Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 वरचं औषध शोधण्याच्या कामात किती प्रगती झाली आहे?

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (15:45 IST)
जेम्स गॅलाघर
कोव्हिड-19 आजाराच्या गंभीर रुग्णांना कोणत्या औषधाने फायदा होईल, यावर जगभरात चाचण्या सुरू आहेत. ज्या औषधांमुळे नक्कीच फरक पडताना दिसतोय ती कोणती, याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
 
औषधांवरील चाचण्या
वेगवेगळ्या देशांमध्ये तब्बल 150 औषधांवर संशोधन सुरू आहे. यापैकी बहुतांश औषधं ही पूर्वीपासूनच वापरात असलेली आहेत.
 
युकेमध्ये जगातली सर्वात मोठी क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या ट्रायलला 'रिकव्हरी' असं नाव देण्यात आलं आहे. यात 12 हजारांहून जास्त रुग्ण सहभागी झाले आहेत. कुठली औषधं परिणामकारक आहेत आणि कुठली नाहीत, याबाबत ठोसपणे काही निष्कर्ष मांडणारी ही चाचणी आहे.
जागतिक आरोग्य संघटनादेखील एक ट्रायल घेत आहे. या ट्रायलचं नाव आहे 'द सॉलिडॅरिटी'. वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतोय, अशा उपचारांचं मूल्यांकन करण्याचं काम या ट्रायलमध्ये सुरू आहे.
अनेक फार्मास्युटिकल (औषध निर्मिती) कंपन्यासुद्धा आपापल्या पातळ्यांवर आपापल्या औषधांच्या ट्रायल घेत आहेत.
या चाचण्यांची विभागणी ढोबळपणे तीन प्रकारात करता येईल.
 
शरीरात पसरण्याच्या कोरोना विषाणूच्या क्षमतेवरच थेट परिणाम करणारी अँटीव्हायरल औषधं
रोगप्रतिकारक यंत्रणेला शांत करणारी औषधं (शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा जेव्हा गरजेपेक्षा जास्त सक्रीय होते त्यावेळी रुग्णाचा आजार बळावतो आणि याचे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर मोठे दुष्परिणाम संभवतात.)
विषाणूवर थेट हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज. कोव्हिड-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातून किंवा प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या, अशा दोन्ही अँटीबॉडीजवर संशोधन सुरू आहे.
वेगवेगळी औषधं आजाराच्या वेगवेगळ्या स्तरावर चांगला परिणाम देऊ शकतात. उदाहरणार्थ- अँटीव्हायरल औषधं आजाराच्या सुरुवातीच्या काळात चांगले परिणाम देऊ शकतात. तर रोगप्रतिकारक यंत्रणेला शांत करणारी औषधं आजार बळावल्यावर परिणामकारक ठरू शकतात. या औषधांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सवरसुद्धा संशोधन होणार आहेत.
 
जीव वाचवणारं एकमेव औषध
सध्या जगभरात ज्या काही औषधांवर चाचण्या सुरू आहेत त्यापैकी केवळ स्टिरॉईड्स रुग्णाचा जीव वाचवू शकतात, असं आतापर्यंतच्या ट्रायल्समध्ये सिद्ध झालेलं आहे. कोरोना विषाणूविरोधातल्या लढ्यात हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
 
डेक्सामेथासॉन हे स्टिरॉईड व्हेंटिलेटरवरच्या रुग्णाला असलेला मृत्यूचा धोका एक तृतीयांशाने तर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णाचा मृत्यूचा धोका एक पंचमांशाने कमी करत असल्याचं यूकेमध्ये सुरू असलेल्या रिकव्हरी ट्रायलमध्ये आढळून आलं आहे.
 
शिवाय, हायड्रोकॉर्टिन या स्टिरॉईडचेही निष्कर्ष जवळपास सारखेच आहेत.
 
ही दोन्ही स्टिरॉईड्स रोगप्रतिकारक यंत्रणा गरजेपेक्षा जास्त सक्रीय झाल्यामुळे शरीराच्या आत आलेली सूज कमी करण्यात मदत करतात. अशाप्रकारच्या सूजेमुळे रुग्णाच्या जीवितालाही धोका पोहोचू शकतो.
 
शिवाय, स्टिरॉईड्स असलेली औषधं स्वस्त असतात. त्यामुळे जगभरातल्या सर्वच देशांमध्ये आणि सर्वच रुग्णांना ही औषधं परवडू शकतात.
 
मात्र, ही औषधं सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर फारशी उपयोगी नाहीत.
 
सकारात्मक परिणाम करणारी इतर औषधं कोणती?
ईबोला या आजारावर तयार करण्यात आलेल्या रेमडेसिव्हिअर या औषधाचेही सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रेमडेसिव्हिअर एक अँटीव्हायरल औषध आहे.
 
1000 पेक्षा जास्त लोकांवर करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध आजाराच्या लक्षणांचा कालावधी 15 दिवसांवरून 11 दिवसांवर आणत असल्याचं आढळलं आहे. मात्र, या औषधामुळे रुग्णाचा जीव वाचल्याचं आढळलेलं नाही. संशोधन मात्र अजूनही सुरू आहे.
 
या औषधाचा जवळपास संपूर्ण पुरवठा अमेरिकेने विकत घेतला असला तरी हे औषध तयार करणारी गिलीड कंपनी या औषधाची थोडी खेप दक्षिण कोरियालाही पुरवते.
शरीराच्या आतला दाह किंवा सूज कमी करण्यासाठी आपलं शरीरच इंटरफेरॉन बेटा हे प्रोटिन तयार करत असतं. यूकेतली सिनेर्गन ही कंपनी हे औषध तयार करते आणि नेब्युलायझरच्या मदतीने हे औषध कोव्हिड-19 रुग्णाच्या थेट फुफ्फुसांमध्ये टाकलं जातं.
 
या औषधामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा आजार बळावण्याची शक्यता कमी होत असल्याचं प्राथमिक निष्कर्षांमध्ये आढळून आलं आहे.
 
HIVची औषधं कोरोनावरील उपचार आहे का?
नाही.
 
लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिर ही जोडगोळी अँटीव्हायरल औषधं आहेत. ती HIVच्या वाढीस आळा घालतात.
 
ही औषधं कोरोना विषाणूंवर परिणामकारक असल्याची बरीच चर्चा झाली होती आणि सुरुवातीच्या संशोधनांमध्ये तसं आढळलंही होतं.
 
मात्र, यूकेतल्या रिकव्हरी ट्रायलमध्ये ही औषधं कुठलाच परिणाम करत नसल्याचं दिसून आलं. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्यांच्या सॉलिडॅरिटी ट्रायलमधून ही औषधं काढून घेतली होती.
 
मलेरियावरील औषधं कोरोनावर परिणामकारक आहेत?
याचंही उत्तर 'नाही', असंच आहे.
 
क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अँटीव्हायरल औषधं आहेत आणि ही औषधंदेखील रोगप्रतिकारक यंत्रणा शांत करण्याचं काम करतात.
 
कोरोना विषाणूवरील उपचार म्हणून या औषधांचीही बरीच चर्चा झाली होती. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर. शिवाय, प्रयोगशाळेतल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्येदेखील ही औषधं कोरोना विषाणूला आळा घालत असल्याचं आढळलं होतं.
 
मात्र, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोव्हिड-19 आजारावर उपचार म्हणून योग्य नसल्याचं यूकेच्या रिकव्हरी ट्रायलमध्ये सिद्ध झालं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या औषधांवर सुरू असलेली चाचणी थांबवली होती.
 
प्लाझ्मा थेरपी उपयोगी आहे का?
जे रुग्ण एखाद्या संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यातून बरे होतात अशा रुग्णांच्या शरीरात त्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात.
 
रक्तातल्या प्लाझ्मामध्ये या अँटीबॉडीज असतात. या उपचारपद्धतीत कोव्हिड-19 आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातून प्लाझ्मा काढून तो आजारी व्यक्तीच्या शरीरात सोडतात.
 
हा प्लाझ्मा गंभीररित्या आजारी रुग्णांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी मदतीचा हात ठरू शकतो, अशी आशा असते.
 
या उपचार पद्धतीवर युके, अमेरिका आणि इतरही काही देशांमध्ये अभ्यास सुरू आहे. यूकेमध्ये यावर दोन वेगवेगळ्या ट्रायल्स सुरू आहेत.
 
मात्र, उपचाराची ही पद्धत किती परिणामकारक आहे, हे आत्ताच सांगणं घाईचं ठरेल, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
 
खात्रीशीर औषध शोधून काढायला किती काळ लागेल?
कदाचित कोरोना विषाणूवर रामबाण औषध आपल्याला कधीच मिळणार नाही. फ्लू, कॉमन कोल्ड किंवा अशाच इतर संसर्गांसाठीसुद्धा आपल्याकडे कुठलंच औषध नाही.
 
मात्र, सध्या आपल्याकडे एक प्रभावी औषध आहे. ते म्हणजे स्टिरॉईड्स. तर काही औषधांच्या चाचण्या आशा पल्लवीत करणाऱ्या आहेत.
 
डॉक्टर अस्तित्वात असलेल्या आणि वापरासाठी सुरक्षित अशा औषधांवर प्रयोग करत आहेत. त्यामुळे या चाचण्यांचे निष्कर्ष लवकरच येतील, अशी अपेक्षा आहे.
 
हे झालं औषधांच्या बाबतीत. मात्र, लसीवरही संशोधन सुरू आहे. लस ही संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी वापरतात. तर औषधं लागण झाल्यावर त्यातून बरं होण्यासाठी वापरतात.
 
लस तयार करण्यासाठी संशोधकांना शून्यापासून सुरूवात करावी लागते. कारण नव्या रोगावर नवीन लस शोधावी लागते. त्यासाठी दुसऱ्या कुठल्यातरी रोगाची लस उपयोगी ठरत नाही.
 
कोव्हिड-19 आजारावर नवीन औषध शोधण्यासाठीचेही काही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यापैकी कुठलंच औषध सध्यातरी मानवी चाचणीसाठी तयार नाही.
 
उपचाराची गरज का आहे?
उपचार का गरजेचा आहे, याचं सर्वात स्वाभाविक उत्तर म्हणजे प्राण वाचवण्यासाठी. मात्र, आणखीही काही कारणं सांगायची झाल्यास लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग यासारखी जी बंधनं सध्या कोरोनामुळे ओढावली आहेत ती दूर करण्यासाठीसुद्धा कोव्हिड-19 आजारावर प्रभावी ठरणारं औषध किंवा लस लवकरात लवकर शोधून काढणं गरजेचं आहे.
 
या आजारावर प्रभावी औषध सापडल्यास तो फारसा गंभीर आजार राहाणार नाही. त्याची गणती सामान्य आजारांमध्ये केली जाईल.
 
जर उपचारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडणार नसेल तर अतिदक्षता विभागावर ताण येणार नाही. शिवाय, लोकांच्या आयुष्यांवर फार कठोर निर्बंध लादण्याचीही गरज भासणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments