राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि अँटीव्हायरल औषधांचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडथळे येत आहेत. प्लाझ्मा थेरपी जीवनरक्षक उपाय म्हणून प्रभावी ठरत आहे. परंतु रुग्णांकडून प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण अल्प असल्याने त्याचा परिणाम उपचारावर होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रकडून (आयएमए) करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्राणवायूची कमतरता भासल्यास त्यांना ऑक्सिजन किंवा आयसीयूत दाखल करावे लागते. या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केल्यास त्यांना लवकर बरे करणे सहज शक्य होईल, परंतु महाराष्ट्रातील विविध हॉस्पिटलमध्ये याचा पुरेसा वापर केला जात नाही. प्लाझ्मा दाते पुरेशा संख्येने उपलब्ध नसल्याने प्लाझ्मा थेरपीचा अवलंब करता येत नाही. प्लाझ्मा थेरपीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी व प्लाझ्मा उपलब्ध होण्यासाठी कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करणे बंधनकारक करावे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व रुग्णांकडून बरे झाल्यावर १५ व्या दिवशी पुनर्तपासणीसाठी बोलवण्यात यावे. त्यावेळी त्यांची सर्वसाधारण तपासणी करून ते तंदुरुस्त असल्यास त्यांना प्लाझ्मासाठी रक्तदान करण्यास उद्युक्त करावे, अशी सूचना आयएमएकडून महाराष्ट्र सरकारला करण्यात आली आहे.