पराग फाटक
पाकिस्तान संघासाठी वर्ल्डकपची सुरुवात निराशाजनक झाली. भारत आणि नंतर झिम्बाब्वेविरुद्ध पराभवामुळे पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाणार अशी चिन्हं होती. पण त्यानंतर कामगिरीत अमूलाग्र सुधारणा करत पाकिस्तानने थेट फायनलमध्ये धडक मारली.
पाकिस्तानने नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि न्यूझीलंडला नमवलं आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि अनुनभवी झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाल्याने पाकिस्तान संघावर प्रचंड टीका झाली होती. पण या टीकेने खचून न जाता पाकिस्तानच्या संघाने थेट फायनलमध्ये वाटचाल केली आहे.
2007मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने होते. मिसबाह उल हक पाकिस्तानला जिंकून देणार अशी स्थिती होती. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जोगिंदर शर्माच्या बॉलिंगवर मिसबाहचा स्कूपचा फटका श्रीसंतच्या हातात जाऊन विसावला आणि भारताने जेतेपदाची कमाई केली होती.
2009 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं.
पाकिस्तानच्या सपोर्ट स्टाफमध्ये काही जाणती मंडळी आहेत. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं आणि त्याचवेळी पुढच्या सामन्यांसाठी चोख तयारी करवून घेण्याचं काम सपोर्ट स्टाफने केलं. जाणून घेऊया कोण आहे त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये.
साकलेन मुश्ताक (हेड कोच)- भारताविरुद्ध नेहमी चांगली कामगिरी करणारे फिरकीपटू साकलेन मुश्ताक आता पाकिस्तानचे हेड कोच आहेत. दुसरा या अनोख्या चेंडूसाठी ते ओळखले जायचे.
साकलेन यांनी 49 टेस्ट आणि 169 वनडेत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. दोन्ही प्रकारात साकलेन यांच्या नावावर दोनशेहून अधिक विकेट्स आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यांत कमी सामन्यात 100 विकेट्सचा विक्रम साकलेन यांच्या नावावर होता. मात्र त्याचवेळी नोबॉलच्या संख्येमुळे त्यांच्यावर टीकाही होत असे.
1998-99 मध्ये चेन्नईत पाकिस्तानने थरारत विजय मिळवला होता. त्या सामन्यात साकलेन मुश्ताकने 10 विकेट्स पटकावल्या होत्या. साकलेन मुश्ताक आणि मुश्ताक अहमद ही जोडगोळी प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणत असे.
पाकिस्तानसाठी खेळणं थांबल्यानंतर साकलेन यांनी इंग्लिश क्रिकेटमध्ये ससेक्स आणि त्यानंतर सरे संघासाठी उत्तम कामगिरी केली.
मोहम्मद युसुफ (बॅटिंग कोच)- पाकिस्तानच्या सार्वकालीन महान बॅट्समनच्या मांदियाळीत गणना होणारं नाव. हलक्या हातांनी धावांच्या महिरपी रचणारा फलंदाज अशी मोहम्मद युसुफ यांची ओळख होती.
2006 मध्ये युसुफ यांनी टेस्ट प्रकारात कॅलेंडर वर्षात 1788 रन्सचा डोंगर उभारला होता. आजही हा विक्रम युसुफ यांच्या नावावर आहे. सलग 6 डावात अर्धशतक तसंच दोन्ही डावात शतक असे असंख्य विक्रम युसुफ यांच्या नावावर आहेत.
पाकिस्तानसाठी खेळणारे ते केवळ चौथे ख्रिश्चन क्रिकेटपटू होते. 2005 मध्ये त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि युसुफ यौहानाचे ते मोहम्मद युसुफ झाले. युसुफ यांनी 90 टेस्ट, 288 वनडे आणि 3 ट्वेन्टी20 सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं.
टेस्ट प्रकारात 24 तर वनडेत 15 शतकं त्यांच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील घटनांकरता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युसुफ यांच्यावर बंदी घातली. 2010 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.
शाहीद अस्लम (असिस्टंट कोच)
पाकिस्तानातील अव्वल प्रशिक्षकांमध्ये शाहीद अस्लम यांची नोंद होते. मोहम्मद रिझवानने जागतिक ट्वेन्टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. सलामीला येत वादळी खेळी करणं हे रिझवानचं गुणवैशिष्ट्य. रिझवानच्या अफलातून बॅटिंगचं श्रेय अस्लम यांना जातं.
मॅथ्यू हेडन (मेन्टॉर)
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज संघाचा धडाकेबाज सलामीवीर, तिन्ही प्रकारात आक्रमक पवित्र्यानिशी खेळलेला आणि सकारात्मक विचारसरणी बिंबवणारा मॅथ्यू हेडन संघाचा मेन्टॉर आहे.
103 टेस्टमध्ये 8625 रन्स, 161 वनडेत 6133 रन्स हेडनच्या नावावर आहेत. दोन्ही प्रकारात मिळून हेडनने 40 शतकं झळकावली आहेत.
मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर ही ऑस्ट्रेलियाची बिनीची जोडी होती. सलामीला येत असंख्य अविस्मरणीय खेळींसाठी हेडन प्रसिद्ध आहे.
खेळाचा सखोल व्यासंग आणि शास्त्रोक्त बैठक यामुळे हेडनची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मेन्टॉर अर्थात सल्लागारपदी नियुक्ती केली.
गेल्या वर्षी दुबईत झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतही हेडन पाकिस्तान संघाचा मेन्टॉर होता. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर हेडनने पाकिस्तानच्या संघाला मेजवानीसाठी घरी बोलावलं होतं. पाकिस्तानच्या संघातील युवा खेळाडूंसाठी हेडनची उपस्थिती मोलाची ठरताना दिसत आहे.
शॉन टेट (बॉलिंग कोच)
प्रचंड वेगाने भेदक बॉलिंग ही ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटची ओळख. बॅट्समनला गोंधळात टाकणाऱ्या अक्शनमुळे टेटचा सामना करणं कठीण असे. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरचा वर्ल्डकप जिंकला होता. या विजयात टेटचं योगदान निर्णायक होतं.
2010 मध्ये ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आगेकूच केली होती. त्यावेळीही टेट ऑस्ट्रेलिया संघाचा अविभाज्य घटक होता. दुखापतींमुळे टेटच्या कारकीर्दीला ग्रहण लागलं.
टेटने 3 टेस्ट, 35 वनडे आणि 21 ट्वेन्टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. आयपीएल स्पर्धेत टेट राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो पेशावर झाल्मी संघाचा भाग होता. खेळणं थांबल्यानंतर टेटने मार्गदर्शनाचं काम हाती घेतलं. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्या, मैदानाचा आकार, वातावरण याविषयी सखोल माहिती असल्याने टेटचा अनुभव पाकिस्तानच्या बॉलिंग चमूसाठी महत्त्वाचा ठरतो आहे.
अब्दुल माजीद (फिल्डिंग कोच)
न्यूझीलंडविरुद्ध सेमी फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत पाकिस्तानने कॅचेस आणि रनआऊट यामध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी रन्सना ब्रेक लावणं आवश्यक असतं.
जेवढ्या रन्स वाचवल्या जातात तेवढं पाठलाग करताना दडपण कमी राहतं. पाकिस्तानने दोन पराभवानंतर फिल्डिंगच्या मुद्यावर विचारपूर्वक काम केलं आहे.
तांत्रिक टीम
मन्सूर राणा-मॅनेजर ड्रिकूस सिमोन- ट्रेनर- स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच क्लिफ डेकॉन- फिजिओथेरपिस्ट इब्राहिम बादिस- मीडिया मॅनेजर लेफ्टनंट कर्नल असिफ मोहम्मद- सेक्युरिटी मॅनेजर ताल्हा एझाझ- टीम अनालिस्ट मलंग अली- मसाझर डॉ.नजीबुल्ला सोमरो- टीम डॉक्टर