' चल मेरे साथी चल, आया तेरे दर पर दीवाना...!' यासारख्या अनेक गझलांचा सुमधुर आवाज म्हणजे उस्ताद अहमद हुसेन व उस्ताद मोहम्मद हुसेन हे बंधू. जयपूर येथील हुसेन बंधुच्या गायकीच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दा त...
प्रश्न : आपल्या गायन प्रवासाविषयी सांगा? उत्तर : अल्लाहच्या कृपेने व आई- वडीलांच्या आशिर्वादाने आम्ही दोघे भाऊ कला सादर करत असतो. आमच्याकडून सादर केलेल्या कलेला चोखंदळ प्रेक्षकाकडून दाद मिळणे, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. आमचे वडील उस्ताद मरहूम अफजल हुसेन जयपुरवाले यांच्याकडूनच आम्ही बालपणीच संगीत धडे गिरवले. 1959 मध्ये 'चाईल्ड आर्टिस्ट'च्या रूपात आम्ही जयपूर आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर यूथ, 'बी' ग्रेड, 'ए' ग्रेडमध्ये आमची निवड झाल्याने आम्हाला भारत सरकारकडून 'टॉप' ग्रेडने सन्मानित करण्यात आले. गेल्या 40-45 वर्षांपासून आम्ही गात आहोत.
प्रश्न : आपली ओळख कोणत्या गझलने करून दिली? उत्तर: व्यक्तीची ओळख तर परमेश्वर करून देत असतो. सुरवातीला 'गुलदस्ता' अल्बममधील 'मैं हवा हूँ, कहाँ वतन मेरा' ही गझल गायली. या गझलेमध्ये आम्ही हार्मोनायझेशनचे अनेक प्रयोग केले. सुरवातीला आम्ही सादर केलेला कला प्रकार प्रेक्षकाच्या लक्षात आला नाही. परंतु, जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा तीच आमची ओळख बनली.
प्रश्न : आपल्या दोन्ही भावांची जोडी एकत्रितरित्या कार्यरत आहे, त्यामागचे रहस्य काय? उत्तर : आम्ही दोघानी एकाच घरात जन्म घेतलाय. नेहमी सोबतच काम करण्याची शिकवण आम्हाला आमच्या वडिलांकडून मिळाली आहे. त्यांनीच आमची जोडी बनवली आहे. आमच्यातील नाते कमकुवत नाही. एक विचार, एक सुर व एक ओळख अशी आमची जोडी आहे.
प्रश्न : आपले अल्बम व मिळालेल्या पुरस्काराविषयी काही सांगा? उत्तर : आतापर्यंत आम्हा दोघा भावांचे गझलचे 65 अल्बम बाजारात आले आहेत. त्यातील गुलदस्ता, हमख्याल, मेरी मोहब्बत, द ग्रेट गझल्स, कृष्ण जनम भयो आज, कशिश, रिफाकत, याद करते रहे, नूर-ए-इस्लाम आदी गाजलेले अल्बम्स आहेत. आम्हाला पुरस्कारही बरेच मिळालेत. राजस्थान सरकारकडून राज्य पुरस्कार, राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 'बेगम अख्तर पुरस्कार', नवी दिल्ली, उ.प्र. सरकारद्वारा 'मिर्झा ग़ालिब पुरस्कार', महाराष्ट्र शासनाकडून 'आपला उत्सव पुरस्कार' असे अनेक पुरस्कार आहेत.
प्रश्न : संगीत क्षेत्रातील पॉप, इंडीपॉप व रिमिक्सबद्दल आपले मत काय? उत्तर : परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे ऋतु, विचार, परिस्थिती कधीच स्थिर राहत नाही. ते टप्प्याटप्प्याने बदलत असतात. संगीत तर परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे. संगीत क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली ओळख व्हावी या उद्देशाने काही लोक एक्सपेरीमेंट करताना दिसतात. पॉप, इंडीपॉप, रिमिक्स हे त्यातीलच काही आधुनिक प्रकार आहेत. कोणतेही संगीत खराब नसते. ज्या संगीतातील सुर हरवले आहेत. त्याला खराब संगीत म्हणता येईल.
प्रश्न : आपल्या दोघं भावाची आवडती गझल कोणती? उत्तर : ' ऐ मेरे साथी चल', 'मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा' चल मेरे साथ ही चल ऐ मेरी जाने ग़ज़ल इन समाजों के बनाए हुए बंधन से निकल चल मेरे साथ ही चल...।