Marathi Biodata Maker

समन्वयाची देवता - श्री दत्त

वेबदुनिया
दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्बूत निर्मिती आहे. शैव, वैष्णव व शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार बाराशे वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. महानुभावसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. तसेच खास दत्तभक्तीची परंपरा चालविणारा दत्तसंप्रदायही गेली पाचशे वर्ष महाराष्ट्रात नांदत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रद्धेय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत.

भारतीय संस्कृतीत वेदांतील इंद्र ही वीरदेवता आहे, तर मध्ययुगातील दत्त ही सिद्धदेवता आहे. दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे. भारतीय संस्कृतीतीत अत्यंत परिणत विचार आणि निगूढ भावना व्यक्त करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद्भूत प्रतीक जन्म पावले आहे. त्यात समग्रता आणि सामंजस्य असल्याने ते सार्वत्रिक श्रद्धेचा विषय बनले आहे.

दत्त चरित्र हे सगुण साकार ईश्वरावताराचे नसून चिरंतन मुल्यांच्या विकास प्रक्रियेचे आहे आणि म्हणूनच दत्तात्रयेची उपासना ही सर्वोच्च जीवन मुल्याची साधना आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्या अवतारानंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदूंबर, वाडी व गाणगापूर ही त्या संप्रदायाची प्रधान तीर्थस्थाने बनली. श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारातून जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला. त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाहही नांदत राहिले. परंतु, त्यांचे प्रवाह व्यापक नसल्याने ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांना संप्रदायाचे स्वरूप आले नाही. आज ज्याला आपण दत्त संप्रदाय म्हणून ओळखतो, तो प्रवाह श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्यातून प्रकटला आहे.

दत्त संप्रदायाचे उपास्य असलेला दत्तात्रेय हा गुरूदेव आहे. त्याची उपासना गुरूस्वरूपातच करायची असते. श्रीगुरू किंवा गुरूदेव दत्त हा त्याचा जयघोष आहे. त्याचमुळे गुरूसंस्थेला प्राधान्य असलेल्या सर्व साधनप्रणालीत दत्तात्रेयाची पुज्यता रूढ झाली. परमार्थात गुरूसंस्थेचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. विकल्पविकारांचे तिमिर दूर सारून यथार्थज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यक्ता असते. दत्तात्रेय हा परमगुरू असल्याने पथदर्शक गुरू आणि गुरूच्या मार्गदर्शनामुळे होणारी परमप्राप्ती हे दोन्ही विशेष त्याच्या स्वरूपात सामावले आहेत.

दत्त संप्रदायात सगुणध्यानासाठी जरी दत्तात्रेयांचे सालंकृत सगुणरूप वापरले जात असले तरी पूजोपचारासाठी मूर्तीऐवजी पादुकांचे स्वरूप विशेष मानले जाते. औदुंबर, वाडी व गाणगापूर या तीनही ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गुरूचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य आणि गुरूलीलामृत हे ग्रंथ दत्त संप्रदायात विशेष मान्यता पावलेले आहेत.

( संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहास या पुस्तकातील संकलन) 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मासिक दुर्गाष्टमीला माँ दुर्गा ची पूजा करा लाभ मिळतील

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारी करा आरती सूर्याची

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments