देशभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे, त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक आकडा समोर येत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. जरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झाला नसला तरी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकार आधीच सावध झाले असून, मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याच्या निर्णयापर्यंत आले आहे.
माहितीनुसार, राज्यात वाढत चाललेले कोरोना रुग्ण, तसेच केंद्रीय पथकाने रुग्णांच्या वाढीची दिलेली आकडेवारी लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर विचार – विनिमय सुरू आहे. तसेच, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 तारखेला मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई- पुणे या शहरांबाबत काय भूमिका घेणार आणि केंद्राकडून त्याला काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, राज्यात आज एकूण ४३१ नवीन रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६४९ वर पोहोचली असून दिवसभरात राज्यात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.