Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार पुन्हा नाराज? अब्दुल सत्तार यांच्या विधानावर पवार शांत का?

ajit pawar
, गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:20 IST)
दीपाली जगताप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र अद्याप यावर भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेला बळ मिळालं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार म्हणाले, “येत्या काळात अधिवेशन होईल तेव्हा सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न ते मांडतील. याचा ते अभ्यास करत असतील. ते आजारीही असू शकतात. व्यक्तिगत कामामुळे बाहेर गेले असतील काय माहिती. त्यामुळे उगीच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा ते येतील तेव्हा तेच सांगतील.”  
 
केवळ रोहित पवार नव्हे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेत्या विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही अजित पवार नाराज नसल्याचं स्पष्टिकरण द्यावं लागत आहे. तेव्हा अजित पवार यांनी मौन बाळगलं आहे का? आणि ते पक्षात नाराज आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  
 
खरं तर गेल्या काही काळातील ही पहिलीच वेळ नाही जेव्हा अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा होत आहे. तसंच हे एकमेव कारणही नाही.
 
नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे पार पडलं. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार थेट रुग्णालयातून अधिवेशनाला पोहोचले परंतु त्यावेळी अजित पवार  गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
 
‘अजित पवार गप्प का?’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी ‘मौन बाळगणं’ असो किंवा ते ‘नॉट रिचेबल’ असोत अजित पवार यांच्या या भूमिका महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत इतर नेत्यांची वर्चस्वासाठीची चढाओढ किंवा त्यासाठीचं राजकारण लपूनही राहिलेलं नाही.
 
शरद पवार यांचा मुख्य वारसदार कोण? या प्रश्नाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे की अजित पवार की पक्षातले इतर अनुभवी नेते अशी स्पर्धा सुरू आहे का? असाही प्रश्न अनेकदा पत्रकारांकडून विचारला जातो आणि म्हणूनच अजित पवार यांची नाराजी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरते.  
 
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (7 नोव्हेंबर) एका चॅनेलच्या पत्रकाराशी बोलताना ऑन कॅमेरा सुप्रिया सुळेंना अश्लील शिवी दिली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुंबई, रायगड, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली.
 
मुंबईतील सत्तार यांच्या सरकारी बंगल्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घराच्या काचा फोडल्याचं समोर आलं. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सत्तार यांच्या विधानाप्रकरणी अहवाल सादर करावा, अशी सूचना केली.  
 
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली. यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी (8 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
 
हे विधान समोर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी (8 नोव्हेंबर) खासदार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर आली.
 
सुप्रिया सुळे यांनी लिहिलं, "महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात".
 
यानंतर महाविकास आघाडीतल्या महिला नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
 
हा संपूर्ण घटनाक्रम घडत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. तसंच सोशल मीडियावर सक्रिय असणारे आणि सत्तारांचं विधान ज्यादिवशी व्हायरल झालं त्याच दिवशी ट्वीटरवर EWS आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपलं मत मांडणारे अजित पवार सत्तारांच्या वक्तव्यावर मौन राहिले.
 
या पार्श्वभूमीवरच अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या आता समोर येत आहेत.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, “पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनांमधून नाराजीच्या बातम्या आल्या तेव्हापासून अजित पवार शांत आहेत. ते कुठल्याही विषयावर फार बोलत नाहीत किंवा समोर येत नाहीत. त्यामुळे सध्या ते फोकसमध्ये दिसत नाहीत. यामागे काही त्यांची वैयक्तिक कारणं आहेत की ते पक्षात नाराज आहेत? हे अद्याप स्पष्ट नाही.”
 
अजित पवार गप्प आहेत हे मात्र खरं आहे असंही अभय देशपांडे यांना वाटतं.
 
ते म्हणाले, “अजित पवार वेगळी काही भूमिका घेण्याच्या तयारीत सध्यातरी दिसत नाहीत किंवा तशा हालचाली सध्यातरी दिसत नाहीत. पावसाळी अधिवेशनात ते सक्रिय होते आणि त्यांनी आक्रमक भूमिका सुद्धा मांडली. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय दिसत नाहीत हे खरं आहे.”   
 
अजित पवार गप्प आहेत यामागे अनेक शक्यता असू शकतात असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांना वाटतं.
 
ते म्हणाले, “यापूर्वी असं दिसून आलं आहे की असे अंदाज बांधल्यावर त्यांनी भाषणात याचा समाचार घेतला आहे. त्यामुळे कदाचित ते नंतरही याविषयावर बोलतील. किंवा त्यांची काही वेगळी रणनीती असू शकेल. पक्षात अंतर्गत धूसफूस असू शकते. हे सुद्धा कारण असू शकतं. त्यामुळे अनेक शक्यता आहेत. ते बोलत नाहीत तोपर्यंत ही बाब स्पष्ट होणार नाही.”
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय म्हणाले?  
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, “अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही ते त्यांच्या आजोळी काही कारणास्तव गेले आहेत आणि त्यांच्या बहिणीविषयी कोणीतरी आक्षेपार्ह बोलणं यांवर त्यांनी भाष्य करण्याची गरज नाही तसेच अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करू नका.”
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनीही राज्यपालांची यासंदर्भात भेट घेतली.
 
यावेळी विद्या चव्हाण यांनाही अजित पवार यांच्या मौन बाळगण्यावर प्रश्न विचारला. यावर विद्या चव्हाण म्हणाल्या, “अजित पवार हे यावर नक्की बोलतील आणि आक्रमक बोलतील. त्यांचा काही प्रश्नच नाही.”
 
2019 विधानसभा निकालानंतर जनतेने महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी पाहिल्या आहेत. यापैकीच एक घटना म्हणजे अजित पवार आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी.  
 
या घटनेनंतर अजित पवार यांच्या राजकारणाकडे आणि भूमिकांवरही संशयाच्यादृष्टीकोनातून पाहिल्याचं दिसून येतं.
 
राज्यस्तरीय अधिवेशनात गैरहजर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दावा करतात त्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार आगामी काळात व्यक्त होतील सुद्धा परंतु अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा असण्याचं हे एकमेव कारण नाही.
 
नुकतंच शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांनी जवळपास तासभर भाषण केलं. परंतु  दुसऱ्या दिवशी मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर होते. त्यांच्या वैयक्तिक कामामुळे ते एका कार्यक्रमासाठी गेले असंही कारण देण्यात आल्याचं नंतर बोललं गेलं.   
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून थेट अधिवेशनला हजेरी लावली. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु अजित पवार मात्र उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनातही याची चर्चा झाली.
 
शरद पवार आजारी असतानाही शिर्डीत कार्यक्रमाला हजेरी लावतात परंतु अशावेळी अजित पवार मात्र गैरहजर राहतात हे जाहीरपणे दिसून आल्याने कार्यकर्त्यांमध्येही याची चर्चा रगंली.
 
भारत जोडो यात्रेतही सहभागी होणार नाहीत?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या यात्रेत राज्यातले महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत.
 
महाविकास आघाडीतले नेतेही राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी या यात्रेत सामील होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार असे अनेक नेते आगामी काळात राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी होणार आहेत.
 
तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा 11 नोव्हेंबरला राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ यात्रेत हजेरी लावणार आहेत.  मात्र अजित पवार भारत जोडो यात्रेसाठी जाणार असल्याचं अद्याप स्पष्ट नाही.  
 
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार सुद्धा या यात्रेत सहभागी होणार नाहीत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे हे नेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहभागी होणार आहेत.
 
 
 
‘मी पक्षात नाराज नाही’
सप्टेंबर 2022 महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
 
अजित पवार यांना राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करू न दिल्याने ते नाराज आहेत अशा बातम्याही समोर आल्या. यामुळे अजित पवार यांना आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं.
 
दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मुख्य फोकस हा शरद पवार पुन्हा एकदा पक्षाचे 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून निवडणं हा होता. पण अधिवेशन संपेपर्यंत तो फोकस अजित पवारांवर गेला आणि तेही त्यांनी न केलेल्या भाषणामुळे.
 
अजित पवारांच्या या न झालेल्या भाषणावरून उलटसुलट चर्चा एवढी आहे की 'मी पक्षात नाराज नाही' असं स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. ते देऊनही प्रश्न थांबले नाहीत तर 'स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का की मी नाराज नाही?' असंही विचारावं लागतं आहे.
 
नाराजीची काही उदाहरणं
अजित पवारांबद्दल त्यांचे पाठीराखे नेहमी ते स्पष्टवक्ते आहेत आणि भावनिक पण आहेत असं सांगत असतात. त्यांच्या नाराजीच्या भावनेचा प्रत्यय यापूर्वीही अनेकदा आला आहे. अनेकदा अशा भावनेतून त्यांनी टोकाचे निर्णय घेतले आहेत.
 
 जेव्हा आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यानं व्यथित, नाराज होऊन त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यावेळेस पक्षातले नेतेही अचंबित झाले होते.
 
 2019 च्या विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी अचानक त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस अनेक अंतर्गत वाद सुरु होते. निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचं सरकार प्रत्यक्षात येणं जेव्हा नक्की झालं तेव्हा अचानक अजित पवारांचं बंड झालं आणि त्यांनी भाजपासोबत 80 तासांचं अयशस्वी सरकार स्थापन केलं.
 
असं म्हटलं जातं की अशी भाजपासोबत जावं या राष्ट्रवादीतल्या काहींच्या मताचे ते होते आणि तसं होत नाही म्हटल्यावर नाराज होऊन त्यांनी बंडाचं पाऊल उचललं.
 
राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया ताई आणि अजित दादा असे गट आहेत हे कायम म्हटलं जातं. त्या स्पर्धेतूनही पक्षांतर्गत असे प्रसंग घडले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही नेतृत्वाच्या स्पर्धेतलं एक नाव आहे.
 
या वर्चस्वाचा भावनेतून नाराजी नाट्य तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. जे दिल्लीत घडलं ते गंभीर नाराजी नाट्य होतं किंवा नव्हतं यासाठी आता राष्ट्रवादीतल्या पुढच्या घडामोडींवर सगळ्यांचं बारीक लक्ष असेल.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकच्या सिडको कार्यालयाबाबत शासनाने नव्याने दिले “हे” आदेश