ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा यासाठी राज्य सरकार काहीही करायला तयार आहे असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
"ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे," असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे नुकताच नाशिकमध्ये 22 जणांनी आपला जीव गमावला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते.
टोपे पुढे म्हणाले, "ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू आहे," असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत."
"केंद्र सराकारकडून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू असून ती जर तातडीने झाली, तर त्याचा आपल्याला आधार मिळू शकतो. समुद्र किनाऱ्यावरचं राज्य म्हणून त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो," असंही टोपे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.