जगभरात करोनाचा प्रादुर्भाव (#coronavirus)मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून देशातही करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (congress leader rahul gandhi)यांनी यावरून सरकारला इशारा दिला आहे. १० ऑगस्टपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांपर्यंत जाईल, असं ते म्हणाले आहेत. सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे.
“सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. या वेगानं करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर देशात १० ऑगस्टपर्यंत २० लाखांपेक्षा अधिक करोनाबाधित होती. सरकारला ही महामारी रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे,” असं मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केलंय त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
ओलांडला १० लाखांचा टप्पा
देशातील करोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला देशातल्या करोना रुग्णांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात ३ लाख ४२ हजार रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात करोनाची लागण होऊन २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात मागील गुरूवारी ८ हजार ६४१ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली. तर २४ तासांमध्ये २६६ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, २४ तासांमध्ये ५ हजार ५२७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे.