Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिंदेश्वर पाठक: भारतात शौचालय क्रांती आणणाऱ्यांकडे अमेरिकेनेही मागितली होती मदत

बिंदेश्वर पाठक: भारतात शौचालय क्रांती आणणाऱ्यांकडे अमेरिकेनेही मागितली होती मदत
, बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (15:26 IST)
सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचं मंगळवार 15 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात निधन झालं.
 
सुलभ इंटरनॅशनलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आर. सी. झा यांनी बीबीसीला सांगितलं, सुलभ इंटरनॅशनलच्या मुख्यालयात सकाळी पाठक यांनी झेंडावंदन केलं. आमच्याशी चर्चा केली, त्यांची तब्येत तेव्हा नीट होती. मात्र नंतर अचानक त्यांना त्रास सुरू झाला म्हणून एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर कार्डिऍक अरेस्टने त्यांचं दुपारी 1.30 वाजता निधन झालं.
 
बिंदेश्वर पाठक यांनी 1970 च्या दशकात सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विसेसचा पाया घातला होता. त्यांच्या कामासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
 
या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशात बसस्थानकं, रेल्वेस्थानकं आणि इतर सार्वजनिक जागांवर शौचालयं बांधली होती.
 
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिंदेश्वर पाठक यांचं निधन झाल्यावर दुःख व्यक्त केलं आहे.
 
राष्ट्रपती मूर्मू यांनी एक्स वर लिहिलं आहे, "पाठक यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदलांना सुरुवात केली. त्यांना पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचं कुटुंब आणि सुलभ इंटरनॅशनलच्या सदस्यांप्रती मी दुःख आणि सहवेदना व्यक्त करते."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे, "पाठक हे स्वप्नदर्शी व्यक्ती होते. त्यांनी समाजाची प्रगती आणि उपेक्षितांना सशक्त करण्यासाठी भरपूर काम केलं. बिंदेश्वरजी यांनी स्वच्छ भारतला स्वतःचं मिशनच केलं होतं. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली होती. अशा चर्चांमध्ये त्यांचा स्वच्छतेप्रति असलेला उत्साह दिसून येई. त्यांचं काम लोकांना प्रेरित करत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी मी त्याच्या कुटुंबाकडे सहवेदना व्यक्त करत करतो. ओम शांती."
 
'आधी संडास बांधा, मग स्मार्ट सिटी'
बिंदेश्वर पाठक यांनी स्मार्टसिटी योजनेबद्दल 2014 साली बीबीसीशी संवाद साधला होता. तेव्हा सरकारने आधी संडास बांधले पाहिजेत मग पैसे राहिलेच तर स्मार्ट सिटी तयार कराव्यात असं ते म्हणाले होते.
 
ते म्हणाले होते, "जिथं सगळ्या सोयी असतील अशा शहरात राहायला कुणाला आवडणार नाही. स्मार्ट सिटी योजना चांगली आहे. शहरांना सुंदर केलंच पाहिजे. स्वच्छ, सर्व सोयींनी युक्त, पर्यावरणीय दृष्टिने चांगली शहरं तयार केलीच पाहिजेत, त्याला कोणाचाच आक्षेप नसेल.
 
पण याची दुसरी बाजू पाहिलीत तर आपल्या देशात कोट्यवधी घरांत पक्के संडास नाहीत. मी तर सांगेन आधी सर्व घरांत संडास बांधा मग पैसे उरले तर स्मार्ट सिटी करा. शहरांचा विकास ही चांगली गोष्ट आहे पण गावांकडेेही लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे. गावंही स्वच्छ केली पाहिजेत."
 
''स्मार्ट सिटीचे स्वतःचे असे फायदे तोटे आहेतच. तोट्याचा विचार केला तर जितकी शहरं बनवू तितकी झाडं जातील, 24 तास ऊर्जेसाठी अणूऊर्जेची मदत घ्यावी लागेल. तिचे स्वतःचे असे तोटे आहेत. चांगली बाजू विचारात घेतली तर सुंदर शहरं कुणाला आवडणार नाहीत? फक्त तिच्या परिणामांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ''
 
''या निर्मितीच्या काळात झाडं तोडली जाणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राहिल. जगातील अनेक देशांत आधीपासूनच स्मार्ट सिटी आहेत भारतात हा नवा चांगला पायंडा मानला जाईल.''
 
