Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरे कॉलनी: ...जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर?

Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (17:23 IST)
आरे कॉलनीमधल्या प्रस्तावित कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांचा मुद्दा सध्या गाजतोय. या प्रकल्पासाठी 2702 झाडं तोडली जाणार आहेत.
 
मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने झाडं तोडण्याची परवानगी दिल्यानंतर त्याविरोधातलं आंदोलन तीव्र झालं.
 
जगभरात विविध कारणांमुळे वृक्ष संख्या झपाट्याने कमी होतेय. गेल्या महिन्यात अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीत प्रचंड मोठी वृक्ष संपदा जळून भस्मसात झाली.
 
पण कल्पना करा, जर जगातली सगळीच झाडं जर नष्ट झाली, तर काय होईल?
 
"झाडं या जगाची लाईफलाईन आहेत. ती नसतील तर आपल्याला या पृथ्वीवर जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी करता येणार नाहीत," मेग लोमन म्हणतात. फ्लोरिडामध्ये असणाऱ्या 'ट्री फाऊंडेशन' या न नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेच्या त्या संचालक आहेत. ही संस्था झाडांविषयीचा अभ्यास, नवीन संशोधन आणि शिक्षण याविषयी काम करते.
 
'शेतीसाठी झाडं तोडली गेली?'
आपल्या ग्रहासाठी झाडं कार्बन साठवण्यापासून ते मातीची धूप रोखण्यापर्यंत ते जलचक्र नियमित ठेवण्यापर्यंतची विविध कामं करतात. नैसर्गिक आणि मानवी अन्न साखळीत त्यांची महत्त्वाची भूमिका असते आणि त्यांच्यामुळे आपल्यासकट अगणित प्रजातींना घर मिळतं. तरीही आपण अनेकदा झाडं नसली तरी चालून जाईल, असंच समजतो.
 
आर्थिक फायद्यासाठी त्यांची कत्तल करतो किंवा मानवी विकासातला अडथळा म्हणून या झाडांकडे पाहतो. 12,000 वर्षांपूर्वी माणसाने शेती करायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत आपण जगभरातील एकूण सुमारे 5.8 ट्रिलियन (1 ट्रिलियन = 1 लाख कोटी) झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडं तोडली आहेत. 'नेचर' या नियतकालिकामध्ये 2015मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात असं म्हटलंय.
 
सगळ्यांत जास्त जंगलतोड गेल्या काही वर्षांत झाली आहे. औद्योगिकीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जंगलांचं प्रमाण 32% नी घटलं. जगामध्ये उरलेली 3 ट्रिलियन म्हणजेच 3 लाख कोटी झाडंही झपाट्याने तोडली जात आहेत. उष्णकटिबंधामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून दरवर्षी 15 बिलियन (100 कोटी) झाडं कापली जात असल्याचं 'नेचर'च्या अभ्यासात म्हटलंय.
 
2018च्या तुलनेमध्ये 2019मध्ये ब्राझीलमधल्या अमॅझॉनच्या जंगलातल्या आगींमध्ये 84%ची वाढ झाल्याचं नॅशनल इनस्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्चने ऑगस्टमध्ये म्हटलं होतं. झाडं कापून जमिनी जाळण्याच्या इंडोनेशिया आणि मादागास्करमधल्या घटनाही वाढलेल्या आहेत.
 
'जर खरंच झाडं नष्ट झाली तर?'
अगदीच कल्पनाबाह्य आपत्ती शिवाय इतर कोणतंही असं संकट नाही जिथे पृथ्वीग्रहावरील एकूण एक झाड नष्टं होईल. पण झाडंच नसतील तर काय होईल याची कल्पना केली तरच आपल्याला त्यांचं महत्त्व समजेल.
 
"झाडांविना जग भयंकर असेल. झाडांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपण जर सगळी झाडं नष्टं केली तर आपल्याला कदाचित या ग्रहावर त्यानंतर जगणं शक्य होणार नाही," वेल्समधल्या बँगोर युनिव्हर्सिटीमधल्या पर्यावरणविषय डेटा आणि अॅनालिसिसच्या प्राध्यापक इसाबेल रोसा म्हणतात.
 
म्हणजे समजा जगातली सगळी झाडं एका रात्रीत नष्टं झाली तर त्यासोबतच ग्रहावरची सगळी जैवविविधताही नष्ट होईल. अधिवास नष्टं झाल्याने जगभरातल्या अनेक प्रजाती नामशेष होतील. म्हणूनच सध्या उरलेली जंगलं नष्टं होणं हे झाडं, प्राणी, बुरशी आणि इतरांसाठी आपत्ती ओढावणारं ठरेल असं ब्राझीलमधल्या रिओ दि जानेरो स्टेट युनिव्हर्सिटीमधले पर्यावरणशास्त्रज्ञ जेमी प्रेवेडेल्लो म्हणतात.
 
वन्य प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात
हा विनाश फक्त जंगलांपर्यंतच थांबणार नाही. झाडा-झुडपांवर अवलंबून असणाऱ्या वन्य प्राण्यांचाही यामुळे विनाश होईल. खुल्या जागांपेक्षा जिथे तुरळक प्रमाणात झाडं आहेत तिथली जैवविविधता 50 ते 100% जास्त होती असं 2018मध्ये प्रेवेडेल्लो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं होतं.
 
"एखाद्या मोकळ्या भागात असलेलं एकटं झाडंही जैवविविधतेसाठी चुंबकासारखं काम करतं. यामुळे अनेक प्राण्यांना किंवा झुडपांना मदत मिळते. म्हणूनच तुरळक असणारी झाडं कापण्याचाही स्थानिक जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो."
 
नैसर्गिक संकटांची मालिका सुरू होईल
यामुळे पृथ्वीच्या वातावरणावरही लघु आणि दीर्घकालीन परिणाम होतील. जलचक्रामध्ये झाडांची भूमिका एखाद्या जैविक पंपासारखी असते. ते जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि त्या पाण्याचं वाफेत रूपांतर करून ते वातावरणात सोडतात. असं करत जंगलं ढग तयार होण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी मदत करतात.
 
पूर नियंत्रणातही झाडांची महत्त्वाची भूमिका असते. तलाव वा नदीमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याला झाडांचा अडथळा होतो. शिवाय या जलस्त्रोतांना पूर आल्यास किनारपट्टीचं झाडांमुळे संरक्षण होतं. पावसामुळे एरवी वाहून जाणारी माती झाडं रोखून ठेवतात आणि त्यांच्या मुळांच्या मदतीने सूक्ष्मजीव जगू शकतात.
 
झाडं नसतील तर पूर्वी ज्या भागामध्ये जंगलं होती ते भाग आणखी कोरडे होतील आणि तिथे भयंकर दुष्काळ पडण्याची शक्यता वाढेल. तिथे पाऊस झालाच तर तर पूरपरिस्थिती विनाशकारी होईल. मोठ्या प्रमाणात धूप झाल्याने त्याचा परिणाम समुद्रांवर होईल. प्रवाळं आणि इतर समुद्री अधिवासांवर याचा परिणाम होईल. बेटांवरील झाडं नष्टं झाली तर समुद्राला अडथळा राहणार नाही आणि अनेक बेटं बुडतील.
 
"झाडं कापणं म्हणजे समुद्रामध्ये जमिनीचा मोठा भाग बुडून जाणं," 2015मधल्या संशोधनाच्या मुख्य संशोधक आणि स्वित्झर्लंडमधल्या ETH Zurichचे पर्यावरण शास्त्रज्ञ थॉमस क्रोवथर म्हणतात.
 
जागतिक तापमान वाढ
जलचक्रासोबतच झाडांची स्थानिक तापमान कायम राखण्यातही महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या सावलीमुळे मातीचं तापमान कायम राहतं. शिवाय जमिनीवरची सर्वात गडद रंगाची गोष्ट असल्याने ते उष्णता परावर्तित करण्याऐवजी ती शोषून घेतात.
 
बाष्पीभवनाची प्रक्रिया करताना झाडं सौर उत्सर्जनामुळे निर्माण झालेली ऊर्जा वापरत पाण्याचं वाफेत रूपांतर करतात. जर वातावरण थंड करणाऱ्या या सगळ्या यंत्रणा नष्ट झाल्या तर ज्या ठिकाणी झाडं होती ते भूभाग लगेच तापतील.
 
25 चौरस किलोमीटरवरील जंगल पूर्णपणे तोडलं तर उष्णकटिबंधीय भागातलं तापमान किमान 2 डिग्रीजनी तर उष्ण प्रदेशांमधलं तापमान 1 डिग्रीने वाढत असल्याचं प्रेवेडेल्लो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आणखी एका पाहणीदरम्यान आढळलं होतं. जंगलं आणि खुल्या जागांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावरही संशोधकांना हेच आढळलं होतं.
 
वातावरणातल्या बदलांमुळे होणारी तापमानवाढ रोखण्यासाठी जगभर झाडांची मदत होते. झाडांच्या खोडांमध्ये कार्बन साठवला जातो आणि वातावरणातला कार्बन डाय ऑक्साईड झाडं शोषून घेतात. एकूण कार्बन उर्त्सजनापैकी 13% हे जंगलतोडीमुळे होत असल्याचं आयपीसीसीने ऑगस्टमध्ये छापलेल्या अहवालात म्हटलंय. तर जमिनीच्या वापरात झालेल्या बदलांमुळे 23% कार्बन उत्सर्जन होतं.
 
जर जगातली सगळी झाडं नष्टं झाली तर जिथे आधी झाडं होती ते भाग "वातावरणामधल्या कार्बन उत्सर्जनाचा स्त्रोत बनतील" असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे पर्यावरण शास्त्राचे प्राध्यापक पाओलो डीओडोरिको म्हणतात.
 
'कार्बनचं प्रमाण वाढेल'
हळुहळू वातावरणामध्ये 450 गिगाटन कार्बन सोडला जाईल असा क्रोअदर यांचा अंदाज आहे. माणसाने आतापर्यंत केलेल्या उत्सर्जनाच्या हे प्रमाण दुप्पट आहे. लहान झुडपं आणि गवत काही काळ याला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतील. लहान झुडपं मोठ्या झाडांपेक्षा जास्त वेगाने जरी कार्बन शोषून घेत असली तरी ती तितक्याच वेगाने कार्बन सोडूनही देतात. अशा परिस्थितीत कदाचित काही दशकांनंतर या झुडपांना वाढतं तापमान रोखणं शक्य होणार नाही.
 
"तुम्ही कुठे आहात यावर हा कालावधी अवलंबून आहे. कारण कुजण्याची प्रक्रिया ही उष्णकटिबंधामध्ये आर्क्टिकपेक्षा जास्त वेगाने होते. पण एकदा कार्बन डायऑक्साईड वातावरणात आला तर तो कुठून आलाय याने काही फरक पडत नाही," डीओडोरिको म्हणतात.
 
कुजण्याच्या प्रक्रियेमुळे कार्बनचा धोका वाढेल. यातला कार्बन मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळेल. याने समुद्राच्या पाण्यातल्या आम्लाचं (Acid) प्रमाण वाढेल आणि जेलीफिश सोडून इतर सर्व जीव मारले जातील.
 
भयंकर ग्लोबल वॉर्मिग होण्याआधीच मानवजातीला याचा त्रास व्हायला लागेल. वाढलेली उष्णता, बिघडलेलं जल-चक्र आणि सावली नसण्याचा भयंकर परिणाम कोट्यवधी माणसं आणि जनावरांवर होईल.
 
सध्या जगामधली 1.6 बिलियन माणसं ही त्यांच्या उपजीविकेसाठी, अन्नासाठी आणि औषधांसाठी निसर्गावर अवलंबून आहेत. या सगळ्यांना गरिबी आणि मृत्यूला सामोरं जावं लागेल. जळण उपलब्ध नसल्याने अन्न शिजवण्यासाठी वा घरात ऊब निर्माण करणं लोकांना शक्य होणार नाही.
 
'अर्थव्यवस्था कोलमडेल'
जगभरामध्ये ज्यांचं काम झाडांशी संबंधित आहे म्हणजे उदाहरणार्थ लाकूड व्यावसायिक, पेपर बनवणारे, फळांचं उत्पादन करणारे किंवा सुतार यासगळ्यांवर बेरोजगारीची पाळी येईल आणि याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. एकट्या लाकूड उद्योगामुळेच जगभरात 13.2 दशलक्ष लोकांना रोजगार मिळतो आणि दरवर्षी यामध्ये 600 अब्ज डॉलर्सची उलाढाल होते असं वर्ल्ड बँकने म्हटलंय.
 
शेतीवरही याचा मोठा परिणाम होईल. सावलीत घेतल्या जाणाऱ्या कॉफीसारख्या पिकांचं प्रमाण घटेल. तापमान आणि बाष्पाचं प्रमाण सतत बदलत राहिल्याने पूर्वी जिथे पीक घेता यायचं तिथली सुपीकता नष्टं होईल तर आधी जिथे पीक घेता येत नसे, कदाचित तिथे शेती करणं शक्य होईल. कालागणिक जगभरातल्या मातीचा दर्जा खालावत जाईल आणि पिकं टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करावा लागेल. तापमान आणखी वाढल्यानंतर बहुतेक ठिकाणी पिकंही घेता येणार नाहीत आणि राहताही येणार नाही.
 
यापेक्षा भयंकर परिणाम होतील ते आरोग्यावर. झाडं हवेमधलं प्रदूषण शोषून घेतात. त्यांची पानं, फांद्या आणि खोडामध्ये प्रदूषणाचे कण अडकून राहतात. अमेरिकेच्या फॉरेस्ट सर्व्हिसने केलेल्या संशोधनानुसार एकट्या अमेरिकेतली झाडं दरवर्षी हवेतलं 17.4 दशलक्ष टन प्रदूषण शोषून घेतात. परिणामी किमान 850 जणांचे जीव वाचवले जातात आणि श्वसनाच्या त्रासाच्या किमान 6,70,000 घटना टाळल्या जाऊ शकतात.
 
रोगराई पसरेल
झाडं नसली तर अनेक दुर्मीळ वा वेगळे आज होण्याची शक्यता असल्याचं डिओडोरिको म्हणतात. एरवी ज्या प्रजातींशी आपला संपर्क आला नसता त्यांच्याशी संपर्क आल्याने हे आजार होऊ शकतात.
 
ईबोला व्हायरस हा जंगलाच्या काही तुकड्यांमध्ये माणसाकडे प्रसारित होत असल्याचं डिओडोरिको आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं होतं. सगळीकडची जंगलं अचानक नष्टं झाली तर ईबोला, निपाह व्हायरस आणि वेस्ट नाईल व्हायरसच्या संपर्कात येण्याचं आपलं प्रमाण वाढेल. सोबतच डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू - मलेरियाचं प्रमाणही वाढेल.
 
झाडं आणि निसर्ग हा आपल्या मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचं असल्याचं संशोधनात समोर आलंय़. एकूणच चांगल्या आरोग्यासाठी जंगलामध्ये चालणं चांगलं असल्याचं न्यूयॉर्कचा पर्यावरण संवर्धन विभाग म्हणतो. असं केल्याने तणाव कमी होतो, उत्साह वाढतो आणि चांगली झोपही लागते.
 
1984मध्ये करण्यात आलेल्या एका प्रसिद्ध संशोधनात असं आढळलं की शस्त्रक्रियेतून सावरणाऱ्या रुग्णांना त्यांच्या खोलीतून विटांची भिंत दिसण्याऐवजी हिरवंगार दृश्य दिसलं तर त्यांना तुलेने कमी काळ हॉस्पिटलमध्ये घालवावा लागतो.
 
गवत आणि झाडांमध्ये वेळ घालवल्यास मुलांमधली 'अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टिव्हिटी डिसॉर्डर'ची लक्षणं कमी होत असल्याचं नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात आढळलंय. हिरव्या जागा आणि मुलांची शाळेतली कामगिरी याचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचंही अनेक संशोधनांत आढळलं आहे. झाडांमुळे गुन्हेगारीही कमी होऊ शकते. बाल्टीमोअरमध्ये झाडांची संख्या 10%नी वाढल्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण 12 %नी कमी झाल्याचं एका अभ्यासात आढळलं होतं.
 
मानसिक आरोग्य धोक्यात येईल
"घनदाट झाडीमध्ये वेळ घालवल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. म्हणूनच आता जपानमध्ये 'फॉरेस्ट बाथ'चा सल्ला वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनमध्ये दिला जातो," ऑक्सफर्ड विद्यापीठातील जैवविविधतेच्या प्राध्यापक कॅथी विलिस म्हणतात.
 
झाडांचा विनाश हा सांस्कृतिक विनाशही ठरेल. झाडांची अनेकांच्या बालपणात महत्त्वाची भूमिका असते. कला, साहित्य, कविता, संगीत आणि इतरही गोष्टींमध्ये झाडांचे उल्लेख असतात. जगभरातल्या सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या अनेक धर्मांमध्ये पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची आहे. 49 दिवस बोधी वृक्षाखाली ध्यान केल्यानंतर गौतम बुद्धांना आत्मज्ञान झालं होतं. हिंदू पिंपळाच्या झाडाला विष्णूचं रूप मानतात. 'तोराह ऍण्ड ओल्ड टेस्टामेंट'मध्ये देवाने तिसऱ्या दिवशी प्राणी आणि माणसाच्याही आधी झाडांची निर्मिती केल्याचं म्हटलं आहे. तर झाडांपासून तयार करण्यात आलेल्या लाकडी क्रॉसवर जीजसचा मृत्यू झाल्याचं बायबलमध्ये म्हटलंय.
 
"अनेक लोकं झाडांकडे पैशांच्या दृष्टिकोनातून पाहतात. पण आपण कधीही जंगलांचं आध्यात्मिक मूल्य किती मोठं आहे ते बघत नाही," लोमन म्हणतात.
 
थोडक्यात सांगायचं झालं तर माणसांना झाडांशिवाय जगणं कठीण होईल. शहरी, पाश्चिमात्य जीवनशैली टिकू शकणार नाही आणि आपल्यापैकी अनेकांचा भुकेने, उष्म्याने, दुष्काळ वा पुरामुळे मृत्यू होईल. झाडांशिवाय कसं जगायचं यांचं ज्ञान ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींसारख्या ज्या समुदायांकडे असेल, फक्त तेच जगू शकतील, असं लोमन यांना वाटतं. तर उलट माणूस हा टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि आतापर्यंत जगलो त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या रीतीने फक्त मंगळावरच्या कॉलनीमध्येच जगू शकेल असं क्रोअदर यांना वाटतं.
 
"आणि जरी आपण झाडं नसलेल्या जगात टिकू शकलो, तरी असं जगायला कोणाला आवडेल?" क्रोअदर म्हणतात. "विश्वातल्या आपल्याला माहित असलेल्या इतर कोणत्याही ग्रहापेक्षा हा ग्रह वेगळा आहे कारण इथे आयुष्य नावाची गोष्ट आहे जिचं नेमकं वर्णन करणं शक्य नाही. आणि झाडांशिवाय बहुतेक सगळ्याचीच वाट लागेल."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments