Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
, मंगळवार, 31 मार्च 2020 (10:02 IST)
*नवीन १७ रुग्णांची नोंद;राज्यातील एकूण रुग्ण संख्या २२०*
*आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती*
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे तर आज  २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते तर करोना बाधित असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता १० झाली आहे. 
 
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील  :-
मुंबई ९२                                  
पुणे (शहर व ग्रामीण भाग) ४३    
सांगली  २५                         
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३
नागपूर     १६                          
यवतमाळ   ४                         
अहमदनगर    ५                       
सातारा, कोल्हापूर २            
औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक प्रत्येकी  १
इतर राज्य - गुजरात १
 
एकूण २२० त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू 
याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही.
राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
 
आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ९, यवतमाळ- ३, अहमदनगर- १, नागपूर- ४, औरंगाबाद- १
 
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाच्या राज्यातील मृतांची संख्या नऊ वर