भंगीमुक्ती प्रकोष्ठ
पाठक 1968 मध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ अध्यापनाचं काम करत हते. त्यानंतर बिहार गांधी शताब्दी सोहळा समितीमध्ये ते कार्यकर्ता म्हणून सहभागी झाले.
 
तिथं ते भंगी मुक्ती प्रकोष्ठमध्ये काम करत होते. तिथंच त्यांना मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्या लक्षात आल्या. त्यानंतर 1970 साली त्यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली.
 
त्याअंतर्गत त्यांनी सार्वजनिक शौचालंय बांधण्यास सुरुवात केली. उघड्यावर शौचाला जाण्याऐवजी सार्वजनिक जागी स्वच्छ शौचालयं हवीत हे त्यांच्या लक्षात आलं.
 
त्यांच्या संस्थेनं देशभरात सार्वजनिक जागी सुलभ शौचालयं तयार केली. कमीत कमी खर्चात बांधली जाणारी ही शौचालयं पर्यावरणपूरक मानली जातात.
 
सुलभ मॉडेलची शौचालयं ही सार्वजनिक शौचालय बांधणी क्षेत्रात क्रांतीच समजली जातात.
 
त्यांची संस्था मानवाधिकार, पर्यावरण, स्वच्छता आणि अपारंपारिक ऊर्जास्रोतांच्या विकास आणि नियमन, कचरा नियमन या विषयांसाठी काम करते. तसेच सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्याचं काम करते.
 
त्यांनी सर्वात आधी 1968 साली डिस्पोजेबल कम्पोस्ट शौचालयांची निर्मिती केली. ही शौचालयं कमी खर्चात घराच्या आसपास मिळणाऱ्या साधनांनी बनवली जाऊ शकतात.
 
याला जगभरात एक चांगलं तंत्र मानलं गेलं. त्यानंतर त्यांनी सुलभ इंटरनॅशनलच्याद्वारे देशभरात सुलभ शौचालयांची निर्मिती केली.
 
अमेरिकेच्या लष्करानं मागितली मदत
भारतासह अनेक देशांत शौचालयं निर्माण करण्यासाठी सुलभने प्रयत्न केले. 2011 साली अफगाणिस्तानात अमेरिकन लष्करासाठी एका विशिष्ट पद्धतीची शौचालयं तयार करण्याची योजना करण्यात आली.
 
सुलभने काबूलमध्येही शौचालयं बांधली होती. मात्र प्रथमच अमेरिकन लष्करानं त्यांच्याकडे यासाठी आग्रह केला.
 
अमेरिकी लष्कराने विशेष बायो शौचालयाची मागणी केली. स्वस्त आणि चांगली शौचालयं काबूलमध्ये सर्वत्र व्हावीत अशी मागणी अमेरिकेच्या लष्करानं केली होती.
 
सुलभ इंटरनॅशनलने काबूल नगरपालिकेसाठीही शौचालयं बांधली होती. त्यावेळेस पाठक बीबीसीला म्हणाले होते, ''आमच्या संस्थेने काही वर्षांपूर्वी काबूल नगरपालिकेसाठी काही शौचालयं बांधली होती मात्र आता अमेरिकन लष्करानं आमच्याकडे मदत मागितली आहे. ती आम्ही करत आहोत.''
 
आपलं तंत्रज्ञान इतर देशही वापरत आहेत ही या संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले होते. त्यावेळेस सुलभ इंटरनॅशनलने दक्षिण अफ्रिका, चीन, भूतान, नेपाळ आणि इथिओपियासह इतर देशांत शौचालयाचं तंत्रज्ञान दिल होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलाची लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पालक घेऊ शकतात का?