतरी सुरुवात करायलाच हवी, असं मला वाटतं. हे एका रात्रीतून घडणारं नाही. यावर कुठलाच तात्काळ उपाय नाही. यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील. मात्र, त्यासाठी आपण स्वतः सुरुवात करायला हवी आणि त्यात सातत्य ठेवायला हवं."

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

पुढील लेख
Show comments