Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनलॉक 4 : दिल्ली मेट्रो पुन्हा सुरू झाल्याचा आनंद एका मुंबईकराला का झाला?

अनलॉक 4 : दिल्ली मेट्रो पुन्हा सुरू झाल्याचा आनंद एका मुंबईकराला का झाला?
, सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (13:15 IST)
उजवीकडे यमुनेच्या पात्रात वसलेल्या शेतजमिनी आणि डावीकडे निवासी इमारती अशी मयुर विहार एक्सटेन्शन मेट्रो स्टेशनची रचना आहे.
 
दिल्ली मेट्रोत द्वारका ते नोएडा धावणाऱ्या ब्ल्यू लाईन मार्गावरचं हे निवांत पहुडलेलं स्टेशन. सकाळचे दोन-तीन तास सोडले तर गर्दी नाही.
 
कोरोना आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात घरासमोरचं ओकंबोकं स्टेशन पाहताना विषाणूचा घाव किती खोलवर बसलाय याची जाणीव व्हायची. पहाटेपासून रात्रीपर्यंत सुळसुळत पळत राहणाऱ्या मेट्रोची धाव कोरोनाने अनिश्चित काळ रोखून धरली. मेट्रोऐवजी अॅम्ब्युलन्सचे आवाज कानी पडू लागले. प्रसन्न सकाळी कवडसे प्लॅटफॉर्म न्हाऊन काढत असताना, रिकाम्या दुपारी उन्हाचा प्रकोप होताना आणि शीतल चांदण्या रात्री स्टेशन एकाकी पडलेलं दिसायचं.
 
अंधार पडल्यावर स्टेशनमधले कृत्रिम दिवे उजळून निघायचे. पण दूरदूरपर्यंत राजधानी दिल्लीला संजीवनी देणाऱ्या मेट्रोचं दर्शन व्हायचं नाही. कॅलेंडरची पानं उलटत गेलो, महिने सरकत गेले. अखेर 170हून अधिक दिवस सक्तीचा ब्रेक घेतल्यानंतर सोमवारच्या (7 सप्टेंबर) प्रातःकाळी दिल्ली मेट्रोचं आवर्तन सुरू झालंय. शहराची लय पूर्वपदावर येत असल्याचं लक्षण.
 
पहाटे 3.07 आणि अपरात्री 2.26 वाजताही मुंबई लोकलचा लाभार्थी असणाऱ्या मुंबईकरासाठी दिल्लीत मेट्रो सुरू होताना पाहणं म्हणजे जगण्यासाठी मिळालेला ऑक्सिजनच आहे.
 
मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास करणं म्हणजे विश्वरुपदर्शन आहे. संयमाची, शारीरिक कणखरतेची, चिवटपणाची, संवादकौशल्याची कसोटीच जणू. सकाळी खरंतर पहाटेपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातून जनांचा प्रवाह मुंबईच्या दिशेने कामासाठी ओसंडून वाहत राहतो. 8.10ची फास्ट पकडणं हे अनेकांसाठी आद्य कर्तव्य असतं. दिवसाचं वेळापत्रक रेल्वेकेंद्रित असतं.
 
गच्च भरून आलेल्या ट्रेनमध्ये उडी मारून आत जाणं, बसायला जागा मिळावी यासाठी फिल्डिंग लावणं, आपली बॅग वरती डोक्यावरच्या बॅगांच्या चळतीत घुसवणं, आपल्या सगळ्या वस्तू जागेजमी आहेत ना याची चाचपणी करणं आणि मोबाईलचे इअरफोन काढून गर्दीतही बेट होणं हे अनेकांचं आयुष्य असतं.
 
दोस्तांचा ग्रुप असेल तर ट्रेन्डिंग टॉपिकवर गप्पा सुरू होतात. काल रात्री झालेल्या मॅचवर गप्पा रंगतात. नॉन व्हेज जोकवर हशा पिकतो. खांदेपालटाच्या स्टेशनवर म्हणजे बसलेली माणसं उठतात आणि पॉकेटमध्ये उभं असणाऱ्यांना बसायला देतात. माणुसकीचा धर्म. या स्टेशनवर गाडी येताच प्लॅटफॉर्मवरच्या कॅन्टीनमधून वडे,समोसे घेतले जातात. अवघ्या काही सेकंदात देवाणघेवाण होते.
 
चौरस फूटात जास्तीत जास्तीत माणसं कोंबून भरलेल्या त्या डब्यातून बाजूने मंदिर गेलं की घोषणा दिल्या जातात. प्रत्येक स्टेशनवर 'अंदर चलो' म्हणत माणसं शिरत राहतात. श्वास घुसमटून जातो. कपड्यांना केलेली इस्त्री विस्कटून जाते, बॅगेचा बंद तुटून हातात येतो. रेटारेटी-ताणाताणी, शिव्यांची लाखोली रोजचीच. उन्हाळ्यात घाम आणि पावसाळ्यात पाणी जीव काढतं. तिकीट काढतोय, पास काढतोय मग आपल्याच नशिबी असं कीडामुंगी आयुष्य असा विचार प्रत्येकाच्या मनात रोज एकदा तरी येतोच. पण 'पापी पेट का सवाल' म्हणून माणसं करत राहतात.
 
आधी शिक्षण, नोकरी आणि एरव्हीही मी मुंबई लोकलचा लाभार्थी. कामाच्या निमित्ताने दिल्लीत आलो आणि दिल्ली मेट्रोचं दालन खुलं झालं. राजधानी असूनही अगदी वीस वर्षांपूर्वी दिल्लीत वाहतुकीची दैना असायची असं स्थानिक सांगतात. लोकल ट्रेन नव्हत्याच, मेट्रोही नव्हती. ब्ल्यू लाईन बसेस होत्या पण त्यांना शिस्तीचं वावडं होतं. कुठूनही कुठे जाणं शिक्षा होती. रस्ते चांगलं होते पण जायला धड अशी वाहतूक व्यवस्थाच नव्हती.
 
2002 मध्ये दिल्ली मेट्रोची पहिली लाईन सुरू झाली. 18 वर्षांनंतर दिल्लीभर मेट्रोने आपलं जाळं विणलं आहे. नावांच्या नावाने होणारे वाद लक्षात घेऊन इथे वेगवेगळ्या रुट्सना रंगांची नावं आहेत. ब्ल्यू, रेड, व्हायोलेट, पिंक, यलो, ग्रीन, मजेन्टा, ग्रे, ऑरेंज. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या उपक्रमासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन स्थापण्यात आलं.
 
मार्ग ठरवणं, जमीन अधिग्रहण, रेल्वेमार्ग तयार करून स्टेशनं उभारणं, सिग्नलिंग या सगळ्याची जबाबदारी डीएमआरसीची. मुख्य दिल्ली, नोएडा, द्वारका, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगाव अशी सगळी टोकं मेट्रोने जोडलेली आहेत. सध्याच्या घडीला 9 मार्ग आहेत, अडीचशेहून अधिक स्टेशन्स आहेत आणि जवळपास 400 किलोमीटरचा पसारा आहे. पास म्हणून मिळणारं कार्ड सगळ्या रूटवर चालतं. अंडरग्राऊंड आणि एलिव्हेटेड असे दोन्ही प्रकार आहेत. 2700हून अधिक फेऱ्या होतात.
 
मुंबईतली लोकल आणि मेट्रोच्या तुलनेत दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या अर्थातच कमी आहे. दिल्लीत स्वत:च्या गाडीने कामावर जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. ट्रॅफिक जॅममध्ये अडकूनही अनेकजण स्वत:च्या गाडीने जाणं पसंत करतात. मुंबईकरांचं जगणं लोकल ट्रेनकेंद्रित आहे. ऑफिस ते घर हे अंतरही बरंच आहे. रस्त्यांची दुरवस्था, ट्रॅफिक जॅम, लागणारं इंधन, लागणारा प्रचंड वेळ यामुळे उपनगरातल्या माणसांसाठी ऑफिस गाठण्यासाठी लोकल ट्रेनसारखा दुसरा पर्यायच नाहीये.
 
सकाळी मुंबईच्या दिशेने, संध्याकाळी उपनगरांच्या दिशेने असे हजारोंचे लोंढे जातात आणि येतात. दिल्लीतही गर्दी असते पण सहन करण्याएवढी असते. मुंबईत जागेची टंचाई आहे, पाऊस तुफान पडतो. दिल्लीत या दोन्ही गोष्टी नाहीत. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या प्रकल्प राबवणं सोयीचं होतं. मुंबईसारखीच दाटीवाटीची लोकसंख्या दिल्लीतही अनेक ठिकाणी आहे.
 
माणसं, घरं, दुकानं, वायरींचं जंजाळ, प्रार्थनास्थळं, गाड्या असा कल्लोळ दिल्लीतल्या अनेक भागात आहे. मुंबईत काहीठिकाणी स्वच्छतेची ऐशीतैशी आहे, दिल्लीतही तसे भाग आहेत. पण दिल्ली मेट्रोने यासगळ्याला टक्कर देत सक्षम यंत्रणा उभारली आहे. थंडगार एसीवाल्या मेट्रोमुळे उन्हाळ्यात मेट्रोने प्रवास करणं सुखकर होतं.
 
मेट्रो तिकिटाचे दर जास्त असले तरी सर्वसामान्यांना परवडू शकतील असे आहेत. नियमांच्या बाबतीत दिल्ली मेट्रो काटेकोर आहे. सुरक्षायंत्रणा पार केल्याशिवाय स्टेशनात जाताच येत नाही. मुंबईत लोकलच्या स्टेशनांवर गाड्या घुसल्याचे प्रकार घडलेले आहेत.स्टेशनातून बाहेर पडतानाही आखून दिलेल्या मार्गानेच जावं लागतं.
 
दिल्ली मेट्रोत, स्टेशनवर थुंकल्यावर कारवाई होते. स्टेशनांमध्ये सातत्याने साफसफाई होते. मुंबईतही नियम आहेत पण तरी थुंकून रंगाच्या पिचकाऱ्या नेहमी उडताना दिसतात. दिल्ली मेट्रोत प्लॅटफॉर्मवर खायची प्यायची दुकानं नाहीत. जास्तीत जास्त प्रवास दोन तासाचा असल्याने खाणंपिणं नाही मिळालं तरी होऊ शकतं. मुंबईत बहुतांश प्लॅटफॉर्मवर कॅन्टीन असतं. दिल्ली मेट्रोच्या स्कायवॉक, सबवेत फेरीवाले, भिकारे, गर्दुल्ले, डासांची रॅकेट विकणारे, डासांची रॅकेट विकणारे अशा कोणालाच परवानगी नाही. त्यामुळे प्रवाशांना जाणंयेणं सोपं होतं.
 
दिल्लीत व्हीआयपी एरिया आहेत, लष्कराचा भाग आहे. मात्र तरीही दिल्ली मेट्रोने एकेक करत असंख्य भागांना जोडण्याचं काम केलं आहे. मेट्रो आल्यामुळे अनेक भागांना ऊर्जितावस्था आली आहे. प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचं आश्वासन पाळलं जातं. म्हणूनच 18 वर्षात एवढे मार्ग आकारास येऊन कार्यान्वित झालेत. आताही दिल्लीचे काही भाग मेट्रोपासून दूर आहेत. त्यांना मेट्रोच्या कक्षेत आणण्यासाठी सबरूट, छोट्या लाईन्सचं काम सुरू आहे. मुंबई लोकलचा पसारा अजस्त्र आहे.
 
सेंट्रल, हार्बर, ट्रान्स हार्बर, वेस्टर्न यावरून लाखो माणसं प्रवास करतात. लोकलच्या बरोबरीने एक्स्प्रेस आणि गुड्स ट्रेनचीही वाहतूक असते. व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. मुंबईच्या पोटात मेट्रोचं काम सुरू आहे. परंतु या मेट्रोच्या मार्गात किती अडथळे आलेत हे आपण पाहतोच आहे. उशीर होत गेला की खर्चही वाढतो. कोणताही पायाभूत प्रकल्प उभारायचा असेल तर राजकीय इच्छाशक्तीही लागते.
 
कोणत्याही मोठ्या शहरांसाठी सक्षम अशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा असणं अतिशय गरजेचं असतं. सर्वसमावेशक, प्रवाशांना सोयीचं ठरेल आणि परवडेल असं प्रारुप दिल्ली मेट्रोने विकसित केलं आहे. नियमांबाबत कठोर राहिलं तर लोक नियम पाळू लागतात हे दिल्ली मेट्रोने दाखवून दिलं आहे. प्रवाशांना ज्या अडचणी येतात त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळल्यावर त्याची दखल घेऊन, शहानिशा करून कार्यवाही केली जाऊ शकते हे सिद्ध झालं आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबई आर्थिक राजधानी आहे. मुंबईत दररोज अमानवी पद्धतीने प्रवास कराव्या लागणाऱ्या मुंबईकरांना असा सुखनैव प्रवास करता येणार का?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र