Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळी बुरशी म्हणजे काय? म्युकर मायकोसिसमध्ये काळजी कशी घ्यावी, उपचार काय आहेत?

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (22:01 IST)
मयांक भागवत
'म्युकर मायकॉसिस'चा समावेश साथीच्या रोगांमध्ये करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसंच त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केंद्राने राज्यांना जारी केल्या आहेत. पण म्युकर मायकोसिस किंवा काळी बुरशी म्हणजे काय? हे आपण जाणून घेऊया.
 
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. या आजाराला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात.
 
कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
 
बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते.
 
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे.
कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस. आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं हा आजार काय आहे, आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे.
 
काळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना मोफत उपचार कसे मिळतील, याबाबत राज्य सरकारने काय म्हटले आहे हे देखील आपण पाहाणार आहोत. त्या आधी हा आजार नेमका काय आहे हे समजून घेऊत.
काय आहे 'म्युकर मायकॉसिस'?
 
राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये.
 
मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात, "सोप्या शब्दात सांगायचं झालं. तर, म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे."
तज्ज्ञ सांगतात, बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहाते. "ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते," असं डॉ. चव्हाण पुढे सांगतात.
 
'म्युकर मायकॉसिस' आजाराची लक्षणं?
 
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
 
नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची चार प्रमुख लक्षणं सांगतात.
 
· नाकातून रक्त येणं
 
· मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
 
· डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते
 
'म्युकर मायकॉसिस' ची कारणं?
 
डॉ. चव्हाण म्हणतात, "रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे."
मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशिअन डॉ. हनी सावला 'म्युकर मायकॉसिस'ची चार प्रमुख कारणं सांगतात.
 
· अनियंत्रित मधुमेह. शरीरातील सारखेचं अनियंत्रित प्रमाण
 
· स्टीरॉईडचा अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापर
 
· ब्रॉड स्पेक्ट्रम एन्टीबायोटिक्स
 
· शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणं
 
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना हा आजार होत असल्याने, सर जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख म्युकर मायकॉसिसला संधीसाधू आजार म्हणतात.
 
कोरोनासंसर्ग आणि म्युकर मायकॉसिसचं नातं काय?
 
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकर मायकॉसिसचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसून आलंय.
डॉ. भालेकर याची कारणं सांगतात,
 
· कोरोनारुग्णांची उपचारादरम्यान कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती
 
· कोव्हिड रुग्णांना दिले जाणारे स्टीरॉईड्ज
 
· शरीरातील व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध
 
"कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो," असं ते म्हणतात.
 
नानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील एका रुग्णाची माहिती देताना सांगतात, "एक 30 वर्षांचा युवक सायनस आणि डोळ्यांची तक्रार घेऊन रुग्णालयात आला. त्याचा डोळा काढून सायनस इंन्फेक्शन काढावं लागलं. संसर्ग डोक्यात पसरण्यापासून आम्ही रोखू शकलो."
प्री-कोव्हिडमध्ये अनियंत्रित मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट झालेल्यांमध्ये डॉक्टरांना हा संसर्ग पहाण्यास मिळाला होता.
 
मधुमेही रुग्णांना जास्त त्रास का होतो?
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण.
 
"जे जे रुग्णालयात म्युकर मायकॉसिसमुळे उपचार घेणारे बहुतांशी रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत," असं डॉ. पारेख सांगतात.
 
"कोरोनासंसर्गात मधुमेह वाढतो. इम्युनिटी कमी झाल्याने म्यूकर मायकॉसिस जास्त घातक ठरतोय. मधुमेह नसलेल्यांना उपचारादरम्यान स्टिरॉईड दिल्याने शरीरात सारखेची मात्रा वाढते. अशा रुग्णांमध्येही हा आजार घातक असल्याचं आढळून आलंय," असं डॉ. चव्हाण म्हणतात.
 
'गेल्या 20 वर्षांत फक्त 15 रुग्ण पाहिलेत'
 
डॉ. शरद भालेकर सांगतात, "गेल्या 20 वर्षांत फक्त 15-20 म्यूकर मायकॉसिसने ग्रस्त रुग्णांवर उपचार केले आहेत. पण, एका वर्षाच्या कोरोनाकाळात आत्तापर्यंत 25 रुग्णांवर उपचार केले आहेत."
तज्ज्ञ सांगतात, म्युकर मायकॉसिसच्या देशभरातून केसेस पहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. गेल्यावर्षी गुजरात आणि मध्यप्रदेशात ही प्रकरणं आढळून आली होती.
 
नानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील सांगतात, "गेल्या वर्षभरात 10 ते 15 रुग्णांवर उपचार केले आहेत. हे सर्व 30 ते 50 या वयोगटातील आहेत."
 
डोळे जाण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायनसमध्ये वाढलेलं इन्फेक्शन डोळ्यांच्या ऑर्बिटमध्ये (डोळा असलेलं ठिकाण) जातं.
 
डॉ. रागिनी पारेख सांगतात, "संसर्ग डोळ्यात गेल्यास उपचार आव्हानात्मक आहेत. काही केसमध्ये रुग्णाचा डोळा काढावा लागतो."
 
डॉक्टर सांगतात, त्यांच्याकडे येणारा रुग्ण सायनसमध्ये कंजेशन किंवा डोळ्यांनी कमी दिसत असल्याची तक्रार घेऊन येतो.
"गेल्याकाही दिवसात म्युकर मायकॉसिस झालेल्या सहा रुग्णांचे डोळे काढवे लागलेत," असं नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. शरद भालेकर यांनी सांगितलं.
 
हा संसर्ग जीवघेणा आहे का?
तज्ज्ञ सांगतात, म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
 
व्हॉकार्ट रुग्णालयाच्या डॉ. हनी सावला सांगतात, "म्युकर मायकॉसिसने ग्रस्त एका रुग्णाचा मृत्यू झालाय."
 
"संसर्ग शरारातील मेंदू आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचला. तर, रुग्णाला मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पॅरालिसिस किंवा मृत्यू होण्याची भीती असते," असं डॉ. अमोल पाटील सांगतात.
 
उपचार काय?
डॉ. चव्हाण म्हणतात, म्युकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस क्लिअर करण्यासाठी 'एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी' करुन बुरशी काढली जाते."
 
एम्फोटेरिसिन इंजेक्शनचा शोध
साताऱ्यातील व्यवसायिक सचिन जाधव यांच्या वडीलांना कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकर मायकॉसिसचा त्रास सुरू झाला. एक-दोन दिवसात वडीलांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सचिन गेले दोन दिवस म्युकर मायकॉसिसवर उपचारासाठी 'एम्फोटेरिसिन' इंजेक्शन शोधत आहेत.
 
सचिन जाधव सांगतात, "सातारा, पुणे आणि मुंबईत औषधासाठी प्रयत्न केला. पण, कोणाकडेच औषध उपलब्ध नाहीये. अचानक मागणी वाढल्याने स्टॉक नसल्याचं सांगितलं जात आहे."
 
"गेल्याकाही दिवसात या औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बाजारात औषधाचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक लोकांचे फोन येत आहेत. पण, औषध उपलब्ध नाहीये," असं औषधांचे डिलर ललित गोरे म्हणाले.
 
म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
 
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.
 
या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
जालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.
 
नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत आहे. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
 
या आजारावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
म्युकर मायकोसिस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख