Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवभारत अध्याय चोविसावा

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:56 IST)
पंडित म्हणाले :-
तेव्हां आपलें मरण चुकावें ह्या इच्छेनें त्या युद्धांतून एकदम परतून ( पळ काढून ) स्वसैन्यरहित व अफजलखान नसल्यानें लज्जित अशा त्या मुसेखानप्रभृति सरदारांनीं विजापुरास जाऊन काय विचार केला आणि काय केलें ? ॥१॥२॥
अफजलखानाचा अंत झाल्याचें व पन्हाळगड घेतल्याचें ऐकून अतिमूर्ख आदिलशानें स्वतः पुनः काय केलें ? ॥३॥
आणि तो गड बळानें घेतल्यावर अफजलखानाच्या वधकर्त्या त्या विश्वजेत्या वीरानें काय केलें ? ॥४॥
फाजल, याकुत, अंकुश, हसन व आपला परिवार यांसह मुसेखान विजापुरास जाऊन, आपल्या धन्यास प्रणाम करून, मान खालीं घालून पुढें हात जोडून उभा राहिला. ॥५॥६॥
तो खिन्न व अधोवदन आहे असें पाहून आदिलशहा गर्वयुक्त भाषणानें त्यास उत्तेजन देत म्हणाला. ॥७॥
आदिलशहा म्हणाला :-
एकदम साहस केल्यामुळें स्वामिकार्यामध्यें प्राण वेंचिलेल्या त्या ( अफजलखाना ) ला जर ती दशा प्राप्त झाली, तर तो शोचनीय झाला असें नाहीं. ॥८॥
स्वतः तरबेज - निष्णात व कपटी स्वभावाच्या शत्रूनें त्यास तेथें एकटा बोलावून निर्जन अरण्यांत ठार मारलें. ॥९॥
जर त्या वेलीं तो अफजलखान मोठें सैन्य घेऊन तेथें गेला असता, तर त्याला तशी दशा प्रपत झाली नसती. ॥१०॥
केवळ साहसानेंच कामें सिद्धी जात नाहींत; तर शहाणपणाचे पराक्रमच खरोखर मोठे फलप्रद होतात. ॥११॥
अरेरे ! त्या वनांत अफजलखानास ज्यानें क्रोधानें मारलें, त्याची उशापाशीं असलेल्या सर्पाप्रमाणें मुळींच उपेक्षा करतां कामा नये. ॥१२॥
म्हणून माझा अपराध करणार्‍या त्या अत्यंत दुःसह शिवाजीस सह्याद्रीपासून साफ उखडून काढतों. ॥१३॥
अहो ! सध्यां तोहि निघून वाईस आला आहे. लगेच सैन्य घेऊन तो पन्हाळगडावर येईल. ॥१४॥
अशी वदंता हेर येथें सांगत आहेत. म्हणून तुम्ही सर्वच चालून जाऊन मोठा पराक्रम करा. ॥१५॥
शत्रूंचा नाश करण्यास ग्रहांप्रमाणें अत्यंत जागरूक असे त्या त्या प्रांतांतील ते ते सेनानायक आणवून आणि दुसर्‍याहि अभिमानी सरदारांस साह्यार्थ पाठवून तुम्हीं पक्ष्यांप्रमाणें रात्रंदिवस अविश्रांतपणें चाल करा. ॥१‍६॥१७॥
फरादखानाचा नातू महायुद्धाभिमानी रुस्तुमजमान हा आमचा सेनाधिपति असूं दे. ॥१८॥
याप्रमाणें त्या सर्वांसच बोलून त्यानें त्यांचा यथोचित सत्कार केला असतां ते सर्वच सरदार आपल्या सामर्थ्यवान स्वामीस प्रनां करून भयंकर गर्जना करीत विजापुरांतून बाहेर पडले. ॥१९॥२०॥
नंतर पूर्वीच पाठविलेल्या हेरांणीं आदिलशहाजवळ त्वरित येऊन ती पन्हाळगडासंबंधाची बातमी सांगितली. ॥२१॥
आपली उंच फणा गारुड्यानें पकडली असतां सापास जसें दुःख वाटतें, तसा तो उत्कृष्ट गड त्या राजानें ( शिवाजीनें ) हस्तगत केलेला ऐकून आदिलशहास दुःख झाले. ॥२२॥
गडांचा स्वामी जो शिवाजी त्यानें तो गड काबीज केलेला ऐकून अल्लीशहा दररोज चिंतेनें मनांत पोळूं लागला. ॥२३॥
तेव्हां त्याचा निग्रह करण्यास आपण असमर्थ आहों असें समजून त्यानें दिल्लीच्या बादशहाची सेना लवकरच मदतीस आणविली. ॥२४॥
तेव्हां शिवाजीनेंहि शत्रूकडील दृढ युद्धेवेषधारी सरदार पुनः युद्ध करूं इच्छीत आहेत असें ऐकून पन्हाळगडच्या रक्षणार्थ उग्र ( कडवें ) तो लखलखणार्‍या शेंकडों शस्त्रांच्यामुळें भयंकर वणव्याप्रमाणें शोभणार्‍या त्या त्या सैन्यांसह वेगानें पुढें चालून गेला. ॥२५॥२६॥२७॥
शत्रूंनींसुद्धां रुस्तुम नांवाच्या आपल्या अत्यंत दुर्जय सेनाधिपतीच्या नेतृत्वाखालीं अभिमानानें पुढें चाल केली. ॥२८॥
तेव्हा शत्रुवीरांची ( मराठ्यांची ) सेना अजिंक्य आहे असें पाहून रुस्तुम फाजलप्रभृति आपल्या सेनानायकांस म्हणाला :- ॥२९॥
रुस्तुम म्हणाला :-
शस्त्रास्त्रांनीं सज्ज, दुष्कर कृत्यें करणारी, अत्यंत उत्साही, धैर्यवान, झगझगीत तेजस्वी निशाणें असलेली, मजबूत व्यूह रचलेली ही शत्रुसेना पहा. ॥३०॥
हिच्यामध्यें बलरामासारखे महावीर अतुलपराक्रमी शिवाजीचीं जणूं काय अनेक प्रतिबिंबेंच आहेत. ॥३१॥
तो हा शिवाजीचा सेनापति प्रतापी, महामानी नेताजी आमच्याशीं निकरानें लढूं इच्छीत आहे. ॥३२॥
त्याचप्रमाणें कवचधारी, पुष्कळ सैन्यानें युक्त, रागावलेला असा तरुण जाधवरावसुद्धां आमचा पराभव करूं इच्छीत आहे. ॥३३॥
शत्रूसेना छिन्नभिन्न करून टाकणारा, प्रचंड साहसी खराटे हा आपल्या हणमंत नांवाच्या पुत्रासह आम्हांस जिंकूं इच्छितो. ॥३४॥
युद्धांमध्यें अर्जुनासारखा, पांधरें निशाण असलेला, मोठ्या सैन्याचा अधिपति पांढरे आमच्याशीं अद्भुत युद्ध करणार. ॥३५॥
खङ्गधारी, प्रलयाग्नीप्रमाणें भयंकर, प्रत्यक्ष काळच असा काळा हिलालसुद्धां भोसल्याचें अत्यंत हित करील. ॥३६॥
तेजोराशि, महाबाहु हिराजी इंगळे, भिमाजी वाघ, सिधोजी पवार, महावीर गोदाजी जगताप, जणू काय दुसरा परशुरामच असा महाडिक, तसेच दुसरे युद्धनिपुण मोठमोठे सैनानायक शिवाजी राजाए साह्यकर्ते पुढें चालून येत आहेत. ॥३७॥३८॥३९॥
शत्रुराजांचा हन्ता, देवतुल्य शिवाजी राजा भोसला हा स्वतः युद्ध खास जिंकणार. ॥४०॥
म्हणून खरोखर ह्या आमच्या सेनानायकांनींदेखील सर्व बाजूंस आपआपल्या सैन्यांची चांगली रचना करून युद्धाच्या अघाडीस उभें राहावें. ॥४१॥
हे महायोद्ध्यांनो, मी खास मध्यभागाचें रक्षण करतों; पराक्रमी सरदार फाजल डाव्या बगलेचें रक्षण करूं दे. ॥४२॥
आणि महागर्विष्ठ - मलिक इतवार सादातासह सेनेच्या उजव्या बगलेचें रक्षण करूं दे. ॥४३॥
अजीजखानाचा पुत्र महाकीर्तिमान फत्तेखान आणि मुल्लाहय हे पिछाडीचें रक्षण करूं देत. ॥४४॥
संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे आणि दुसरे सज्ज योद्धे यांनीं चोहोंकडून सेनेचें रक्षण करावें. ॥४५॥
ह्याप्रमाणें त्यानें त्यांस सांगितल्यावर ते सर्व आपआपल्या स्थानीं राहून समग्र सेनेचें अव्यग्रपणें रक्षण करूं लागले. ॥४६॥
त्याच वेळीं शिवाजीराजानेंसुद्धां आपल्या सेनेची सभोंवती रचना करीत योद्ध्यांना उद्देशून समयोजित भाषण केलें. ॥४७॥
चतुरंग सेनेचा अधिपति हा नेताजी फाजलावर हल्ला करूं दे. शत्रुवीरांना मारणारा वाघ मुल्लाहयावर चाल करूं दे. ॥४८॥
मलिक इनबारावर इंगळे चालून जाऊं दे. महामानी महाडिकानें फत्तेखानाशीं लढावें. सिधोजी पवारानेसुद्धां सादातास तोंड द्यावें. गोदाजी हा घाटगे व घोरपडे यांजवर चालून जाईल. ॥४९॥
आणि अघाडीस असलेल्या रुस्तुम नामक शूर यवन सेनाधिपतीस मी युद्धांमध्यें ठार करीन. ॥५०॥५१॥
खराटे व पांढरे ह्यांनीं सैन्याच्या उजव्याबाजूवर आणि हिलाल व जाधव ह्या दोघांनीं डाव्या बाजूवर चालून जावें. ॥५२॥
याप्रमाणें राजेंद्र ( शिवाजी ) नें भाषण केल्यावर त्याच्या त्या महापराक्रमी योद्ध्यांनीं दुंदुभिध्वनिबरोबरच सिंहगर्जना केली. ॥५३॥
नंतर पुष्कळ प्रकारचे दुंदुभि, क्रचक ( रणवाद्यविशेष ), कर्णे, ढोल, गोमुख ( मृदंगविशेष ), शिंगें, अशा दोन्ही सैन्यांतील रणवाद्यांच्या दिशा दणाणून सोडणार्‍या ध्वनीनें आकाश व्यापून टाकलें. ॥५४॥५५॥
अग्रभागीं चालणार्‍या पताकांच्या चोहोंबाजूस फांकणार्‍या तेजानें सर्व आकाश चित्रविचित्र दिसूं लागलें. ॥५६॥
नंतर मर्यादांबाहेर अतिशय उसळाणार्‍या, गर्जना करणा‍र्‍या, अतिभयंकर अशा पूर्व व पश्चिम समुद्रांसारख्या त्या सेना परस्परांशीं भिडल्या. ॥५७॥
मग एकमेकांच्या संनिध आलेल्या त्या दोन्ही सैन्यांच्या अघाडीतील बाहुबलगर्विष्ठ योद्ध्यांनी आवेशानें गर्जना करीत व उत्सुकतेनें घोडे फेंकीत रुधिरधारांनीं रणभूमि भिजविली ( रणभूमीस स्नान घातलें ). ॥५८॥
इतक्यांत धावणार्‍या घोड्यांच्या खुरांनीं उडालेल्या धुळीच्या लोटांनी व्यापलेलें अंतरिक्ष, पावसाळ्याच्या आरंभीं वाहणार्‍या नव्या पाण्यानें भरलेल्या सरोवराप्रमाणें गढूळ झालें. ॥५९॥
तो वृष्टीचा समय ओळखून नवीन मेघांनीं जोराच्या सरींनीं आकाश जसें अगदीं आच्छादून टाकावें तसें धावणार्‍या धनुर्धरांनीं अनेक शरवृष्टींनीं तें एकदम पूर्णपणें झांकून टाकलें. ॥६०॥
आपला शत्रु पाहून हर्ष झालेल्या कोणा वीरानें, युद्धामध्यें धनुष्य ओढलें तोंच त्याच्या ( शत्रूच्या ) हातांतील भाल्यानें त्याचा हात भेदिला गेला असतांहि तो तेथें गोंधळला नाहीं हें आश्चर्य होय ! ॥६१॥
रणभूमीवरील विपुल कीर्तिरूप पुष्पें तोडण्यासाठीं धनुष्यरूपी लता तत्काळ ओढून त्या वीरांनीं हस्तकौशल्यानें बाणरूपी भ्रमरांच्या झुंडी शत्रूंवर वेगानें उडविल्या. ॥६२॥
चालून आलेल्या शत्रुयोद्ध्यांच्या तीक्ष्ण तरवारींच्या प्रभावानें मुंडकीं वेगानें तुटून जाऊन भूमीवर पडणार्‍या पताकावाल्यांनींसुद्धां, मुठी आवळलेल्या असल्यामुळें पताका मुळींच कोठेंहि सोडल्या नाहींत. ॥६३॥
युद्धामध्यें त्वरेनें घुसलेल्या घोडेस्वारांसह मिळून मोठ्या गर्वानें चालून येणार्‍या रुस्तुमखानावर अघाडीच्या अनेक पथकांवर शिवाजीनें स्वतः त्वेषानें हल्ला केला. ॥६४॥
तत्काळ धनुष्यें जोरानें ओढून अमोघ बाणांनीं लढणार्‍या शिवाजीच्या उत्तम योद्ध्यांनीं खवळलेल्या व हल्ला करणार्‍या महायुधधारी म्लेच्छांचीं मुंडकीं दया न दाखवितां पाडलीं. ॥६५॥
भोंसल्यांच्या सैन्यानें उत्साहानें फेंकलेल्या वज्रासारख्या आयुधांचा समूह रुस्तुमाचे योद्धे त्या अति प्रचंड झुंजामध्यें मुळींच सहन करूं शकले नाहींत. ॥६६॥
गजसमूहरूपी दुर्गामध्यें उभा असलेल्या व मेघाप्रमाणें प्रचंड गर्जना करणा‍र्‍या फाजलावर प्रचंड गर्जना करणार्‍या फाजलावर प्रचंड वार्‍याप्रमाणें सर्व बाजूंनी हल्ला चढवून शिवाजीच्या बलाढ्य सेनापतीनें त्यास गर्भगळीत केलें. ॥६७॥
शिवाजीच्या सैन्यांचा नेता जो नेताजी तो खवळलेला पाहून फाजलानें खरोखर प्रारंभींच पलायनरूपीं नाटकाची नांदी मोठ्यानें त्वरित म्हटली म्हणजे प्रथमारंभींच वेगानें पलायन केलें. ॥६८॥
रत्नखचित अलंकारांनीं विभूषित व रक्ताची उटी लावलेले कांहीं तरुण वीर दुसर्‍यांचें भय टाकून वीरश्रीनें युक्त असे रणांगणामध्यें शरशय्यांवर पहुडले. ॥६९॥
त्या महासंग्रामामध्यें कांहीं योद्धे खराट्यानें, कांहीं पांढर्‍यानें, कांहीं स्वतः जाधवानें, कांहीं स्वतः वाघानें हल्ला करून तत्काळ ठार केले. ॥७०॥
त्या अतिउग्रकर्म्या युद्धोत्सुक हिराजीनें ( हरिवर्म्यानें ) उत्साहानें हल्ला करून शत्रूंचा चुराडा केला. क्रोधाग्नीपासून पसरणार्‍या धुरानें ज्याची कांति धुरकटली आहे अशा हिलालानेम कांहींना ठार केलें. ॥७१॥
उद्धट रुस्तुमानें आपलें शस्त्र टाकलें असतां व फाजलानें युद्धांतून एकदम पळ काढला असतां गोंधळ उडालेल्या सादातप्रमुख सैन्याला आपला त्राता कोणीहि मिळाला नाहीं. ॥७२॥
तेव्हां पराभूत झालेला व गोंधळून गेलेला रुस्तुमखान पांचसहा घोडेस्वारांसह युद्धांमधून पळाला असतां अत्यंत असहाय असें अल्लीशहाचें समस्त सैन्य दाही दिशा शीघ्र पळत सुटलें. ॥७३॥
त्यानंतर, पराभव पावलेल्या, अत्यंत घाबरलेल्या, समोरून वेगानें पळून जाणार्‍या त्या रुस्तुमास तो निकट असतांहि व पकडण्यास योग्य असतांहि शिवाजीनें पकडलें नाहींच. कारण सुर्यवंशी राजे भित्र्यावर शौर्य गाजवीत नाहींत. ॥७४॥
“ जे आम्हांस युद्धांत सोडून स्वतः लगेच पळून गेले त्या निर्लज्जांचा पुनः आश्रय करण्याची आम्हांस लाज वाटते ” असाच जणूं काय मनांत पक्का विचार करून त्या आदिलशहाच्या सेनेंतील मत्त हत्तींनीं शरणांगतांचें रक्षण करणार्‍या बलाढ्य भोसले राजाचा आश्रय केला ( ते शिवाजीच्या हातीं लागले. ) ॥७५॥
उत्साहानें व आनंदानें शिवाजीनें मारलेल्या शत्रूंच्या अंगांतून पडलेल्या अलंकारांच्या राशींच्या तेजःप्रभावानें, लोकांचे नेत्र कौतुकानें आकर्षिणाच्या त्या समरश्रीला कांहीं अवर्णनीय शोभा प्राप्त झाली. ॥७६॥
प्रयत्नानें ( प्रयासानें ) बाहेर पडणार्‍या शेकडों घोड्यांस जिचें अंतरंग माहीत आहे अशी ती खोल, गर्जना करणारी, अति भयंकर, अद्भुत वेग असलेली, प्रवाहाच्या वाढीमुळें लगेच दुथडी भरून चाललेली रक्ताची नदी घडांच्या रांगेनें कशी बरें ओलांडिली ? ॥७७॥
याप्रमाणें रुस्तुमप्रभृति शत्रूंस पळवून लावून, तो प्रांत हस्तगत करून महादुंदुभीच्या मधुर ध्वनीनें दिशारूपी स्त्रियांची मुखकमलें उल्लसित करीत शिवाजी राजा झळकूं लागला. ॥७८॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

आले आणि दालचिनी टाकलेले पाणी तुम्हाला हिवाळ्यात 6 अनोखे फायदे देतील जाणून घ्या

शिर्षासन करण्याची पद्धत आणि 7 फायदे जाणून घ्या

लघू कथा : बेडूक आणि उंदराची गोष्ट

Old Delhi famous recipe : आता घरीच बनवा मटण निहारी

पुढील लेख
Show comments