कवींद्र म्हणाला :-
नंतर शिवाजीनें जुना राजनीतिमार्ग चालू करून सर्वच प्रभावली प्रांत स्वपराक्रमानें आपल्या हस्तगत केला. ॥१॥
जोराच्या - वेगाच्या युद्धांत निष्णात, प्रख्यात, शहाण्या अशा त्र्यंबक भास्करास शिवाजीनें लगेच प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमलें. ॥२॥
क्रोधानें राजापूरची संपत्ति हरण करणार्या व बलानें शृंगारपूर जिंकणार्या त्या शिवाजीस शत्रूकडील शेंअक्डों शरणेच्छु श्रेष्ठ सैनिक प्रणाम करूं लागले. ॥३॥
मग त्या नगराच्या ( शृंगारपूरच्या ) रक्षणासाठीं जवळच असलेला प्रख्यात गड क्षणभर पाहून त्यानें त्याचें प्रतीतगड असें नांव ठेविलें. ॥४॥
चंद्र, कमळतंतु, चांदणें, दंव, चंदन, चांपा इत्यादीच्यायोगें आनंद देऊन अत्यंत सुखावह अशा ग्रीष्म ऋतूनें त्याची सेवा केली. ॥५॥
आश्रयास असलेल्या बकुळी व पाडळी यांच्या फुलांच्या बाणांचा भाता धारण करणार्या व ज्याचे बाण जगास जिंकणारे आहेत अशा कोमल मदनानेंसुद्धां शिवाजीचें मन हरण केलें नाहीं ( तो मदनवश झाला नाहीं ). ॥६॥
ग्रीष्म ऋतु आला असतां अतिशय तापणांच्या सूर्याच्या योगें कोमट झालेल्या पाण्यच्या खालीं नद्यांत चांगलें शीतळ पाणी होतें ( व ) जनांवरें त्या आश्रयावर तेथें होतीं. ॥७॥
अतिशय कडक ऊन्ह असणार्या ग्रीष्म ऋतूनें प्रत्येक दिवशीं तलावांतील पाणी आटवून टाकल्यामुळें ( कमी कमी केल्यामुळें ) सारसपक्षीं चिखलांत बसूं लागले आणि मासे व कांसवें यांचे थवेच्या थवे मरूं लागले. ॥८॥
फुललेल्या शिरीष व पाडळी यांच्या छताच्या सुगंधानें सुगंधित झालेल्या वायूच्यायोगें विरक्त व विद्वान लोकांच्या मनाससुद्धां कामज्वराची बाधा झाली ! ॥९॥