Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणूक: भाजप-सेनेत तिकीटवाटपावरून ‘या’ आठ मतदारसंघात तीव्र नाराजीनाट्य

Webdunia
गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (09:27 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख चार ऑक्टोबर आहे. त्यामुळं बहुतांश पक्षांनी आपल्या पहिल्या याद्या जाहीरही केल्या आहेत.
 
ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांचा जल्लोष सुरू असतानाच, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा तिकीट कापलं गेलं, त्यांची नाराजीही उघड होऊ लागलीये.
 
राज्यात ठिकठिकाणी नाराजीनाट्य दिसून येतंय. मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्या विरोधात अरविंद पाटील निलंगेकर, नाशिकमध्ये वसंत गिते, करमाळ्यात नारायण पाटील तसंच तिकीट नाकारलेले इतरही जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त करत आहेत.
 
बीबीसी मराठीनं राज्यातील आठ प्रमुख मतदारसंघाचा आढावा घेतलाय, जिथे टोकाची नाराजी पाहायला मिळत आहे.
 
1) औशात मुख्यमंत्र्यांच्या पीएला विरोध
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपनं अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर केलीये. अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत.
 
गेल्या 15 वर्षांपासून अभिमन्यू पवार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आहेत. वनवासी कल्याण आश्रममध्येही ते सक्रीय होते.
 
पण अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला औशातून विरोध होऊ लागलाय. पवार यांच्या उमेदवारीला भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी विरोध केला आहे. अरविंद पाटील हे राज्याचे कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे भाऊ आहेत.
 
शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांचाही अभिमन्यू पवारांच्या उमेदवारीला विरोध दिसून येतोय. युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार औसा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात असायचा. त्यामुळे यंदा ही जागा भाजपला गेल्यानंतर स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत.
 
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील हे औसा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 साली बसवराज पाटलांनी शिवसेनेच्या दिनकर मानेंचा पराभव केला होता.
 
2) नाशिक मध्य : फरांदेंना तिकीट, मनसेतून आलेले वसंत गिते नाराज
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनाच पुन्हा एकदा संधी दिलीये. फरांदेच्या उमेदवारीमुळं माजी आमदार वसंत गिते हे नाराज झाले आहेत.
 
वसंत गिते हे 2009 साली याच मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2014 साली ते पुन्हा आमदारकीला उभे राहिले, मात्र भाजपच्या देवयानी फरांदेंनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर वसंत गिते भाजपमध्येच दाखल झाले.
 
3) मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर नाराजी
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान आमदार सुधाकर कोहळेंना डावलून माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी जाहीर केलीये. त्यामुळे कोहळे नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवरची ही नाराजी आता चर्चेचा विषय ठरलीये.
 
माजी आमदार मोहन मते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मित्र असल्याचं बोललं जातं. कोहळेंनी मतेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "मित्रप्रेमामुळं तिकीट कापलं जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरचा अन्याय आहे."
 
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि काँग्रेस नेते दिनानाथ पडोले यांचा पराभव करून सुधाकर कोहळे 2014 साली विधानसभेत पोहोचले होते.
 
दरम्यान, सुधाकर कोहळेंच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जावून उमेदवारी का कापली याचा जाब विचारला. गडकरी यांनी या नाराजांची चर्चा करत त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. रात्री पुन्हा गडकरी या नाराजांची चर्चा करून समजूत काढणार आहेत.
 
4) करमाळ्यात रश्मी बागल यांना तिकीट, नारायण पाटील नाराज
सोलापुरातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नारायण पाटील हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना सेनेनं तिकीट दिलंय. त्यामुळं नारायण पाटील नाराज आहेत.
 
2014 साली नारायण पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शामल बागल यांचा पराभव केला होता.
 
5) वडाळ्याची जागा भाजपकडे, शिवसेनेत नाराजी
मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघात कालिदास कोळंबकर हे विद्यामान आमदार आहेत. ते सलग सातवेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आलेत. आधी शिवसेना, नंतर नारायणे राणेंसोबत काँग्रेसमध्ये आणि आता भाजपमध्ये दाखल झालेल्या कोळंबकरांना भाजपनं वडाळ्यातून तिकीटही दिलंय.
 
कोळंबकरांच्या उमेदवारीमुळं स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून येतीये. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज आहेत. हा मतदारसंघही शिवसेनेच्या वाट्याला येत असे. मात्र, आता भाजपनं घेऊन कोळंबकरांना उमेदवारी दिलीये.
 
श्रद्धा जाधव बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
 
6) लोह्यात भाजप खासदारा प्रताप पाटील चिखलीकर नाराज
नांदेडमधल्या लोहा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झालीये. युतीच्या नव्या फॉर्म्युल्यात लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आलाय. त्यामुळं नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसलाय.
 
2019 च्या निवडणुकी प्रताप पाटील यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीटही मिळालं. ते खासदार झाले.
 
लोह्यातून प्रताप पाटील चिखलीकर आपल्या मुलासाठी इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यानं ते नाराज झालेत.
 
7) कल्याण पश्चिम : मतदारसंघ पुन्हा सेनेकडे, भाजपचे विद्यमान आमदार नाराज
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार हे नाराज झाले आहेत. कारण हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळं नरेंद्र पवार यांना उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच, त्यांनी पदाधिकाऱ्यांसह राजीनामे देत नाराजी व्यक्त केलीये.
 
2009 साली मनसेचे प्रकाश भोईर, तर 2014 साली स्वबळावर लढलेल्या भाजपचे नरेंद्र पवार इथून आमदार होते. युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र 2014 साली युती तुटल्यानं दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि त्यात नरेंद्र पवार हे कल्याण पश्चिममधून जिंकले.
 
मात्र यंदा युती झाल्यानं हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळं नरेंद्र पवार हे नाराज झाले आहेत.
 
8) हिंगणघाटमध्ये माजी मंत्री अशोक शिंदे नाराज
वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून भाजपनं समीर कुणावार यांना उमेदवारी दिलीये. समीर कुणावर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
 
मात्र युतीच्या 2009 पर्यंतच्या फॉर्म्युल्यानुसार हिंगणघाट मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2009 साली या मतदारसंघातून अशोक शिंदे आमदार होते.
 
1995, 1999 आणि 2009 अशा तीनवेळा अशोक शिंदे हिंगणघाटमधून शिवसेनेचे आमदार म्हणून जिंकले होते. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ते उद्योग राज्यमंत्रीही होते.
 
1990 ते 2009 या कालावधीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष युती करून लढले. मात्र, 2014 साली दोन्ही पक्षांनी युती तोडून स्वबळाचा नारा दिला. त्यामुळं जे मतदारसंघ शिवसेनेकडे होते, तिथं भाजपचा आमदार आणि जे मतदारसंघ भाजपकडे होते, तिथं शिवसेनेचा आमदार जिंकला. यामुळं यंदा युतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी दिसतेय.
 
शिवसेना-भाजपमध्ये जास्त नाराजी?
याबाबत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "शिवसेना-भाजपबद्दल बोलायचं झाल्यास अनेकांना वाटलं होतं, की युती होणार नाही. कारण 2014 साली युती झाली नव्हती."
 
भिडे पुढे सांगतात, "ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपवर टीका करत होती, त्यावरून शिवसैनिकांमध्ये विश्वास होता, की यावेळी स्वबळावर लढलं जाईल आणि आपल्याला तिकीट मिळेल. त्यामुळं शिवसैनिक 288 मतदारसंघात तयारी करत होते. त्याचवेळी भाजपचे कार्यकर्तेही 288 मतदारसंघात तयारी करत होते. अशी तयारी करणं, तिथल्या समस्या बाहेर काढत त्या सरकारसमोर मांडणं, लोकांच्या संपर्कात राहणं, हे काम जिकिरीचं असतं. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढतात."
 
'प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. तिकीट मिळावं असं प्रत्येकाला वाटतंय,' असं सांगत भिडे म्हणतात, "कुठलाही पक्ष स्वबळाची तयारी करतो. मात्र नंतर वरिष्ठ पातळीवर मतांचं विभाजन होऊ नये यासाठी पक्षांकडून विचार केला जातो. म्हणून मग सोबत येऊन जागावाटप केलं जातं. अशावेळी नाराजीनाट्य सुरू होतं."
 
पक्षांतरामुळं नाराजीनाट्य?
"भाजपचंच राज्य येणार असल्याचं वातावरण निर्माण झाल्यानं जास्तीत जास्त लोक भाजपकडे आकर्षित झाले. काँग्रेसमध्ये मरगळ आलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कितपत अस्तित्व दाखवेल, याबद्दल शंका असल्यानं नेत्यांनी पक्षांतरं केली. मात्र पक्षांतरामुळं शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेत. कुठल्याही नेत्याला घेताना आपले कार्यकर्ते दुखावतील याचं भान सेना-भाजपला राहिलेलं दिसत नाही आणि याचा त्यांना फटका नक्कीच बसेल," असं राही भिडे सांगतात.
 
"कुठल्याही उमेदवारा तिकीट देताना 'इलेक्टिव्ह मेरिट' (निवडून येण्याची क्षमता) पाहिली जाते. म्हणजे काय, तर पैसा बघतात. जो पैसा खर्च करू शकतो, त्यालाच प्राधान्य दिलं जातं. मसल आणि मनी पॉवर असलेलेच निवडणूक लढवतात, असं एकूण दिसतं. जे प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करतात, त्यांच्यावर मात्र अन्याय झालेला दिसतो आणि त्याचा परिणाम या नाराजीतून दिसून येतो," असं राही भिडे म्हणतात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments