Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिलिंद नार्वेकर कोण आहेत? उद्धव ठाकरेंचे विश्वासू, शिवसेनेचे सरचिटणीस की नेत्यांचे शत्रू

Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (19:39 IST)
मयांक भागवत
मिलिंद नार्वेकर, हे नाव महाराष्ट्राला फारसं परिचीत नसेल. पण, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून, राजकारणात त्यांना ओळखलं जातं.
 
कोकणातील दापोलीत, समुद्रकिनारी असलेला मिलिंद नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त करण्यात आलाय. नार्वेकर हा बंगला स्वत:च पाडत असल्याची चर्चा दापोलीत रंगलीये.
 
CRZ नियमांचं उल्लंघन करून, अवैधरित्या हा बंगला बांधल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आहेत.
मिलिंद नार्वेकर हे आता फक्त उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक नाहीत तर शिवसेनेचे सरचिटणीसही आहेत.
 
एक साधा शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे पीए ते शिवसेनेचे सरचिटणीस. हा मिलिंद नार्वेकरांचा प्रवास कसा झाला? कोण आहेत मिलिंद नार्वेकर? त्यांच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा...
 
'मातोश्रीवर पोहोचलेला एक साधा शिवसैनिक'
मिलिंद नार्वेकर पहिल्यांना मातोश्रीवर पोहोचले ते 1992 मध्ये.
 
राजकीय विश्लेषक सचिन परब सांगतात, "मिलिंद नार्वेकर मुळात एक साधे शिवसैनिक होते."
 
त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली मुंबईतून. मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून. शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून ते काम करायचे.
 
1992 च्या महापालिका निवडणुकीआधी त्यांचा वॉर्ड विभागला गेला. नवीन वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळेल या आशेने मिलिंद नार्वेकरांनी पहिल्यांदा मातोश्रीत प्रवेश केला.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि महानगरचे संपादक संजय सावंत यांनी मिलिंद नार्वेकरांचा शिवसेनेतील प्रवास जवळून पाहिलाय.
 
ते सांगतात, "मिलिंद नार्वेकरांच्या कामाची पद्धत पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं, फक्त शाखाप्रमुखच रहायचं का काही वेगळं काम करायचंय?" यावर मिलिंद नार्वेकर यांनी, "तुम्ही द्याल ती जबाबदारी घेईन. सांगाल ते काम करायला आवडेल असं उत्तर दिलं."
उद्धव ठाकरेंचे विश्वासू पीए कसे बनले?
गेली 28 वर्षं मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहेत. पण, याची सुरूवात झाली 1993 मध्ये.
 
सुरूवातीला मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर पडेल ते काम करायचे. पण, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक बनले.
 
राजकीय विश्लेषक संजय सावंत सांगतात, "1992 ते 2002 या काळात शिवसेना नेते, कार्यकर्ते, इतर पक्षातील नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊ लागले. त्यांच्या गाठीभेटी सांभाळण्याचं काम मिलिंद नार्वेकर करायचे."
 
1997 साली उद्धव ठाकरे राजकारणात हळूहळू स्थिरस्थावर झाले. 2002 मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
त्यानंतर उद्धव ठाकरेंची वेळ देणं, नेते-कार्यकर्त्यांचे फोन घेणं, दौरे आखणं ही जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर असायची.
 
"मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील आहेत. उद्धव ठाकरेंनी, त्यांना नेहमीच सोबतीचं स्थान दिलं. काम करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलंय," असं सचिन परब म्हणतात.
 
राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर, हळूहळू उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून मोठे होऊ लागले. त्याचवेळी मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेतील स्थान आणि वजन वाढत गेलं.
 
संजय सावंत सांगतात, "शिवसेनासोडून गेलेल्या नेत्याचा फोन जरी आला तरी मिलिंद त्याबाबत उद्धव ठाकरेंना सांगतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावर खूप जास्त विश्वास आहे."
 
उद्धव ठाकरे अडचणीत सापडले किंवा पक्ष म्हणून सेनेसमोर अडचणीची परिस्थिती निर्माण झाली की मिलिंद सक्रिय होतात, असं राजकीय विश्लेषक म्हणतात.
बाळासाहेबांना मिलिंद नार्वेकर आवडत नव्हते?
उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असल्याने मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेतलं प्रस्थ हळूहळू वाढत होतं.
 
बाळासाहेब ठाकरेंना मिलिंद नार्वेकर विशेष आवडत नसल्याची चर्चा त्यावेळी वारंवार ऐकू येत असे. ही चर्चा खरी होती?
 
संजय सावंत सांगतात, "सुरूवातीला बाळासाहेबांना मिलिंद नार्वेकर विशेष आवडत नव्हते, ही वस्तूस्थिती आहे. पण, उद्धव ठाकरेंनी पक्ष सांभाळल्यानंतर हा राग हळूहळू कमी झाला."
 
शिवसेना नेते नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, मातोश्रीत चार भिंतीआड नार्वेकर यांना आजही विरोध होतोय. तर, आदित्य ठाकरेंना ते फारसे आवडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येते.
 
राणे-जाधवांचे आरोप
2005 मध्ये नारायण राणे आणि नंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची अनभिषिक्त धूरा आली. उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखे चोवीसतास लोकांमध्ये रमणारे नव्हते. त्यामुळे त्यांची भेट पत्रकार, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना मिळत नव्हती. त्यावेळी मिलिंद नार्वेकर कोणालाही उद्धव ठाकरेंना भेटू देत नाहीत, असा आरोप शिवसेना नेते करायचे.
 
याबाबत सचिन परब सांगतात, "कार्यकारी अध्यक्षांची वेळ नक्की कोण टाळतं? उद्धव ठाकरे की मिलिंद नार्वेकर? हे भल्याभल्यांना त्यावेळी कळत नव्हतं."
 
त्यामुळे, मिलिंद नार्वेकरांच्या मातोश्रीवरील वाढत्या वर्चस्वाची चर्चा नेत्यांमध्ये सुरू झाली. मातोश्री आणि उद्धव ठाकरेंकडे नार्वेकर यांचं वाढतं वजन शिवसेना नेत्यांना डोईजड होऊ लागलं.
 
नारायण राणेंनी, शिवसेना सोडताना मिलिंद नार्वेकरांवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले. तर, भास्कर जाधवांनी, शिवसेना सोडताना मिलिंद नार्वेकरांनी मातोश्रीवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता.
राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "नारायण राणे, भास्कर जाधवांनी शिवसेना सोडण्यासाठी मिलिंद नार्वेकर जबाबदार असल्याचा थेट आरोप केला होता."
 
राज ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतलं नसलं. तरी, "माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे." असा आरोप केला होता.
 
मिलिंद नार्वेकर आणि वाद
राजकीय विश्लेषक संजय सावंत सांगतात, "कॉन्ट्रोव्हर्सी आणि मिलिंद नार्वेकर म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हणता येईल."
 
मिलिंद नार्वेकरांवर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीआधी पैसे घेऊन पक्षातील पदांची विक्री केल्याचा आरोप केला होता.
 
2010 मध्ये पुण्यातील बंददरम्यान लोकांना दंगल घडवून आणण्यासाठी फूस लावल्याचा गुन्हा मिलिंद नार्वेकर यांच्यावर दाखल करण्यात आला होता. पण, 2017 साली सरकारने हा गुन्हा मागे घेतला.
 
तर शिवसेनेचे दिवंगत नेते मोहन रावले यांनी "मिलिंद नार्वेकर शिवसेना पक्ष चालवतो. उद्धव ठाकरेंची भेट देत नाही," असा आरोप करत पक्षाला रामराम ठोकला होता.
 
शाखाप्रमुख, कार्यकर्ते आणि मित्रपक्षाकडूनही उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू शकत नाही अशी तक्रार वारंवार केली जाते.
 
स्मृती कोप्पीकर सांगतात, "याला कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सर्कलमधील लोक कारणीभूत आहेत आणि यात मिलिंद नार्वेकरांचं नाव नक्की येतं."
नार्वेकरांना पर्याय देण्याचा प्रयत्न झाला?
मातोश्रीत मिलिंद नार्वेकर यांचं प्रस्थ वाढत गेलं. त्यामुळे शिवसेनेत मिलिंद नार्वेकरांना पक्षांतर्गत विरोध सुरू झाला.
 
शिवसेना नेत्यांची नाराजी पहाता शिवसेनेत मिलिंद नार्वेकर यांना पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
सचिन परब म्हणतात, "अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब यांसारखे नेते मिलिंद नार्वेकर यांना पर्याय म्हणून उभे करण्यात आले. पण, मिलिंद अजूनही टीकून आहेत."
 
सद्यस्थितीत त्यांना पर्याय देणं शक्य नाही, असंही ते पुढे म्हणतात.
 
तर धवल कुलकर्णी सांगतात, "मिलिंद नार्वेकरांना आता शिवसेनेत पर्याय उभे राहिलेत. त्यांचं शिवसेनेत वजन अजूनही आहे. पण, ते आधी इतकं नक्कीच राहिलेलं नाही."
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थिती बदलली?
उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना, मिलिंद नार्वेकर नेते, कार्यकर्त्यांसाठी एकमेव दुवा होता. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून ही परिस्थिती बदलली आहे. तर उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना दूर केलंय. त्यांचं मातोश्रीवरील वजन कमी होऊ लागलंय, अशी चर्चा कायम सुरू असते.
यावर बोलताना संजय सावंत म्हणतात, "मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना काही अंतर दिल्याचं दिसून येतंय. याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूला आता अधिकाऱ्यांचा गराडा असतो. त्यामुळे मिलिंद नार्वेकर थोडे बाजूला झाल्यासारखं वाटतं."
 
पण सचिन परब यांना मात्र तसं वाटत नाही. ते सांगतात,
 
"10-12 वर्षांपूर्वी, मिलिंद नार्वेकर यांचं राजकीय वजन कमी झाल्याची बातमी मी केली होती. राजकीय वर्तुळात या चर्चा कायम सुरू असतात. पण, मिलिंदचं महत्त्व कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे मी केलेली बातमी चुकीची होती असंच म्हणावं लागेल."
 
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धूरा हाती घेतल्यापासून अनेक नेते शिवसेना सोडून गेले. पण, उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना कधीच दूर केलं नाही, असं राजकीय विश्लेषक म्हणतात.
 
"गेली कित्येक वर्षं मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांना पटकन बाजूला काढणं शक्य नाही," असं धवल कुलकर्णी यांना वाटतं.
 
महाविकास आघाडी स्थापनेवेळी चर्चेत
2019 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. राजकीय विश्लेषकांच्या मते मिलिंद नार्वेकरांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सचिन परब म्हणतात, "2019 च्या निवडणुकीनंतर शंकरराव गडाख, बच्चू कडू यांना शिवसेनेजवळ आणण्याचं काम मिलिंद नार्वेकरांनी केलं. तर, मुंबईबाहेर जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना एअरपोर्टवरून त्यांनी शोधून आणलं."
 
मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही मिलिंद नार्वेकर यांचे चांगले संबंध असल्याची चर्चा आहे.
 
शिवसेनेचं सरचिटणीसपद
साल 2018 मध्ये म्हणजे तब्बल 25 वर्षांनंतर मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेत पहिल्यांना संघटनात्मक पद देण्यात आलं. त्यांना शिवसेनेचं सरचिटणीस बनवण्यात आलं. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल अशी चर्चा सुरू होती. पण, शिवसेना नेत्यांनी याला विरोध केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments