Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूमुळे राजकीय वाद का निर्माण झालाय?

Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (18:44 IST)
परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले, 'या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल.'
 
सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही तिला समजावून सांगा असे म्हणत आहे. तर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर अरुण नावाचा एक कार्यकर्ता त्या तरुणीच्या मृतदेहाजवळ होता. त्यावेळी कथित मंत्र्याने त्या तरुणीचा मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितल्याचे दुसऱ्या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

''संबंधित तरुणीचे प्रेमसंबंध एका मंत्र्यांशी असल्याच्या क्लिप सोशल मीडियावर फिरत असल्याचे समजले आहे. एका तरुणीचा मृत्यू व त्याभोवती निर्माण झालेले संशयाचे वर्तुळ पाहता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करु नये, त्यातील सत्य तात्काळ समोर आले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. '' ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
 
कोण आहे पूजा चव्हाण ?
पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती.

पूजाने महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर केल्या जात आहेत. भाजपच्या महिला आघाडीकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
 
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'पुण्याच्या वानवडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने 9 फेब्रुवारी 2021 रोजी मध्यरात्री एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसल्याचे निदर्शनास आले आहे.
 
शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव याप्रकरणी पुढे आले आहे. या मंत्र्यांचे व आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स व काही फोटो व्हायरल होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन,याप्रकरणी तात्काळ विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी.' असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
तर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ट्वीट करत पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 'पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहीजे असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.'
 
या आत्महत्येबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कोणत्याही ठिकाणी आत्महत्या केली तर त्याची चौकशी पोलीस करतच असतात. शेतकरी आत्महत्या असली तर ती कर्जबाजारीपणामुळे असते. तपास होत असतो, सुरू आहे. काही लोक आरोप करण्याचे काम करत असतात. मागेही असंच आंदोलन झालं, पण तपास सुरू आहे."
 
याबाबाबत पोलिसांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांची बाजू आल्यानंतर बातमी अपडेट करण्यात येईल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments