Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय

Webdunia
PR
PR
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

PR
PR
श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय.

श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.

श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे.

महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'माणिकप्रभु' हा तिसरा व 'श्री स्वामी समर्थ महाराज' हा चौथा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात.

दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते.

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments