राज्यात लसीकरणाला पुन्हा मोठा ब्रेक लागला असून अनेक जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात लसीकरण ठप्प होते. सोमवारपासून लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू झाले. आतापर्यंत पहिला व दोन्ही डोस घेणाऱ्यांची सरासरी टक्केवारी २९.९२ अशी आहे. अनेक जिल्ह्यांत पहिला डोस घेणाऱ्यांना ८४ दिवस झाल्यानंतरही १० ते १५ दिवस लस मिळत नसल्याचे वास्तव एका वृत्तसंस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
कोव्हॅक्सिन लस सहज उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे.त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याचे चित्र आहे.पहिल्या पाच जिल्ह्यांत भंडारा,सिंधुदुर्ग,चंद्रपूरकोल्हापूर,बीड व नागपूर यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव व पालघर हे पाच जिल्हे तळात आहेत. मुंबईत तीन दिवस लसीकरण बंद होते, सोमवारी लसीकरण सुरू झाले. खासगी रुग्णालयात लस आहे, मात्र लसीकरण केंद्रांमध्ये लस नाही,अशी स्थिती मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महानगर प्रदेशात आहे.
कुठे तरुणांना लस मिळत आहे, तर ज्येष्ठांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. कुठे ४५ ते ६० या वयोगटाला लस आहे, तर इतरांना नाही अशीही विचित्र स्थिती आहे. मुंबईत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ १२ लाखांवर आहे. मुंबईत आतापर्यंत ६० लाखांवर लसीकरण झाले आहे. त्यात ४७ लाखांवर पहिला डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये महिला ४४ तर पुरुषांचे प्रमाण ५५ टक्के आहे.