Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे दसरा मेळावा : ‘देवेंद्र फडणवीस आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार’

uddhav thackeray
, बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (21:05 IST)
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरजार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर बोलताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याच्या आधी 'भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल,' असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला होता.
 
त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी "देवेंद्र फडणवीस आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार," असं म्हटलंय.
 
जर तुम्ही साथ दिली तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असं आवाहनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलं.
 
कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन मी हिंदुत्व वाढवलं, असा दावासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शिवाजी पार्कवर 50 खोक्यांच्या रावणाचं दहन करण्यात आलं.
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : -
 
असा मेळावा फार क्वचित झाला आहे. ही आलेली गर्दी कोरडी नाही. मी किती बोलू शकेन माहिती नाही.
डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिली नाही, पण मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो.
गद्दारांची मंत्रिपद काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कायम राहील.
इथं एकही माणून भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही.
यावेळेचा रावण वेगळा आहे. आतापर्यंत 10 तोंडाचा होता. आता 50 खोक्यांचा खोकासूर, धोकसूर झाला आहे.
मी दवाखान्यात असताना कटप्पाने माझा घात केला.
शिंदे गटाला माझ्या तेजाचा शाप आहे.
भाजपला धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.
मी शिवसेना पक्षप्रमुखपदी राहायचं की नाही हे शिवसैनिक ठरवणार.
मी आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो, भाजप बरोबर अडीच वर्षांचा करार झाला होता.
इतरांना बाजूला सारून याला (एकनाथ शिंदे) आमदार केला. मंत्री केला. आता हा मुख्यमंत्री झाला तर आता शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. आहे का लायकी? तुम्ही स्वीकारणार का त्यांना पक्षप्रमुख म्हणून?
देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांना कायदा चांगला कळतो. पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले. पुन्हा आले आणि दीड दिवसांत विसर्जन झालं. परत उपमुख्यमंत्री म्हणून आले. कायद्याच्या चौकटीत बोला. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची?
देवेंद्र फडणवीस कायदा तुम्हालाच कळतो असं नाही आम्हालाही कळतो.
जर असा कायदा असेल तर आम्ही तो जाळून टाकू. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर तुम्ही कुरवाळत बसा.
पाकिस्तानमध्ये जिन्नांच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक होणारे तुमचे नेते आहेत.
भाजपकडून तर मला हिंदूत्व शिकायची गरजच नाही. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता केक खाणारा तुमचा नेता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार?
गायीवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला. आरएसएसचे होसबाळे यांचे मी जाहीर अभिनंदन करतो. वाढती महागाई, बेकारी यावर त्यांनी आरसा दाखवला आहे. मोदी जेव्हा 5G च्या कार्यक्रमात कौतुक करत होते. तेव्हा होसबाळे त्यांना आरसा दाखवला.
सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपिठावर यावं. मी माझं हिंदुत्व सांगतो, त्यांनी त्यांचं सांगावं.
ही बाप चोरणारी औलाद आहे. स्वतः च्या बापाला काय वाटत असेल की त्यांच्याऐवजी दुसर्‍याचं नाव वापरतात. स्वतःच्या बापाच्या नावावर मतं मागा.
तिकडे खूप ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्या आहेत. सगळ देऊनही रडगाणं...
अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? या राज्यामध्ये जा, त्या राज्यामध्ये जा... इकडे काड्या घाला, तिकडचं सरकार पाडा... पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमिन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. कशाला पाहीजेत गद्दार...
अमित शहा आम्हाला जमीन दाखवा, पण ती पाकव्यप्त काश्मीरमधली दाखवा.
मिंधे सरकार झुकलेलं आहे. पुष्पा पिक्चर आला होता ना... झुकेगा नही साला... तसं यांचं उलटं आहे. उठेगा नही साला.... यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होतायेत. त्यातले 90 दिवस दिल्लीत गेले असतील. दिल्लीत मुजरा गल्लीत गोंधळ.
देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहेत. मोहन भागवत मधल्या काळात मशीदीत गेले होते. कशाला गेले होते? हिंदुत्व सोडलं? ते गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य आणि आम्ही कॉंग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडलं?
भाजपचं स्क्रिप्ट न घेता शिंदेंनी भाषण करून दाखवावं.
पाच वर्षांत हे अशोक चव्हाणांना जाऊन कसे भेटले होते याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहेच.
काँग्रेस- राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवलं.
जर तुम्ही साथ दिली तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
माझा तर असा विचार होता, या सभेला येण्याऐवजी तिकडे जाऊन नव्या हिंदुत्वाचे विचार ऐकून यायचे. आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल अशी पाटी लागली का बघायला पाहीजे. कार्यालय ईडी...
पूर्वी एक नाटक होत 'तो मी नव्हेच...! हे उलटे आहेत तो मीच... हे तोतय्ये जे जातायेत ते म्हणतायेत मीच बाळासाहेब ठाकरे... या तोतय्यांना आपली शिवसेना पळवायची आहे. तुम्ही घेऊ देणार आपली शिवसेना?
मी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन मी हिंदुत्व वाढवलं.
माझ्यासोबत निखाऱ्यांवर चालण्याची तयारी आहे का तुमची? तुम्ही मला साथ आणि वचन द्या. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
एक बरं झालं बांडगूळं छाटली गेली. वृक्षाची मुळं जमिनीत असतात.
शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांमध्ये यंदाचा मेळावा इतिहासात वेगळा नोंदवला जाण्याची शक्यता आहे.
 
यंदा पहिल्यांदा आपणच शिवसेना असल्याचा दावा करत शिवसेनेचे 2 गट 2 वेगवेगळे मेळावे घेतले. उद्धव ठाकरे यांच्या गटानं त्यांचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करत नेहमी प्रमाणे शिवजीपार्कवर मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं होतं.
 
या मेळाव्यात उद्धव ठाकरे गटानं संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांची खूर्ची रिकामी ठेवली. तर शिंदेंच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची खूर्ची रिकामी ठेवली गेली.
 
उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यासाठी राज्यभरातून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला. तर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यातसुद्धा राज्यभरातून बसमधून लोक आले.
 
एकनाथ शिंदेंच्या सभेत ठाकरेंच्या सून स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांनी हजेरी लावली.
 
शिवाजी पार्कवर पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं.

Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे दसरा मेळावा: 'आमच्या भूमिकेला सामान्यांकडून पाठिंबा, त्यामुळेच गर्दी'