बॉलिवूड अभिनेता वरुण धवन ने सोशल मीडियावर ‘कुली नंबर १’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर त्याने शेअर केले आहे. या पोस्टरवर देखील करोनाचा इफेक्ट पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये वरुणच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. या अनोख्या पोस्टरमुळे ‘कुली नंबर १’चं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षाच्या सुरुवातीस या चित्रपटाचं चित्रीकरण संपणार होतं. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आलं.
आता देशभरातील लॉकडाउन हळूहळू उठवला जात आहे. निर्मात्यांना चित्रीकरणाची संमती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पोस्टर पाहून वरुण देखील चित्रीकरणासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे.