देशातील कोरोनावर लस विकसित करणारी भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे.
कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच भारताच्या १२ शहरांमधील ३७५ स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. या लसीचे १२ शहरांमध्ये परीक्षण केले जात असून ज्या रुग्णालयांमध्ये याची मानवी चाचणी सुरु आहे, त्यात नागपूरमधील गिल्लूरकर, बेळगावमधील जीवनरेखा, दिल्ली आणि पाटण्यातील एम्स आणि पीजीआय रोहतकचा समावेश आहे.
पीजीआय रोहतकमध्ये कोवॅक्सिनवर संशोधन करणाऱ्या सविता वर्मा म्हणाल्या की, कोवॅक्सिन आतापर्यंत सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्याकडे सुरु असलेल्या मानवी चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकावर या लसीचा नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.