अमृता दुर्वे, जान्हवी मुळे
फत्तेशिकस्त, हिरकणी, फर्जंद किंवा मग तान्हाजी, पानिपत, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव - मस्तानी, पद्मावत...मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही काळामध्ये आलेल्या सिनेमांची ही यादी. काही दिवसांपूर्वी पानिपत आणि आता तान्हाजी प्रदर्शित झाला आहे.
त्यानिमित्ताने इतिहास आणि सिनेमा यांचं काय नातं आहे? ऐतिहासिक सिनेमाच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो का? या प्रश्नाचा आढावा घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला.
सिनेमा आणि इतिहास यांच्या नात्याविषयी सांगताना जेष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर म्हणतात, "मराठीत भालजी पेंढारकरांनी 15 ऐतिहासिक चित्रपट बनवले होते. पण हिंदी सिनेमात महाराष्ट्राचा इतिहास तेवढा दिसला नाही. त्यामुळं हे नवेपणही आहे. तसंच पानिपत आणि तान्हाजी या दोन्हीचे दिग्दर्शक महाराष्ट्रातले आहेत. मराठी किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांना प्रेम असणं आणि त्यांनी तो मांडणं स्वाभाविक आहे."
ऐतिहासिक सिनेमांची लाट
एखादा विषय वा फॉर्म्युला यशस्वी ठरला, तर त्यावरच आधारीत सिनेमांची लाट येणं हे प्रत्येक सिनेसृष्टीत घडतं. हॉलिवूडमध्ये सध्या अशा सुपरहिरोजवर आधारित सिनेमांची लाट आहे. तर बॉलिवूड प्रेमकथांसोबतच इतिहासाच्याही प्रेमात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बाजीराव - मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका, राणी लक्ष्मीबाई, पानिपत आणि आता प्रसिद्ध होत असलेला तान्हाजी असे इतिहासातल्या कहाण्या सांगणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आले. मराठीतही फत्तेशिकस्त, फर्जंद, हिरकणी असे चित्रपट आले.
सिनेनिर्मात्यांच्या ऐतिहासिक विषय निवडण्याविषयी सिने पत्रकार नीलिमा कुलकर्णी सांगतात, "गेम ऑफ थ्रोन्स किंवा बाहेरचे मोठे युद्धपट आपल्या प्रेक्षकांना आवडू लागले. तशा भव्य प्रमाणात युद्धांची दृश्यं रंगवण्याची तांत्रिक क्षमता भारतातही निर्माण झाली. ती बाजीराव मस्तानी आणि बाहुबलीमध्ये दिसून आली. असं युद्ध मोठ्या पडद्यावर आणलं तर ते चालतं हाही फॉर्म्युला बनला. त्यामुळंही ऐतिहासिक विषय निवडले जाऊ लागले."
बॉलिवूडच्या या 'फॉर्म्युलां'विषयी दिलीप ठाकूर म्हणतात, "हिंदी सिनेमाच्या बाबतीत वर्षानुवर्ष असं दिसलं आहे की ज्या प्रकारचा चित्रपट चालतो, त्या पठडीतले चित्रपट सगळे बनवतात. बाजीराव मस्तानी आणि 'पद्मावत' या दोन चित्रपटांवरून वाद झाले, पण प्रसिद्धी आणि यश मिळालं आणि तो फॉर्म्युला बाकीच्यांनी उचलला. म्हणजे आधीही एखाददुसरे ऐतिहासिक चित्रपट आले, पण बाजीराव मस्तानीच्या यशानं सगळी गणितं बदलली. दुसरं म्हणजे पडद्यावर काही भव्य दाखवायचं तर वेगळं काय दाखवणार? कभी खुशी कभी गम सारखे कौटुंबिक विषय करून झाले. एनआरआय हिरोवरच चित्रपट झाले. मग वेगळं काही घेऊन 'बाजीराव-मस्तानी' आला. बाहुबली ही ऐतिहासिक बाजाची फॅण्टसी आली. आणि मग अशा भव्य चित्रपटांची लाट आली."
बॉलिवुडला मराठी इतिहासात रस का?
बॉलिवुड आणि मुंबई हे हिंदी सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनचं नातं. आजही बहुतांश बॉलिवूड कलाकार हे मुंबईतच राहतात. अनेक निर्मिती संस्थांची कार्यालयं इथे आहेत. हिंदी भाषकांसोबतच हिंदी सिनेमे पाहणारा मराठी भाषक वर्गही मोठा आहे.
