Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबान : 'काबूलमध्ये विमानाला लटकलेले असहाय लोक मी डोळ्यांनी पाहिले'

Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (23:34 IST)
राहुल गायकवाड
पुण्यातले पराग रबडे हे अफगाणिस्तानातून परतले आहेत. तिथली विदारक स्थिती त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. आपला अनुभव त्यांनी बीबीसीला सांगितला.
 
"तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला भारतीय दुतावासाने भारतात जाण्यास सांगितलं. एक एअर इंडियाचं विमान सोमवारी काबूल विमानतळावर येणार असल्याचं समजलं होतं.
 
"परंतु जेव्हा विमानतळावर गेलो तेव्हा कुठलेच विमान उपलब्ध नव्हतं. विमानतळावर केवळ अफगाण नागरिक आणि मीच एकटा परदेशी नागरिक होतो. लोक विमानाला लटकून जात असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्या समोर घडली. मला कळत नव्हतं पुढे काय करायचं."
 
अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले डॉ. पराग रबडे त्यांचा परतीचा थरारक अनुभव बीबीसी मराठीला सांगत होते. रबडे हे वर्ल्ड बॅंकेच्या उपक्रमांर्तगत अफगाणिस्तान सरकारच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते.
 
गेली आठ वर्षं ते अफगाणिस्तानात विद्यार्थ्यांना शिकवत होते. बुधवारी ते भारतीय एअर फोर्सच्या सी 17 या विमानाने भारतात परतले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी आपला अनुभव सांगितला.
रबडे घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या अनेक नातेवाईकांचे फोन येत आहेत. त्यांची विचारपूस केली जात आहे. ते सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या आईने देखील समाधान व्यक्त केलं.
 
रबडे यांचा परतीचा प्रवास सुखाचा नव्हता. भीती, अनिश्चितता अशा सगळ्या विचारांनी त्यांना ग्रासलं होतं.
रबडे सांगतात, "परतीचा प्रवास फार सुखाचा नव्हता. तालिबानने सत्ता काबीज केल्याचं कळल्यानंतर सोमवारी सकाळी विमानतळावर गेलो. एअर इंडियाचं एक विमान येणार असल्याचं कळालं होतं. परंतु त्या विमानाला तिथे उतरू दिलं गेलं नाही.
 
"मी विमानतळावर बहुदा एकटाच परदेशी नागरिक होतो. इतर सर्व अफगाण लोक होते. त्यांना कळत नव्हतं काय करायचं. लोक रडत होते, इकडे तिकडे पळत होते. दिसेल त्या विमानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. सत्ता बदलल्यावर राष्ट्रपती जागेवर नसल्याने त्यांना कळत नव्हत मदत कोणाकडे मागायची. त्यामुळे भय आणि अराजकता निर्माण झाली होती."
 
सिव्हिल एअरलाईन्स बंद करण्यात आल्याने परत कसं जायचं असा प्रश्न रबडे यांच्यासमोर निर्माण झाला होता. रबडे यांनी भारतीय दूतावासाची मदत घेतली. विमानतळावरुनच ते दूतावासाकडे गेले. दूतावासाने तुमची काळजी घेऊ असा विश्वास त्यांना दिला.
 
त्याचबरोबर तालिबानी सुद्धा त्यांना तुम्हाला जाऊ देऊ असे म्हणाले होते. त्यामुळे वातावरणातला ताण काहीसा निवळला. असं असलं तरी तालिबानी त्यांना कधी जाऊ देतील हा प्रश्न होताच.
 
भारतीय दुतावासाने एअर फोर्सच्या सी 17 या विमानाच्या माध्यमातून रबडे आणि इतर 143 भारतीयांना भारतात आणलं.
 
'तालिबानी कदाचित सर्वांच्या घराची चौकशी करू शकतील'
अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यानंतर काय होणार याचा कोणालाच अंदाज नव्हता. अफगाणिस्तानचे राष्ट्रपतीच देश सोडून गेल्याने अराजकता निर्माण झाली होती.
रबडे सांगतात "ज्या दिवशी सत्तापालट झाला त्या दिवशी त्या रात्री नऊ ते सकाळी दहा वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला. त्यावेळी असंही आम्हाला सांगण्यात आलं की तालिबानी कदाचित सर्वांच्या घरांची चौकशी करू शकतील. पण तसं काही झालं नाही.
 
"अशा अनेक अफवा देखील पसरत होत्या. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी एअरपोर्टला जायला निघालो तेव्हा अनेक तालिबानी रस्त्याने उभे होते. पण माझ्या गाडीला कोणी थांबवलं नाही. किंवा कोणी चौकशी देखील केली नाही," असं रबडेंनी सांगितलं.
 
महिलांची स्थिती कशी आहे?
तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक व्हीडिओ व्हायरल झाले. लोक विमानतळावर गर्दी करतायेत जीव वाचविण्यासाठी पळत आहेत, असं त्या व्हीडिओंमधून समोर येत होतं.
या व्हीडिओंमध्ये महिलांची संख्या तुलनेने बरीच कमी होती. सत्तापालट झाल्यानंतर महिलांच्या परिस्थितीबाबत सांगताना रबडे म्हणतात, "सत्तापालटनंतर महिला रस्त्यावर कमी होत्या. त्यांच्या मनात भीती होती. त्यांना अफगाणिस्तानातून बाहेर पडायचं होतं. त्यांच्यामागे त्यांची मुलं त्यांचा परिवार होता. पुढे काय होईल याबाबत देखील त्यांच्या मनात धाकधूक होती."
 
'तर पुन्हा अफगाणिस्तानला जायला आवडेल'
 
अफगाणिस्तानमध्ये जरी सत्ता बदलली असली तरी काही काळाने गोष्टी पूर्वपदावर येतील, असा विश्वास रबडे यांना वाटतो.
 
सत्ताबदलानंतरच्या अफगाणिस्तानामधील दीड दिवसात त्यांना हिंसात्मक गोष्ट दिसली नाही. परंतु पुढे काय होईल हे सांगता येणार नाही, अशी भीती सुद्धा ते व्यक्त करतात.
 
रबडे एक प्राध्यापक असल्याने मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये असं त्यांना वाटतं. अफगाणिस्तानातील महाविद्यालयं पुन्हा सुरु व्हावीत, असंही ते म्हणतात.
 
नवीन सत्ताधाऱ्यांनी परत येण्याची परवानगी दिली तर रबडे यांना पुन्हा तिथे जाऊन शिकवायची इच्छा आहे. शिक्षण क्षेत्रात ते काम करत असल्याने मुलांचं शिक्षण अर्धवट सोडणं त्यांना योग्य वाटत नाही.
 
परंतु आता तिथे बाहेरील लोकांना कशी वागणूक मिळते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि आहे तशी परिस्थिती ठेवली तर परत जायला हरकत नाही, असंदेखील रबडे सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments