कल्पना करा की तुम्ही एका शाळेत जाताय त्या शाळेमध्ये गणिताचा तास सुरू आहे आणि मुलं कॅरम खेळता खेळता गणित शिकतायत, सापशिडी खेळता-खेळता गणित शिकतायेत. मज्जा येईल ना?
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या इवल्याशा बंडगर वस्तीवर. आणि शाळेत ही मज्जा आणली आहे या शाळेतील शिक्षक विक्रम अडसूळ आणि कविता बंडगर या दोन प्रयोगशील शिक्षकांनी. बीबीसी मराठीने या शाळेला भेट दिली. शिक्षक दिनानिमित्त या दोन आगळ्यावेगळ्या शिक्षकांची ही कहाणी...
व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीची आठवण यावी अशीही बंडगर वस्ती आहे. उघड्या बोडक्या माळरानावर वसलेली ही वस्ती. बनगरवाडी प्रमाणेच या वस्तीवर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये मेंढपाळ मंडळी राहतात. या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुकल्यांसाठी ही शाळा आहे.
खरं तर जिथे ही शाळा आहे तो भाग अत्यंत दुर्गम आहे. शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी डांबरी रस्ता सुद्धा नाही. बहुतेक मंडळी ही मेंढीपालन करणारी असल्यामुळे वर्षातील काही महिने बाहेरच असतात. तर काही लोक पुण्यात राहून मोलमजुरी करतात.
अशाच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे शक्य होत नाही. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही विक्रम अडसूळ आणि कविता बंडगर यांनी केवळ शाळा चालवलीच नाही तर तिला राज्यातील एक महत्त्वाची प्रयोगशील शाळा म्हणून पुढे आणली आहे.
पहिली ते चौथीपर्यंत सध्या एकूण 27 मुलं मुली या शाळेत शिकतात. बहुतेकांचे आई-वडील बाहेर असल्यामुळे ते आपल्या आजी-आजोबांसोबत राहतात. दगडधोंडे, काट्या-कुपाट्या यातून मार्ग काढत, मात्र अत्यंत उत्साहाने ही मुले शाळेत येतात.
ज्ञानरचनावादाची संकल्पना
ही शाळा खरंतर मूळची वस्तीशाळा. काही वर्षांपूर्वी या शाळेला औपचारिक शाळेचा दर्जा मिळाला. बंडगर वस्तीवर राहणाऱ्या कविता बंडगर वस्तीशाळा असल्यापासून येथे शिकवत आल्या आहेत. वस्तीशाळा शिक्षिका म्हणून सुरुवात केलेल्या कविता बंडगर यांनी शिकवता शिकवता डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या आता पूर्णवेळ शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
येथे औपचारिक शाळा झाल्यानंतर विक्रम अडसूळ या शाळेवर रुजू झाले. दोघांचाही प्रयत्न होता की मुलांना रंजक पद्धतीने कसं शिकवता येईल? यातूनच विविध कल्पना जन्माला आल्या.
सध्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञानरचनावादाचा मोठा बोलबाला आहे. पण या दोघांनी या दुर्गम भागातल्या शाळेत 2013 मध्येच ज्ञानरचनावाद पद्धतीने मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे.
शिकवण्यासाठी हे दोघे जे काही प्रयोग करत आहेत त्याचा पाया ज्ञानरचनावादातच आहे. मुलांनी स्वतःच आपल्या कृतीमधून शिकायचे आणि शिक्षकांनी या कृतिशील शिकण्यासाठी मुलांना मदत करायची असा हा प्रयोग आहे.
या प्रयोगा मागील प्रेरणे बद्दल विक्रम अडसूळ सांगतात, "मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. शिक्षणाचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. ग्रामीण भागातील, गरीब कुटुंबातील मुलं शिक्षण घेत असताना त्यांना ते शिक्षण आनंददायी वाटावं, शिक्षणाचे ओझे वाटू नये अशाप्रकारे मला शिकवायचं होतं. त्यासाठी मग मी या सगळ्या कल्पना पुढे आणल्या. या सगळ्या प्रयोगांचा फायदा असा होतो की मुलांना शिक्षण बोरिंग वाटत नाही. अगदी गणितासारखा एरवी मुलांना त्रासाचा वाटणारा विषय ही रंजक वाटतो."
शिकवण्याचे कल्पक प्रयोग
मुलांना शिकवण्यासाठी या दोघांनी जे साहित्य निर्माण केले आहे अतिशय कल्पक असं आहे.
सापशिडी हा तर मुलांचा आवडता खेळ. मग सापशिडी आणि गणिताचा जर मेळ घातला तर? यातून त्यांनी गणित शिडी तयार केली आहे. चार जणांमध्ये हा खेळ खेळला जातो. शेवटी ज्या घरात जाईल तिथे मुलांसाठी हे गणित मांडलेलं असतं आणि हे गणित सोडवत सोडवत मुलं पुढे जात राहतात.
दुसरा खेळ आहे गणिती कॅरम. मुलांना आकडेमोडीची सवय लावण्यासाठी कॅरमचा वापर केला जातो. कॅरमच्या सोंगट्यावरती आकडे लिहिलेले असतात आणि ज्या पद्धतीने त्या काढल्या जातात त्यानुसार मुलं गणित सोडवत जातात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळं कॅरम खेळता खेळताच मुलं करतात. बरं कॅरमचा खेळ चौघेजण खेळत असल्यामुळे काही अडलं तर ही मुले एकमेकांना गणित सोडवण्यासाठी मदतही करतात.
गणिता सोबतच मुलांची शब्दसंपदा वाढावी लेखन कौशल्य विकसित व्हावे या दोन शिक्षकांनी वेगळे प्रयोग केले आहेत.
मराठी कसं शिकवलं जातं?
शब्द डोंगर नावाचा एक खेळ त्यांनी तयार केला असून या शब्द डोंगरावर मुलांना एक शब्द सांगितला जातो त्या शब्दाच्या अवतीभोवती मुलं त्यांच्या जे मनात येईल ते लिहितात. या शब्द डोंगराचा मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यास आणि लिहिण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते.
तीन शब्दांची कहाणी हा आणखी एक वेगळा प्रयोग. एका बॉक्सवर अनेक वर्तुळं करून प्रत्येक वर्तुळात तीन तीन शब्द लिहिले जातात. हे तीन शब्द घेऊन मुलांना एक कथा लिहायला सांगितली जाते. उदाहरणार्थ एका वर्तुळात रेडकू , म्हैस, नदी अशी तीन शब्द लिहिले जातात. मग या तीन शब्दांना घेऊन मुलं आपली कथा तयार करतात.
मुलांना शिकवण्यासाठी बाहुल्यांचा प्रयोग या शाळेची आणखी एक खासियत. या दोन्ही शिक्षकांनी अगदी सुरुवातीपासून बाहुल्यांचा प्रयोग आपल्या शिकवण्यासाठी केला आहे. मुलांच्या हातात बाहुल्या दिल्या जातात आणि त्यातून त्यांना इंग्रजी संभाषण शिकवलं जातं.
याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान या शाळेमध्ये आहेच आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, व्हर्चुअल रियालिटी यांचाही वापर केला जातो. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांनी अगदी परदेशातील व्यक्तींशीही संवाद साधला आहे.
या प्रयोगाबद्दल छोट्या दोस्तांना काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या शाळेत तनुजा शिकते. दुसरीनंतर ती या शाळेत आली. पुण्यात तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. ती इथं आजी-आजोबांसोबत राहते. तनुजा सांगते पुण्याच्या शाळेपेक्षा तिला ही शाळा जास्त आवडते कारण इथं अभ्यास हसत खेळत घेतला जातो.
कौतुकाची थाप
या दोन्ही शिक्षकांच्या या उपक्रमशीलतेची अर्थातच विविध पातळ्यांवर दखलही घेतली गेली आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातून गेल्यावर्षी केवळ एका शिक्षकाची निवड झाली आणि ते होते विक्रम अडसूळ. राष्ट्रपतींच्या हस्ते गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही त्यांचं कौतुक झालं आहे. याशिवाय इतरही अनेक पुरस्कार यांना मिळाले आहेत.
मुलांमध्ये मूल होऊन हसत-खेळत त्यांना शिकवत हे दोन शिक्षक शिक्षणाची गोडी निर्माण करत आहेत. मुले शिकण्यात आनंद घेतात, उत्साहाने शाळेत येतात, याहून वेगळे शिक्षणाचे आणि शिक्षकांचे यश काय असू शकते.
'प्रयोगशीलतेमुळे ऊर्जा वाढते'
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षण तज्ज्ञ वसंत काळपांडे सांगतात, "शिक्षणामधील नवनवीन प्रयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षकांनी पुस्तकात जे आहे ते शिकवणे, विद्यार्थ्यांनी निमूटपणे ऐकून घेणे याऐवजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचार करण्यास, कृती करण्यास चालना देणे हे अधिक उपयुक्त आणि मुलांसाठी फायद्याचं आहे."
"बऱ्याचदा अनेक लोकांच्या बोलण्यातून येते शिक्षक आणि शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. उलट माझे मत असे आहे की निरनिराळ्या प्रयोगांच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांची प्रयोगशीलता दिवसेंदिवस उंचावत आहे. 1990 नंतर शिक्षण आनंददायी बनवण्याचे प्रयोग आपल्याकडे होऊ लागले आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणाच्या या प्रयोगांमध्ये केवळ तंत्रज्ञानाच्या वापरात पुरतेच मर्यादित न राहता स्थानिक पातळीवर कल्पक शैक्षणिक साहित्य तयार करणे आणि अभिनव उपक्रम राबवणे हे महत्त्वाचे ठरत आहे."