Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्याकडून बचाव, ईडीच्या चौकशीतून काही निघणार नसल्याचं केलं वक्तव्य

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्याकडून बचाव, ईडीच्या चौकशीतून काही निघणार नसल्याचं केलं वक्तव्य
, बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (15:34 IST)
राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीतून काही निघेल असं मला वाटत नाही, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
 
राज ठाकरे यांना गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यलयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज करमाळ्याच्या माजी आमदार रश्मी बागल आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
 
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज यांना आलेल्या नोटिशीबाबत विचारलं असता 'त्यातून काही निघेल असं वाटत नाही' असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
 
कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत अंमलबजावणी संचालनालयानं (ईडीनं) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांना आलेल्या नोटीशीबाबत त्यांची भूमिका मांडणारं पत्रकच प्रसिद्ध केलं आहे.
 
"इतक्या वर्षांत तुम्हाला-मला केसेस आणि नोटिशांची सवय झाली आहे. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, की येत्या 22 ऑगस्टला तुम्ही शांतता राखा," असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
 
हे वक्तव्य भाऊ आणि नेते या दोन्ही अनुषंगाने
उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य एक भाऊ आणि एक राजकीय नेता या दोन्ही अनुषंगांनी आलं असल्याचं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं आहे.
 
"उध्दव आणि राज यांचे कितीही वाद असले तरी ते ठाकरे आहेत. त्यांचं रक्ताच नातं आहे. आपण पी. चिदंबरम यांची अवस्था आज बघतोय. आज कुठल्या ठाकरेवर दोषारोप लागून तश्या पध्दतीने चौकशी व्हावी असं उध्दव ठाकरे यांनाही वाटणार नाही.
 
याआधीही जर आपण बघितलं तर उध्दव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा राज ठाकरे मतभेद बाजूला ठेवून लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी धावून गेले होते. त्यानंतर ते स्वतः गाडी चालवत उध्दव यांना घरी घेऊन आले होते. त्यामुळे कौटुंबिक गोष्टीत ते वेळोवेळी एकत्र दिसतात," संदीप प्रधान सांगतात.
 
"जर राज यांच्याभोवती ईडीचा फास आवळला गेला. तर कदाचित त्यांचे कार्यकर्ते पेटून उठू शकतात. आजच जर आपण पाहीलं तर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्याने त्यांना नोटीस आली म्हणून आत्महत्या केली. जर अश्या पध्दतीने कार्यकर्ते पेटून उठले तर राज्यात मनसे हा पक्ष संपत आल्याचं जे चित्र आहे ते बदलू शकतं. हा पक्ष पुन्हा एकदा उभारी घेऊ शकतो.
 
भाजप ज्या पध्दतीने स्वबळाची भाषा करतंय त्यानुसार शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्यासाठीसुद्धा मनसेचा वापर केला जाऊ शकतो. शिवसेनेला जास्तीत जास्त मनसेकडून त्रास दिला जावा मग या चौकशीचा फास सैल करू असंही भाजपकडून सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे यामागे असं राजकारणही असू शकतं."
 
म्हणून उध्दव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं आहे ते एक भाऊ म्हणून तर आहेच पण एक राजकीय नेता म्हणूनही सावधगिरीचं हे वक्तव्य असल्याचं प्रधान यांना वाटतं.
 
राजकीय किनार नाही
दुसरी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना मात्र उद्धव यांच्या या वक्तव्याला कुठलीही राजकीय किनार नसल्याचं वाटतं.
 
ते सांगतात, "ही बातमी आल्यानंतर संजय राऊत यांनी 'ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ती तिचं काम करेल' असं म्हणत हात झटकले होते. पण दुसरीकडे उध्दव ठाकरेंनी या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं म्हटलं.
 
या ईडी प्रकरणात राज ठाकरेंबरोबर शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीचाही सहभाग आहे. मनोहर जोशी हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. तसंच राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांचे व्यक्तीगत संबंध उध्दव यांच्या हृदय शस्त्रक्रीयेनंतर सुधारल्याचं सर्वांनीच पाहिलंय. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना स्पष्ट भूमिका घेणं भाग होतं, त्यादृष्टीनं त्यांनी हे वक्तव्य केलय. उध्दव ठाकरेंच्या या वक्तव्यामध्ये कुठे राजकीय किनार आहे असं वाटत नाही."
 
मनसेकडून स्वागत
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे.
 
"राज्यातले सर्वच पक्ष हे उघडपणे बोलत आहेत की चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. हे राजकीय आहे. भाजपचे नेतेही हे बोलतात फक्त ते खाजगीत बोलतात हे ऐवढचं आहे. उध्दव ठाकरे तर महाराष्ट्राचे जेष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना यातल्या गोष्टी माहिती असतीलच म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलय," असं संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकच्या सेटिंगमध्ये 'हा' बदल करा आणि जपा तुमची प्रायव्हसी