Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल सेवेवर निर्बंध येणार का?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल सेवेवर निर्बंध येणार का?
, बुधवार, 31 मार्च 2021 (17:12 IST)
मुंबई कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. त्यामुळे मुंबईतील लोकल रेल्वेवर काही निर्बंध येणार का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. याबाबत बीबीसी मराठीनं रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली.
"लोकल रेल्वेत कोणतेही नवीन निर्बंध किंवा फेऱ्या कमी करण्यासंदर्भात राज्य किंवा केंद्र सरकारचे अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करू," पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण 18 लाख एवढी होती. ती आता कमी होऊन 15-16 लाखांवर आली आहे.
तर मध्य आणि हार्बर रेल्वेने दर दिवशी जवळपास 40 लाख प्रवासी प्रवास करत असतात, पण कोरोना काळात 20 लाख प्रवासी प्रवास असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
मध्य रेल्वेत 90 टक्के (1600) तर पश्चिम रेल्वेच्या 95% रेल्वे गाड्या सुरू आहेत.
सार्वजनिक वाहतूक बंद करणे हा आमचा शेवटचा पर्याय असेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
मुंबईत काही रेल्वे स्टेशन्सवर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये
दुसरीकडे, वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी मुंबईतल्या काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत लोकल सर्वांसाठी सर्वसमावेशक पद्धतीने सुरू झालेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाकरता विशिष्ट वेळा देण्यात आल्या आहेत. आपात्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वेळी लोकलप्रवासाची मुभा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडीत प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत आता 50 रुपये असणार आहे.
सर्वसाधारणपणे प्लॅटफॉर्म तिकिटासाठी प्रवाशांना प्रत्येकी 10 रुपये मोजावे लागतात. नव्या निर्णयानंतर मुंबईतल्या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच पट पैसे खर्च करावे लागतील.
1 मार्चपासून लागू झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
महत्त्वाच्या स्थानकांवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतले कोरोनाचे आकडे दररोज वाढत आहेत. मुंबई शहरात आतापर्यंत सव्वा तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्गामुळे मुंबई शहरात 11,400 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॅंकांना आरबीआयने फटकारले; ‘ऑटो डेबिट’ प्रणालीला पुन्हा मिळाली मुदतवाढ