Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर
, शनिवार, 25 एप्रिल 2020 (09:48 IST)
५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी
राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६८१७
राज्यात कोरोना बाधित ९५७ रुग्ण बरे होऊन घरी
आरोग्यमंत्री राजेश टोपे
 
मुंबई, दि. २४ : आज राज्यात कोरोनाबाधीत ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे . यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणा-या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.
 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७७०२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २८.८८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धारावीत करोनाबाधित रुग्णवाढीचा वेग चारपटीने मंदावला