हिंदी सिनेमांना उत्तर भारतासोबतच महाराष्ट्रातूनही मोठा बिझनेस मिळतो. पण असं असूनही ज्या राज्यात ही मुंबई आहे, तिच्या वा त्या राज्याच्या इतिहासात बॉलिवूडने बराच काळ काही रस घेतला नव्हता. मग आता अचानक मराठी इतिहासात बॉलिवूडला रस का?
नीलिमा कुलकर्णी म्हणतात, "मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपटही मोठ्या प्रमाणात बघतात. त्यामुळं मुंबई आणि दिल्ली हे बॉलिवूडसाठी प्रमुख टार्गेट ऑडियन्स आहेत. मराठ्यांच्या इतिहासात दिल्लीचा, उत्तर भारताचा इतिहास गुंफला आहे. त्यामुळे या दोन्ही गटांना आकर्षित करु शकतात असे ऐतिहासिक विषय निवडले जाताना दिसतात.
अजय देवगणनं सिंघम केल्यापासून त्याला मोठा मराठी प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. त्यामुळं त्याला तान्हाजी करावासा वाटणं स्वाभाविक आहे. अर्थात प्रत्येक चित्रपट चालेल असं नाही. पानिपतसारखा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषयावरचा चित्रपट महाराष्ट्रातही फार कमाई करू शकला नाही."
आपण 'पानिपत' हा सिनेमा का केला याविषयी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी फर्स्टपोस्टशी बोलताना म्हटलं होतं, "ही कथा अतिशय रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे. पण ती फारशी सांगितली गेली नाही, कारण हे युद्ध आपण हरलो होतो आणि अर्थातच सगळ्यांना विजयाच्या कथा आवडतात. पण ट्रॅजिडीजही सांगितल्या जाणं गरजेचं आहे. नाहीतर मग अनेक ट्रॅजिक प्रेमकथांवरचे सिनेमे यशस्वी झालेच नसते. ही एका युद्धाची शोकगाथा आहे.
या सैन्यामध्ये हिंदू, मुस्लिम, मराठा, शेतकरी असे सगळेच होते. हा एक वेगळाच मेळ होता. एक वेगळीच एकात्मता यात होती. मला हे सगळं खूपच इंटरेस्टिंग वाटलं."
देशातलं वातावरण सिनेमात झळकतं?
सिनेमा हा अनेकदा जनमानसाच्या विचारांना मुक्तपणे खुल्यावर मांडणारं माध्यम ठरतो. आणि आता पर्यंत अनेकदा सिनेमांनी देशातल्या घडामोडींवरुन प्रेरणा घेतली किंवा मग तेव्हाच्या परिस्थितीचच चित्रण सिनेमात पहायला मिळालं. म्हणूनच 50च्या दशकात 'दो बिघा जमीन' सारखा सोशलिस्ट सिनेमा आला.
पुढे 60 आणि 70 च्या दशकातल्या अनेक सिनेमांचे नायक हे युनियन लीडर होते, किंवा मग श्रीमंतांकडून अन्याय होणाऱ्या गरीबांना न्याय मिळवून देणारे रॉबिन हूड होते.
'सुजाता' सारखा सिनेमा देशातल्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा होता. मागच्या वर्षी आलेला 'उरी' सिनेमा हा देशातल्या तेव्हाच्या सर्वांत जास्त चर्चा होत असलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी होता. सामना आणि सिंहासन सारख्या सिनेमांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती टिपली होती.
राष्ट्रवादाचा मुद्दा प्रेक्षकांच्या गळी उतरवला जात आहे का?
चित्रपटांमधून सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं जातं. याविषयी बोलताना ज्येष्ठ समीक्षक मीना कर्णिक म्हणतात, "संवेदनशील दिग्दर्शकांना नेहमीच आपल्या आजूबाजूच्या समाजात काय घडतंय याचं आकर्षण असतं आणि त्याविषयी बोलावंस वाटतं. पण सध्या ही जी लाट आलेली आहे त्यामध्ये नक्कीच काही बाबतींमध्ये चित्रपटांचा संबंध हा आताच्या देशामधल्या 'राष्ट्रवादी' भावनेशी आहे, असं मला वाटतं.
माझा देश, माझा इतिहास, माझी संस्कृती, माझ्या देशात घडलेली प्रत्येक गोष्ट महान आहे असा एक 'नॅशनलिस्टीक फीव्हर' सध्या आहे. आणि त्याचा उपयोग करून घेण्याचा हेतू काही फिल्म्समागे असू शकतो."
तर नीलिमा कुलकर्णी म्हणतात, "सध्याच्या देशातल्या परिस्थितीला हे धरून आहेच. मराठ्यांच्या इतिहासात हिंदुत्वाचा मुद्दाही येतोच. त्या काळातल्या मराठ्यांच्या इतिहासावर चित्रपट बनवायचा, तर त्यांच्या विरोधातले बहुतांश खलनायक मुस्लिम होते. त्यामुळं ते मुस्लिम पात्रं म्हणून रंगवली जातात. त्यांची दाहकता दाखवताना ती थोडी जास्तच डार्क दाखवली जातात. पण फक्त ऐतिहासिक चित्रपटातच नाही, तर मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटांतही खलनायक अशा पूर्वग्रहांना धरून असतात. साध्या सिनेमांतली विशिष्ट धर्मांची पात्र विशिष्ट पूर्वग्रहांना धरुन चितारली जातात."
सिनेमातून इतिहासाचं योग्य चित्रण होतं का?
ऐतिहासिक सिनेमांविषयी बहुतेकहा वाद होतोच आणि बहुतांश वेळी हे वाद असतात ते ज्या प्रकारे इतिहास सांगण्यात आला आहे, त्याविषयी किंवा मग दिग्दर्शकाने घेतलेल्या 'सिनेमॅटिक लिबर्टी' विषयी.
मीना कर्णिक म्हणतात, "आपण इतिहास जसाच्या तसा मांडायचा प्रयत्न करतो का? किंवा त्यामध्ये किती नाट्य आणलं जातं? किती लिबर्टी घेतली जाते?अनेकदा आपल्या सिनेमांमधून इतिहास सांगतानासुद्धा त्याचं उदात्तीकरण खूप होतं. उदाहरणार्थ 'क्राऊन' या सीरिजविषयी बोलायचं झालं तर ती ज्या इंग्लंडच्या राणीविषयी आहे, ती अजूनही जिवंत आहे. पण म्हणून तिच्याविषयी फक्त छान-छान गोष्टी, ती किती महान आहे असं केलेलं नाही. हे आपल्याकडे होताना फारसं दिसत नाही. एखादी व्यक्तीरेखा वा पात्र मोठं दाखवण्यासाठी दुसरं खुजं दाखवलं जातं. दोन भिन्न मतप्रवाहाची पात्रं असताना दुसरं पात्र डार्क वा खुजं दाखवण्याची गरज का?"
सिनेमातून इतिहासाचं दर्शन होतं का?
सिनेमाद्वारे इतिहास ज्या प्रकारे मांडला जातो, त्याविषयी सांगताना इतिहास अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर सांगतात,"वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अनेक नोंदींच्या आधारानं इतिहासकार हे गतकाळाच्या घटनाक्रमाची साधार आणि शास्त्रोक्त मांडणी करून ती इतिहास या नावानं समाजापुढे सादर करतात. चित्रपटातही कुणाची तरी कथा आपल्या आकलनानुसार समाजापुढे सादर करतात."
"त्याचंही तंत्र, शास्त्र असतंच. तरीही दोन्हीत मुख्य फरक असा की व्यावसायिक सिनेमाचं प्रमुख ध्येय बहुतेक वेळा व्यावसायिक फायदा हे असतं. तर इतिहासाचं ध्येय व्यावसायिक फायदा हे नसतं. ऐतिहासिक चित्रपटांमधून गतकाळातील घटनांचं त्या त्या दिग्दर्शकाच्या नजरेतून कथन केलं जातं. त्यामुळे या चित्रपटांवर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही," कुंभोजकर सांगतात.
"इतिहासाची अभ्यासक म्हणून जर कशावर आक्षेप घ्यायचाच झाला, तर मी असं म्हणेन की व्यावसायिक चित्रपटाकडे गतकाळाची कहाणी सांगणारा मनोरंजक चित्रपट म्हणून न पाहता इतिहासाच्या पाठ्यपुस्तकासारखं पाहिलं, तर पेच उद्भवतो. सिनेमा हा इतिहास लिहिण्याचं संदर्भसाधन ठरु शकतो. पण व्यावसायिक सिनेमा हा इतिहास शिकण्याच्या पुस्तकाला पर्याय ठरु शकत नाही," असं कुंभोजकर सांगतात.