Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे !

सौ. कमल जोशी

Webdunia
आपण सर्वजण काहीतरी अपेक्षा बाळगून जगत असतो. माणसाचा हा सहज स्वभाव आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करणारी एक शक्ती आहे, ती म्हणजे दैवी शक्ती! दैवी शक्तीला नि‍रनिराळी नावे आहेत कोणी तिला देव म्हणतो, कोणी भगवंत म्हणतो तर कोणी ईश्वर! नावे निरनिराळी असली तरी तत्त्व एकच. हे तत्त्व समजावून घ्यावे आणि दैवी शक्तीला शरण जावे! शरणागती हे परमार्थाचे भूषण आहे, नव्हे नव्हे, ते ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. माणसाला लाभलेले जीवन कसेतरी असह्यपणे त्याने जगू नये. जीवन डौलदार आणि सुंदर व्हावे त्याकरिता दैवी शक्तीचा म्हणजेच श्रीहरीचा आधार घ्यावा. आपल्या मनाला वश केल्याने श्रीहरीचा आधार मिळतो. हेगुह्य आहे. माणसाने हे रहस्य जाणावे ह्याकरिता संतांचा प्रपंच!

संत स्वामी रामदास हो महान तत्त्वचिंतक आणि असामान्य विभूती! त्यांच्या विपुल साहित्य भांडारात 'मनाच्या श्लोकांना' अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी ह्या लहानशा ग्रंथात जीवनविषयक तत्त्वज्ञान विशद केले आहे. मनाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनतेला उपदेश केला आहे. प्रेमाने श्रीहरीला शरण जाण्याचा सल्ला दिला आहे. श्रीहरी प्राप्त करून घेण्याचे साधन सांगितले आहे. मनाचा श्लोक हा एक लहानसाच ग्रंथ आहे. तो सूत्रबद्ध पद्धतीने लिहिला आहे. ते सूत्र असे आहे.

आधी ते करावे कर्म । कर्म मार्गे उपासना।।
उपासका सापडे ज्ञान। ज्ञाने मोक्षची पावणे।।

कर्म कोणते करावे? जीवनाची वाटचाल करणे हेच कर्म. वाटचाल करायचीय तर ती 'मना सज्जना भक्तिपंथेची जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें। जनी निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें। जनीं वंद्य तें सर्वभावें करावें।' अशी करावी.

भक्तीच्या मार्गाने जायचे हा निश्चय झाला तर प्रथम भक्तीची ओळख करून घेणे आवश्यक आहे.

भक्ती म्हणजे देवावर प्रेम करण्याची युक्ती! ही युक्ती साधण्यास प्रथम देवावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे! देवावर विश्वास ठेवला की, देव आहे हा दृढ भाव होतो. देवावरील भाव दृढ होण्यास श्री समर्थांनी नामसाधना सांगितली आहे. नामातून भाव, भावातून निष्ठा व निष्ठेतून देवावरील प्रेम प्रगट होते. त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. समर्थ म्हणतात, ''जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावे - जनीं वंद्य तें सर्वभावें करावें।'' शास्त्राने जो बरे म्हटले त्याचा ‍स्वीकार करावा. वाईट म्हटले ते त्यागावे. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ। जे जे करण्‍यास योग्य वाटते ते ते श्रद्धेने करावे. विश्वासाने करावे. श्रद्धा हे परमार्थाचे माहेरघर आहे. भगवंत म्हणतात - ''श्रद्धावान लभते ज्ञानं'' ज्ञानप्राप्ती तर होतेच शिवाय श्रीहरीची भेटही होत, हेच भक्ती तत्त्व. ते एकदा कळले की त्या मार्गाने वाटचाल करणे सोईचे जाते. समर्थ म्हणतात 'गमू पंथ आनंत ह्या राघवाचा'। राघवाचा म्हणजेच + म्हणजेच रामाचा मार्ग अर्थात तोच ब्रह्मप्राप्तीचा मार्ग! हा ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आक्रमण करताना जिवाला सात अवस्थांतून जावे लागते. त्या अवस्था अशा आहेत. 1) अज्ञान 2) आवरण 3) विक्षेप 4) परोक्ष ज्ञान 5) अपरोक्ष ज्ञान 6) तृप्ती 7) शोकापगम. आपला जीव परब्रह्माचा अंशच आहे. परब्रह्मातून बाहेर पडला व त्याने दृश्य जगताचा आधार घेतला. तो आपल्या स्वस्वरूपाला विसरला. अज्ञानाच्या आवरणाने एक असता दुसरे भासले. जिवाची तशीच भ्रमावस्था होते. हा भ्रम दूर करून जिवाने शब्दा पलीकडील ज्ञानाचा विचार केला की त्याला प्रत्यक्ष ज्ञान मिळते. ज्ञानानेसमाधान प्राप्त होते. मग दु:खनाश होतो. दु:खनाश झाला की 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असा अनुभव येतो. त्यातून आनंदच आपले स्वरूप आहे याची जाणीव होते. म्हणून समर्थ म्हणतात, ''पाहावे आपणासी आपण'' तरच श्रीहरी पावतो.

एकदा स्वत:ला पाहता आले की श्रीहरीला वेगळेपणाने पहावेच लागत नाही. हे साधण्याकरता मनाला वश करण्याची आवश्यकता आहे. मन म्हणजे काय ते पाहणे अगत्याचे आहे. कारण कोणतीही काठीणातील कठीण गोष्ट मनाच्या निश्चयाने साध्य होऊ शकते. म्हणून आपण मनाला इंद्रियांचा राजा म्हणतो. मनाच्या सामर्थ्यावर माणसाचे अंतर्बाह्य व्यवहार चालू असतात म्हणून मन म्हणचे काय ते पाहू!

'' मन म्हणजे निश्चल आत्मस्वरूपात चंचल द्वैत कल्पनाचा भास उत्पन्न करून निरनिराळे भेद ओळखण्याचे स्वाभाविक सामर्थ्य'' मन म्हणजे अखंड विचारांचा प्रवाह! म्हटलेच आहे ना 'इंद्रियांना मनश्चास्मि' मन द्वैताचे मूळ आहे. ते अतींद्रीय आहे. विरोधी गुणांनी युक्त आहे, ते सुष्ट आहे, दुष्ट आहे. ते चंचल आहे, निश्चल आहे. ते शत्रू आहे तसे मित्र आहे. ते उपकारी आहे तसे अपकारीही आहे. ते एकदा वश झाले, आपले मित्र बनले की ते स्वत: मरते व आपल्याला अमर करते. मनाचा एक गुण फार चांगला आहे. ते एखाद्या गोष्टीवर रमले की तेथेच रमून जाते. अशा मनाला यश करण्याचे उपायही श्री समर्थांनी सांगितले आहेत. ते म्हणतात -

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नानाविकारी।
नको रे मना सर्वथा अंगिकारू।
नको रे मना मत्सरू दंभभारू।

कामातून पंच रिपु उद्‍भवतात. ते उद्‍भवू नयेत म्हणून 'मना सत्य संकल्प जीवी धरावा' गोड बोलावे तसेच आचरण करावे. परद्रव्य, पर स्त्रीची अभिलाषा धरू नये. वैराग्यप्राप्ती करून घ्यावी. सज्जनाची संगती धरावी. सज्जन संगतीने ज्ञान व ज्ञानाने परमार्थाचे ध्येय म्हणजे मुक्ती प्राप्त होते. म्हणून परमार्थाच्या मार्गाने, राघवाच्या पंथाने वाटचाल करावी. (तरी श्रीहरी पाविजेतो) तरच श्रीहरी पावतो.

प्रपंच, परमार्थ ही दोन जीवनरूपी रथाची दोन चाक आहेत. जीवनाला सौंदर्य आणायला प्रपंचाबरोबर परमार्थाची नितांत आवश्यकता आहे. जे गुण प्रपंचाला डौलदारपणा आणतात तेच गुण परमार्थातही उपयोगी पडतात व जीवन आनंदमय करतात. समर्थ म्हणूनच प्रपंचातील गुणांची यादी देतात व माणसाला जीवन सौंदर्यमय करायचे असल्यास काय करावे हे सांगतात. तसेच काय करू नये हेही सांगतात. राघवाच्या मार्गाने वाटचाल करताना येणार्‍या अडथळ्यांना दूर कसे करावे ह्याचे मार्गदर्शनही करतात.

मनाचे श्लोक स्वत:च्या मनाशी समर्थांनी केलेला संवाद आहे. म्हणून तो आत्मसंवाद आहे. मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे। हा श्रीमसर्थांचा अत्यंतिक सुखप्राप्तीसाठी मनाला केलेला उपदेश आहे. हे मना 'भक्तिपंथेचि जा' व भक्तिसाधनेचा राजमार्ग किती सुखद आहे याचा आनंद घे. कारण त्या मार्गाने जातानाच 'श्रीहरि पाविजेतो स्वभावे'! भक्तीच दीनता असते सत्त्व जागृती असते. स्वभावे म्हणजे विनाकष्टाने! सहज मुक्त किंवा सहज देव का पावतो? भक्ती ही फलरुपिणी आहे. भक्तीचा प्रारंभ भक्तीनेच होतो. प्रेमाने भक्तीत प्रगती होते व भक्तीचा शेवट प्रेमातच होतो. म्हणूनच म्हटले आहे ना ''भक्ती ज्ञानाची माउली। भक्ती कृपेची साउली। जिनेनामरूपा आणिली। ब्रह्ममूर्ती भली अनायसे।। भक्ती ज्ञानाची माऊली आहे. भक्तीची कांस धरली की तीच भक्ताला ब्रह्ममूर्तीचा अनुभव आणून देते. त्याकरिता प्रेम भक्ती करायची ती शामसुंदर रामप्रभूवर. मूळ निर्गुण राम, पण त्याचे सगुण रूप आधी कळल्याशिवाय निर्गुणापर्यंत जाताच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ''सगुणाचेनि आधारे। निर्गुण पाविजे निधरि।।'' त्याकरिता सर्वांभूती असलेला तो अंतरात्मा त्याच्यावर प्रभू रामचंद्राची भावना केली, प्रेम केले तरच तो श्रीहरि सहज पावतो व भक्ताच्या (साधकाच्या) जीवनाचे सार्थक करतो.

जयजय रघुवीर समर्थ।
सर्व पहा

नवीन

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

साकोरीचे सद्गुरू श्री उपासनी महाराज

आरती सोमवारची

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

| श्री कार्तिकेय कवच ||

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments