उन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात. यात नाकाच्या पुढच्या भागातल्या नाजूक रक्तवाहिन्या (केशवाहिन्यांचे जाळे) उष्णतेने फुगून फुटतात व रक्त येते.
काही वेळा अतिरक्तदाब किंवा रक्ताच्या कर्करोगात पण घोळणा फुटतो. म्हणून वारंवार असा त्रास होत असल्यास तज्ज्ञास दाखवावे.
प्रथमोपचार
रक्तस्राव सुरू असताना जास्त हालचाल न करता बसून राहावे. डोके पुढे झुकलेले ठेवावे. म्हणजे रक्त गिळले जाणार नाही.
ऍड्रेनॅलिन स्प्रे उपलब्ध असल्यास नाकात एकदा फवारा मारावा. याने रक्तवाहिन्या आकसून रक्तस्राव थांबतो. वाटल्यास 5 मिनिटांनी परत एकदा मारावा. मात्र अतिरक्तदाबाच्या रुग्णांना हा उपचार करू नये.
नाकाचा पुढचा भाग हाताच्या बोटाने 2-5 मिनिटे दाबून धरावा. याने रक्तवाहिन्यांतून रक्त येणे बंद होते. नाकाला व गालांना थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तस्राव थांबायला मदत होते. रक्तस्राव थांबल्यावर उशी घेऊन उताणे निजून राहावे.
कारणे
नाकाला जखम होणे
कष्टाचं काम
उच्च रक्तदाब
उंचीवरच्या प्रदेशात जाणे
नाक फार जोरानं शिंकरणे
नाकातून रक्त आल्यास काय करावे
खाली बसावे
थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही
थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तस्राव थांबेल.
रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर, त्या नाकपुडीच्या वरच्या भागात घट्ट दाबून धरावे.
दोन्ही नाकपुड्यांतून रक्त येत असेल तर, आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात.
तरीही रक्तस्राव चालूच राहिल्यास, आणखी दहा मिनिटे दाब द्यावा.
रक्तस्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळं झाला असेल तर, केवळ हलकाच दाब द्यावा.
जोरदार रक्तस्राव चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.