अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान या दोघांनी लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी आपल्या रेहान आणि रिदान या मुलांसाठी ते अनेकदा एकत्र येताना दिसतात. आतादेखील लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मुलांना आईची उणीव भासू नये म्हणून हृतिकने सुझानला २१ दिवस आपल्या घरी येऊन राहण्याची विनंती केली होती. सुझानने कोणतेही आढेवेढे न घेता हृतिकचा हा प्रस्ताव मान्य केला. याबद्दल हृतिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सुझानचे आभार मानले आहेत.
या पोस्टसोबत हृतिकने एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये सुझान खान हृतिकच्या घरात बसलेली दिसत आहे. आमच्या मुलांसाठी सुझान तात्पुरती माझ्या घरी राहायला आली आहे. या समजुतदारपणासाठी मी सुझानचा आभारी आहे, असे हृतिकने पोस्टमध्ये म्हटले आहे. सुझाननेही हृतिकच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. मानवी इतिहासात हे इतरांसाठी डोळे उघडणारे ठरेल, असे सुझानने म्हटले आहे.
बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिनेता रोहित रॉय याने म्हटले आहे की, हृतिक आणि सुझान तुम्ही किती चांगली प्रेमकहाणी लिहत आहात.