Publish Date: Fri, 03 Apr 2020 (14:54 IST)
Updated Date: Fri, 03 Apr 2020 (15:01 IST)
तबलिगी जमातच्या मरकजमध्ये उपस्थितांना ‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही' असा उपदेश करणार्या मौलाना साद यांनी घुमजाव केले असून त्यांचा आणखीन एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. दिल्लीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे साद यांनी म्हटले आहे. या ऑडिओमध्ये ते तबलिगी जमातच्या कार्यतर्त्यांना ‘डॉक्टरांकडे जाणे हे शरियतविरुद्ध नाही' असे समजावत देखील आहेत.
तबलिगी जमातचे अध्यक्ष साद यांचा हा ऑडिओ दिल्ली मरकजच्या यूट्यूब पेजवरून जाहीर करण्यात आला आहे. या संदेशात ‘जतातच्या कार्यकर्त्यांनी सरकारला पूर्ण मदत करायला हवी आणि डॉक्टरांचा सल्लाही घ्यायला हवा' असे मौलाना साद म्हणत आहेत. त्यासोबतच यापुढे कुठेही ‘जमा' लावण्यात येऊ नये, असेही त्यांनी बजावले आहे. उल्लेखनीय म्हणजे, तबलिगी जमातचे अनेक क्वारंटाइन करण्यात आलेले लोक डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे, साद यांनी आपल्या ऑडिओमध्ये जोर देऊन डॉक्टरांच्या सूचना पाळण्याचा संदेश दिला आहे. सोबतच हे शरियतच्या विरुद्ध नसल्याचेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.