कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच बळावताना दिसत आहे. देशात आणि संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. एकिकडे देशभरात दर दिवशी हजारोंच्या संख्येनं नवे कोरोनाबाधित आढळत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातही परिस्थिती काहीशी चिंताजनक असल्याचं दिसत आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १०,२४४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, १२,९८२ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर घरी पाठवण्यात आलं. या आकडेवारीमध्ये २६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.
कोरोना रुग्णांची ही एकूण संख्या पाहता, आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १४,५३,६५३ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये मृतांचा आकडा ३८,३४७ वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ११,६२,५८५ वर गेली आहे. सध्याच्या घडीला राज्यात २,५७,२७७ रुग्णांवर कोरोनासाठीचे उपचार सुरु असल्याची माहितीही देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांतील रिकव्हरी रेट ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यांमुळं राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे.