Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीदत्त विजय अध्याय सातवा

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (14:50 IST)
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । राहोनिया महाराष्ट्रात । लक्षावधींचे कल्याण करीत । मग तेथोनिया निघत । कृष्णातटाक यात्रेसी ॥१॥
 
श्रीक्षेत्र औदुंबर । दत्त स्थान मनोहर । कृष्णानदी तटाकतीर । तेथोनी यात्रा आरंभिती ॥२॥
 
भुवनेश्वरीचे घेवोनी दर्शन । प्रदक्षिणा आरंभिती तेथोन । ब्रह्मनाळ गणेशवाडी करोन । मांजरी मुक्कामी पोचले ॥३॥
 
तया मांजरी गावात । एक औदुंबर वृक्ष असत । कृष्णाकाठी एकांतात । तेथे बैसले श्रीस्वामी ॥४॥
 
औदुंबर वृक्षातळी । श्रीदत्त चंद्रमौळी । पाहोनी जमली मंडळी । प्रश्न विचारण्या कारणे ॥५॥
 
एक स्वामीसी विचारत । हा मारुती इचलकरंजे असत । याचे लग्न न होत । बहु प्रयत्न केले हो ॥६॥
 
हासोनी स्वामी म्हणत । लग्न होईल सात दिवसात । सर्वां आश्चर्य वाटत । पाहाती एकमेका ते ॥७॥
 
सर्व म्हणती एक सुरात । तुम्ही राहा येथे दिवस सात । मारुतीचे लग्न जव होत । मगची प्रस्थान करा तुम्ही ॥८॥
 
स्वामी तयांसी हो म्हणत । तेथेचि मुक्काम करीत । चार दिवस होवोनी जात । परी होई ना काहीही ॥९॥
 
पाचवे दिवशी मुलगी येत । बरोबरी माँ बाप असत । मारुती पडे पसंत । सातवे दिनी होई लग्न ते ॥१०॥
 
हा पाहोनी चमत्कार । सर्व म्हणती दत्त दिगंबर । प्रकटला पाहा येथवर । नर देहाते धरोनिया ॥११॥
 
नामदेव नामे भक्त । दोन पत्नी त्यासी असत । परी काही नसे अपत्य । म्हणोनी दुःखी तो असे ॥१२॥
 
स्वामी आशीर्वाद देत । दोन्ही स्त्रियांसी संतान होत । आनंदे स्वामींसी भजत । उद्धार केला म्हणोनिया ॥१३॥
 
सर्व भक्तां समवेत । स्वामी बसलेले असत । शंकर अंबी म्हणोनी भक्त । सौंदत्तीचा तो असे ॥१४॥
 
अकस्मात संचार होत । शंकर घुमू लागत । यडूर ग्रामींचा वीरभद्र । शंकरमुखे बोलतसे ॥१५॥
 
वीरभद्र म्हणे भक्तांप्रत । हे असती साक्षात दत्त । लोक कल्याण कारणार्थ । फिरती कृष्णा किनार्‍याने ॥१६॥
 
जो यांची सेवा करीत । त्यासी होई मोक्ष प्राप्त । मनोकामना पूर्ण होत । केवळ यांच्या दर्शनाने ॥१७॥
 
ऐसे वीरभद्र सांगत । लोकांसी बहु आनंद होत । सर्व सेवा करु लागत । पूर्वीपेक्षा प्रेमाने ॥१८॥
 
सदू महिंद नामे भक्त । त्यावरी कृपा बहुत । वीट भट्टीवरी काम करीत । सेवा करी स्वामींची ॥१९॥
 
स्वामी तयासी म्हणत । वीटांचा धंदा कर म्हणत । त्यासी आश्चर्य वाटत । म्हणे हे घडे कैसे हो ॥२०॥
 
ऐसे काही दिन जात । नोकरी त्याची सुटत । वीटांचा धंदा सुरु करत । स्वामी कृपे करोनिया ॥२१॥
 
ऐश्वर्य त्यासी होई प्राप्त । धंदा चाले जोरात । मग स्वामी म्हणती तयाप्रत । हॉटेल एक सुरु करी ॥२२॥
 
स्वामी शब्द सत्य । हॉटेलही त्याते मिळत । दोन्ही धंदे व्यवस्थित । सुरु झाले पाहा त्याचे ॥२३॥
 
ऐसे काही मास जात । मग स्वामी त्यासी म्हणत । सदू एक ट्र्क तुजप्रत । द्यावा मजसी वाटतसे ॥२४॥
 
सदू नेत्र विस्फारीत । म्हणे दोन धंडे व्यवस्थित । चालले असता आणिक । ट्रक कशाला घेऊ मी ॥२५॥
 
स्वामी तयाते म्हणत । देव तुजला देत असत । तू राही मनाने शांत । ट्र्क मिळेल तुजलागी ॥२६॥
 
दोन दिवसांनंतरी । एक ट्रकमालक येई घरी । सदूसी म्हणे सत्त्वरी । ट्र्क घेई माझा तू ॥२७॥
 
सदूसी स्वामी शब्द आठवत । तात्काळ होकार देत । ट्रक येवोनी दारात । उभा पाहा राहातसे ॥२८॥
 
ऐशापरी सदाशिव महिंद । स्वामीकृपे सुखी होत । मजुराचा धनवान होत । स्वामी कृपे करोनिया ॥२९॥
 
एकदा सदाशिव महिंद । श्रीस्वामींसी प्रार्थित । सहा एकर भूमि असत । परी पीक हाती येईना ॥३०॥
 
ज्वारी पिकवितो शेतात । पीकही येई बहुत । परी पाखरे खात । हाती काही येईना ॥३१॥
 
स्वामी म्हणती तयाप्रत । जरी श्रद्धा मजवरी असत । सांगेन ते कर म्हणत । सदू म्हणे करेन मी ॥३२॥
 
हाकलू नको पाखरांप्रत । जप करीत बैस तेथ । श्रीदत्त जय दत्त म्हणत । बसावे माचणावरी तू ॥३३॥
 
सदू म्हणे प्रमाण आज्ञा । सांगे घरातील सर्वांना । आज पासोनी पाखरांना । कोणी हाकलू नये ॥३४॥
 
माळ घेवोनी जाई शेतात । जप करीत बैसे तेथ । असंख्य पाखरे येत । परी न खाती काहीही ॥३५॥
 
शेजारच्या शेतात । जावोनी पाखरे दाणे खात । परी सदूच्या शेतात । एकही पाखरु येईना ॥३६॥
 
हा पाहोनी चमत्कार । म्हणती दत्त दिगंबर । सत्ता चराचरावर । चाले पाहा तयांची ॥३७॥
 
पीक त्या वर्षी बहु आले । गृही सर्व आनंदले । विपुल अन्नदान केले । सदू महिंदने त्या वर्षी ॥३८॥
 
तीन कन्या त्यासी असत । पुत्र व्हावा म्हणोनी इच्छित । परी स्वामींसी काही न सांगत । म्हणे देव जाणतसे ॥३९॥
 
एके दिनी स्वामी म्हणत । पुत्र होईल तुजप्रत । ऐकोनी बहु आनंद होत । सदाशिवासी तेधवा ॥४०॥
 
सदू मनामाजी म्हणत । स्वामी ईश्वर साक्षात । न मागताही देत । चिंता करिती भक्ताची ॥४१॥
 
औदुंबर वृक्षातळी । बैसती श्रीगुरु चंद्रमौळी । कानडी भक्त मंडळी । येती नित्य दर्शना ॥४२॥
 
कांही काळ राहोनी तेथ । स्वामी पुढे प्रयाण करीत । पुढे ऐनापूर गावा येत । तटाक यात्रा करीत ते ॥४३॥
 
अल्लमप्रभू नामे सिद्ध । कर्नाटकात होते राहात । सहस्रवर्षांपूर्वी गुप्त । श्रीशैल पर्वती झाले ते ॥४४॥
 
शिष्य त्यांचा अमोघसिद्ध । संचार त्यांचा एकात । राहे ऐनापुरात । सांगे पाहा तो लोकांना ॥४५॥
 
त्याचे अंगी संचार येत । तो सांगे लोकांप्रत । दत्त दिगंबर अवधूत । येती पाहा म्हणोनिया ॥४६॥
 
स्वामींचे आगमन होत । लोकांसी आनंद बहुत । मनोकामना पूर्ण होत । दर्शन होता दत्ताचे ॥४७॥
 
निपुत्रिकांसी पुत्र होती । दारिद्र्ये विलया जाती । सुखी होवोनी भक्ती । करिती पाहा सर्व ते ॥४८॥
 
सत्ती सौंदी गावातील । विराप्पा येई स्वामीं जवळ । म्हणे दारिद्र्ये बहु साल । कष्टलो पाहा मी स्वामी ॥४९॥
 
स्वामी सुपारी देती । याची पूजा करी म्हणती । एक वर्षांनी भेट म्हणती । जाईल दारिद्र्य ते पाहा ॥५०॥
 
सुपारी घेवोनी गावा जात । श्रद्धेने तो पूजा करत । सुपारीचे शिवलींग होत । दारिद्रय जाई निघोनिया ॥५१॥
 
ऐसा करुणेचा सागर । भक्त इच्छा पुरविणार । दत्त दिगंबर गुरुवर । भक्तांकारणे कष्टतसे ॥५२॥
 
लाखो जना भक्ती देवोन । करिती तेथोनी प्रयाण । कुरवपुरी येवोन । कांही काळ राहती ते ॥५३॥
 
कृष्णानदी प्रवाहात । कुरवपूर बेट असत । श्रीपाद श्रीवल्लभांचे असत । स्थान पाहा तेथवरी ॥५४॥
 
श्रीपाद श्रीवल्लभप्रभू दत्त । होते पाहा तेथे राहात । ते स्वस्थान म्हणोनी गुप्त । स्वामी राहिले तेथवरी ॥५५॥
 
कांही काळ राहोनी तेथ । पुढे प्रयाण करीत । ठिकठिकाणी शक्ती ठेवीत । लोकोद्धार करावया ॥५६॥
 
उमा महेश्वर स्थानात । स्वामी शक्ती ठेवीत । लाखो लोकांचा उद्धार होत । आज आहे तेथवरी ॥५७॥
 
मल्लेश्वर गावात । सूर्यनारायण भक्त । चार वर्षांची कन्या असत । सुरेखा नाम तियेचे ॥५८॥
 
स्वामी ती सवे खेळत । राहाती त्यांचे गृहात । काही दिवस राहोन तेथ । पुढे निघोनी जाती ते ॥५९॥
 
काही दिवसांनंतर । येई प्रसंग दुर्धर । सूर्यनारायण परिवार । हबकून तेव्हा जातसे ॥६०॥
 
बैलगाडीत बैसोन । सुरेखा असे प्रवास करीत । दोनशे किलोहूनी अधिक । सामान बैलगाडीत असे ॥६१॥
 
शेवफुटाणे खात । बसली  बैलगाडीत । रस्ता असे खडबडीत । वरखाली गाडी होतसे ॥६२॥
 
अचानक तिचा तोल जात । खाली पडे अकस्मात । मांडीवरुनी चाक जात । त्या भरलेल्या गाडीचे ॥६३॥
 
पाच वर्षाची सुरेखा असत । आक्रंदन करी जोरात । पाय मोडला म्हणत । स्वामी वाचवी मजला तू ॥६४॥
 
तिसी कडेवर उचलोन । आई निघे तेथोन । पाच मैल चालोन । घरी पाहा येतसे ॥६५॥
 
इकडे वर्ते अदभुत । मल्लेश्वरी तिच्या गावात । तेथोन आठ मैलावर असत । मंचालकट्टा गाव ते ॥६६॥
 
त्या गावात एक वैद्य । हाडे जोडण्यात निष्णात । त्याच्या कानात श्रीदत्त । जावोनी पाहा बोलती ते ॥६७॥
 
दत्त बोलती कानात । जा ! मल्लेश्वर गावात । सूर्यनारायण वाट पाहात । जा ! जा ! भेट त्याला तू ॥६८॥
 
तो मनामाजी म्हणत । का ? जाऊ त्या गावात । काम काहीही नसत । परी का जावे वाटतसे ॥६९॥
 
दुपार टळोनी गेली । संध्याकाळची वेळ झाली । आता जाता अवेळी । परत यावे कैसे ते ॥७०॥
 
परी कोणीतरी मजप्रत । का आहे ढकलत । चला जाऊ म्हणोनी निघत । सूर्यनारायण शर्माकडे ॥७१॥
 
जव तो चालू लागत । कोणीतरी त्यासी खेचत । ऐशापरी जणू धावत । पोचला मल्लेश्वरासी तो ॥७२॥
 
सूर्यनारायणाचे घरी येत । म्हणे शर्मा मजप्रत । काय झाले हे न कळत । कोणीतरी खेचले मजला ते ॥७३॥
 
कोणीतरी खेचत खेचत । मजला आणिले येथप्रत । काही न मला कळत । ऐसे कैसे होई ते ॥७४॥
 
सूर्यनारायण त्याते म्हणत । पत्नी गेली पेंटलावल्लीत । मम दुकानाचा माल बहुत । खरेदी करुन येईल ती ॥७५॥
 
आता इतक्यात येईल । मग चहा नाश्ता करेल । तोवरी थोडा वेळ । बसोनी येथे राही तू ॥७६॥
 
ऐसे आहे बोलत । तोवरी पत्नी येत । रडून आक्रंदन करीत । सुरेखा असे कडेवरी ॥७७॥
 
मुलीचा पाय मोडला पाहोन । मूर्च्छित होई सूर्यनारायण । वैद्ये तात्काळ पाय धरोन । पट्टया बांधल्या त्यावरी ॥७८॥
 
वैद्याच्या लक्षांत येत । म्हणे देव कृपावंत । त्याने मजला खेचत । आणले पाहा येथवरी ॥७९॥
 
असो वैद्याने पाय बांधला । सुरेखाला आराम पडला । गाढ झोप लागली तिला । स्वप्नी स्वामींसी पाहतसे ॥८०॥
 
स्वामी येती स्वप्नात । भिऊ नको तिसी म्हणत । पाय तुझा निश्चित । बरा होईल म्हणती ते ॥८१॥
 
पुढे आठ दहा दिवसात । स्वामी प्रत्यक्ष येत । पायावरुन हात फिरवीत । सुरेखाच्या तेधवा ॥८२॥
 
तैसेचि वैद्यासी भेटत । त्यासीही आशीर्वाद देत । सुरेखाच्या मातापित्यासी सांगत । चिंता नको म्हणोनिया ॥८३॥
 
काही दिवसांनंतर । पाय बरा होवोन । न राहिली काही खूण । अपघाताच्या सुरेखाची ॥८४॥
 
ऐसा सदगुरु दत्त । सदैव भक्तांसी रक्षत । तयचे महात्म्य अदभुत । कोणी कैसे वर्णावे ॥८५॥
 
या अध्यायाचे करिता पठण । आपत्ती जाती पळोन । आणि मुलांचे संगोपन । दत्त कृपेने होतसे ॥८६॥
 
श्रीदत्त विजय दिव्य ग्रंथ । देवता राहाती ग्रंथात । श्रवण पठणे श्रीदत्त । स्वप्नी येवोनी भेटतसे ॥८७॥
 
॥ अध्याय सातवा ॥ ॥ ओवी संख्या ८७॥
ALSO READ: श्रीदत्त विजय अध्याय आठवा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments