Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाटू-नाटू या आरआरआर सिनेमातल्या गाण्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

natu natu
, बुधवार, 11 जानेवारी 2023 (12:12 IST)
Author,सहिती
Twitter
तेलगू सिनेमा आरआरआर मधल्या नाटू-नाटू या प्रसिद्ध गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग हा गोल्डन ग्लोबचा पुरस्कार मिळाला आहे.
 
गेले काही महिने हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आहे. 
 
नाटू-नाटू (हिंदीमध्ये नाचो-नाचो) या गाण्याला एनटीआर-रामचरण आणि एस.एस.राजमौली यांच्यामुळे एक वेगळीच झेप घेता आली आहे.
 
हे गाणं कसं तयार झालं? ते पडद्यावर येण्याआधी या सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, संगीत दिग्दर्शक किरावानी, गीतकार चंद्रबोस यांच्या डोक्यात काय सुरू होतं?
 
त्याची उत्तरं इथं जाणून घेऊ.
 
ओरिजिनल साँग विभाग म्हणजे काय?
संबंधित गाणं पूर्वीपासून प्रचलित असलेल्या एखाद्या गाण्याची नक्कल नसेल तर अशा गाण्याला ओरिजिनल म्हटलं जातं.
 
त्या गाण्यावर पूर्वीच्या कोणत्याही गाण्याची चाल, अर्थ, शब्दांचा प्रभाव असता कामा नये. 
 
या विभागात 81 गाण्यांची निवड झाली होती. यातील 15 गाणी अॅडवान्स कॅटेगरीमध्ये होती. त्यात नाटू-नाटूचाही समावेश होता.
 
त्याच्या स्पर्धेत अवतार- द वे ऑफ वॉटर सिनेमातील नथिंग इज लॉस्ट (यू गिव्ह मी स्ट्रेंग्थ) हे गाणं होतं.
 
हे गाणं कुठून आलं? 
नाटू-नाटू हे लोकप्रिय गाणं आहे हे आता जाहीर आहे. 
 
एनटीआर ज्युनियर आणि रामचरण हे दोघेही तेलगू सिनेसृष्टीतील चांगले नृत्य करणारे अभिनेते आहेत हे एस.एस. राजामौली यांच्या डोक्यात होतंच.
 
या दोन्ही अभिनेत्यांनी आपापल्या पद्धतीने अनेकवेळा आपापली पात्रता सिद्ध केली आहे.
 
त्यांना एकत्र नाचताना दाखवलं तर चांगलं होईल.
 
त्यांच्या एकत्र नृत्यामुळे प्रेक्षकांचा आनंद उंचावून तो एका चांगल्या नव्या पातळीवर नेता येईल असं त्यांना वाटत होतं. 
 
राजामौली यांनी ही कल्पना संगीतकार किरावानी यांना सांगितली.
 
किरावानी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “दोन नर्तक एकमेकांशी स्पर्धा करत नाचत आहेत असं मला गाणं हवं आहे, असं राजामौली यांनी सांगितलं होतं. हे गाणं लिहिण्यासाठी मी चंद्रबोस यांना निवडलं. दोन अभिनेते आपल्या नृत्याच्या आधारावर उत्साह, जोश निर्माण करू शकतील. फक्त ते सिनेमात 1920 च्या काळातल्या घटनांभोवती फिरत राहावं हे लक्षात ठेवलं पाहिजे, त्यामुळे शब्दही त्याच काळातले असण्य़ाची काळजी घ्या, असं मी चंद्रबोस यांना सांगितलं” 
 
गाणं कसं तयार झालं? 
राजामौली, किरावानी आणि चंद्रबोस यांनी या गाण्यावर 17 जानेवारी 2020 पासून काम सुरू केलं होतं.
 
हे काम हैदराबादेत अल्युमिनियम फॅक्टरीत आरआरआरच्या ऑफिसमध्ये सुरू झालं होतं. 
 
चंद्रबोस एकदा आपल्या गाडीत बसले तेव्हा त्यांच्या डोक्यात राजामौली आणि किरावानी यांनी दिलेले आदेश होते. त्यांची गाडी ज्युबिली हिल्सच्या दिशेने वेगाने जात होती.
 
त्यांचे हात स्टेअरिंगवर होते पण डोक्यात गाण्याचे विचार होते.
 
तेव्हाच त्यांच्या डोक्यात नाटू-नाटू हे शब्द आले. पण अशाने काही कोणती धून तयार झाली नव्हती.
 
त्यांनी त्याला 6-8 बीट्सच्या टेम्पोमध्ये गुंफले. 
 
किरावानी यांना हा साचा आवडत होता म्हणून त्यालाच आधार करायचं मी ठरवल्याचं चंद्रबोस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. 
 
25 वर्षांपूर्वीही किरावानी यांनी चंद्रबोस यांना सल्ला दिला होता, “जर लोकांमध्ये जोश निर्माण करायचा असेल तर गाणं या चालीत गुंफलं पाहिजे.” 
 
नाटू नाटू गाण्यात मुख्य अभिनेता आपल्या नृत्यकौशल्याचं प्रदर्शन घडवतो.
 
त्यासाठीच चंद्रबोस यांनी असं गाणं बनवलं. दोन दिवसांत त्यांनी गाण्याचे तीन मुख़डे बनवले आणि किरावानी यांना भेटायला गेले. 
 
त्यांनी आपल्या आवडीचं कडवं शेवटी ऐकवलं आणि आधी दोन वेगळी कडवी ऐकवली.. चंद्रबोस यांच्या आवडीचं कडवं किरावानी यांनीही निवडलं आणि ते गाणं स्वीकारलं गेलं. 
 
ते गाणं साधारणतः असं आहे-  
 
पोलमगट्टू धुम्मूलोना पोटलागिट्टा धूकिनट्टू 
 
पोलेरम्मा जातारालो पोथाराजू ओगिनट्टू 
 
किरुसेप्पुलू एसिकोनि कारासामू सेसिनट्टू 
 
मारिसेट्टू निदालोना कुरागुम्पू कोडिनट्टू  
 
दोन दिवसांत 90 टक्के गाणं पूर्ण झालं.
 
अर्थात इकडेतिकडे बदल करुन संपादन करण्यात गाणं पूर्णत्वास जाण्यात 19 महिने गेले.  
 
चंद्रबोस आणि किरावानी या काळात पूर्ण गाण्यासाठी चर्चा करत राहिले. 
 
सामाजिक आणि आर्थिक स्थितीचं चित्रण
सिनेमात भीम (ज्यु. एनटीआर) चं पात्र तेलंगणमधलं आहे तर राम (रामचरण)चं पात्र आंध्र प्रदेशातलं आहे.
 
त्यामुळे या प्रदेशात 1920 दशकातल्या भाषांमधील शब्द या गाण्यात निवडले आहेत. 
 
जसं की'मिरापा टोक्कु' (लाल मिरचीची पूड) 'दुमुकुल्लदतम' (वर-खाली उड्या मारणं) हे शब्द तेलंगणमध्ये फार लोकप्रिय आहेत. त्याकाळी तेलंगणमध्ये मुख्य अन्न जोंधळा होतं. त्याच्याबरोबर लाल मिरचीची चटणी खाल्ली जायची. 
 
जिथं शब्द विलीन होतील आणि त्यावर दृश्यांचा ताबा असेल, अशी स्थिती म्हणजे गाणं असं चंद्रबोस यांना वाटतं. त्याच्या या व्याख्येत हे गाणं पूर्णपणे बसत होतं. 
 
तेलगूमध्ये अनेक लोककथा आहेत. त्यातील पात्रांचाही गाण्यासाठी आधार घेतला गेलाय. 
 
हे गाणं काळभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायलं आहे. 
 
युक्रेनमध्ये चित्रिकरण 
नाटू-नाटू गाण्यानं एनटीआर आणि रामचरण दोघांची नृत्याची परीक्षाच घेतली असं म्हणता येईल. नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी या गाण्यासाठी 95 स्टेप्स कंपोज केल्या. 
 
सिग्नेचर स्टेपसाठी त्यांनी 30 प्रकार तयार केले. एनटीआर आणि रामचरण हात पकडून नाचत आहेत त्यासाठी विशेष काम केलं.
 
त्यासाठी 18 टेक घेण्यात आले होते मात्र एडिटिंगमध्ये दुसऱ्या टेकला फायनल केलं गेलं असं फिल्मच्या युनिटने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. 
 
हे गाणं युक्रेनच्या राष्ट्रपती भवनाबाहेर चित्रित केलं आहे. 
 
इथं चित्रिकरण सुरू असताना राजामौली आणि किरावानी यांनी गाण्याचा शेवटचं कडवं बदलण्याचा निर्णय घेतला.
 
त्यावेळेस चंद्रबोस पुष्पा सिनेमाच्या कामात होते.
 
त्यांच्याशी कॉन्फरन्स कॉल करण्यात आला आणि बदल केला गेला.  
 
गाणं पूर्ण व्हायला 19 महिने लागले. शेवटचं कडवं 15 मिनिटांत बदलला. 
 
गाण्यात बदल करुन रेकॉर्ड झालं आणि शूट झालं. 
 
नाटू-नाटू गाणं हे एनटीआर आणि रामचरण यांचं नृत्यकौशल्य दाखवतंच त्याहून भीम आणि राम यांच्या मैत्रीचे कंगोरे समोर आणतं. ही रामनं भीमसाठी केलेल्या बलिदानाची कहाणी आहे. तेलगू लोकांनी इंग्रजांचे आदेश मानण्यास कसा नकार दिला होता, भीमनं आपण प्रेम करत असलेल्या मुलीचं हृदय कसं जिंकलं हे यातून दाखवलं आहे. 
Published By -Smita Joshi 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Alia Bhattच्या RRR चित्रपटाने रचला इतिहास! या प्रकारात Golden Globe Award जिंकला