Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीदत्तलीलामृताब्धिसार - अष्‍टमलहरी

Webdunia
मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:30 IST)
श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥
असे जेथें प्रेमभक्‍ती । वसे तेथें भुक्‍तीमुक्‍ती । ऋद्धिसिद्धी दासी होती । खंती न हो ॥१॥
भजो कसाही हरीतें । त्याचें कर्म होतें रितें । देव कष्‍ट येतां त्यातें । घे तें अंगीं ॥२॥
सोमवंशी आयूराजा । पुत्रापरी पाळी प्रजा । दैवयोगें त्याला न प्रजा । जाहाली ॥३॥
त्याची पत्‍नी इंदुमती । श्री दत्ताची करी भक्‍ती । प्रेमभावें सदां चित्तीं । चिंती देवा ॥४॥
आयूराजा सह्यतटीं । श्रीदत्ताची घेयी भेटी । दत्त येवूं न दे मठीं । काठी मारी ॥५॥
देयी माये आलिंगन । वारंवार घे चुम्बन । परस्पर देती पान । नग्न दोघे ॥६॥
पाद धरुं इच्छी राजा । वारी दत्त म्हणे जा जा । अपूज्य आश्रम माझा । तूं जा शीघ्र ॥७॥
असें बोलोनी दे मार । राजा किंचित् होयी दूर । पुनः येयी घेयी मार । दररोज ॥८॥
असा जातां बहुकाळ । दत्त वदे रे कपाळ । उठवीलें तूं रे खळ । पळ आतां ॥९॥
आतां येतां ठार मारीं । भीड कोणाची न धरीं । धर्मशास्त्रा न विचारीं । चारी वेदा ॥१०॥
मदांधसा मी अकृप । माझा अनिवार कोप । मी न गणें परताप । पाप तें ही ॥११॥
मी अस्पृश्य हें नेणसी । माझा पाद कसा घेसी । राव म्हणे या उक्‍तीसी । खासी मानें ॥१२॥
जें बोलतां तें हो सत्य । मज पादाचें अगत्य । तदर्थ हें करीं कृत्य । नित्य नेमें ॥१३॥
जरीं मना इंद्रियाला । तुझा ठाव न लागला । असा निगम बोलिला । भला बोलो ॥१४॥
पाद घें भावजोरानें । बांधी प्रणयदोरानें । ठेवीं चित्तीं ह्या करानें । धरुं न दे ॥१५॥
तुमच्या ह्या रुपा भेदें । जाणे त्याला केला वेदें । नामदामें बंध तो दे । तोडूनी मी ॥१६॥
बोले हंसोनी श्रीदत्त । तूं रे जरी माझा भक्‍त । मला संस्कारुनी रक्‍त । मास देयीं ॥१७॥
ताजी नराची करटी । ती आवडे मला वाटी । ठेवीं मद्य मांसासाठीं । मोठी प्रीती ॥१८॥
भूप ऐसें परिसोनी । प्रेमें देयी प्रतिदिनीं । पशुसोम यज्ञ मानी । मनीं हर्षें ॥१९॥
ओळखूनी त्याची भक्‍ती । हर्षें दत्त वर देती । भूप मागे दृढमती । नती पूर्व ॥२०॥
गुणपूर्ण व्हावा पुत्र । जो तारी इह परत्र । दाता मान्य लोकमित्र । शत्रुहंता ॥२१॥
देव विप्र पितृभक्‍त । रणशूर धर्मसक्‍त । पित्रांसह व्हावें मुक्‍त । ज्याच्या योगें ॥२२॥
दत्त बोले घे हें फळ । पत्‍नीला दे तसें बाळ । होवो तुला भक्‍तिबळ । फळ तसें ॥२३॥
भूप वंदोनी घे फळा । वंदोनी ये तो स्वस्थळा । सर्व सांगोनी दे फळा । महिषीला ॥२४॥
तीणें फळ तें भक्षिलें । रात्रौ स्वप्‍नीं देखियले । अवधूत तिशीं बोले । धन्य हो तू ॥२५॥
म्हणोनी तो देयी मोती । दुग्धपूर्ण शंख हातीं । घेवोनीयां प्रोक्षी प्रीती । चित्तीं देयी ॥२६॥
राणी पाहे त्याचें वक्‍त्र । शिरीं दिसे सर्पछत्र । दिव्य माल्यांबर वस्त्र । चित्रकांती ॥२७॥
ऐसें पाहोनी उठली । राणी चित्तीं आनंदली । स्वप्‍न भूपातें बोलिली । पाहिलें जें ॥२८॥
प्राप्‍तःकाळी शौनकाला । भूप स्वप्‍न सांगे त्याला । म्हणे मुनी होयी तुला । पुत्ररत्‍न ॥२९॥
हुंडासुरा मारोनियां । सार्वभौम होय जया । दत्त रक्षील अपाया । निवारोनी ॥३०॥
तें ऐकोनी स्वर्गीं देव । करिताति महोत्सव । हुंडासुरकन्या तंव । स्वर्गीं गेली ॥३१॥
हिंडे ती नंदनवनीं । चारणाच्या मुखांतूनी । वार्ता ऐसी ही ऐकोनी । परतली ॥३२॥
पित्यापुढें ये धांवोनी । सांगे ऐकिलें जें कानीं । दैत्य डचकला मनीं । मानी सत्य ॥३३॥
जेव्हां आयू तपा गेला । मागें दैत्यें भूमंडळा । जिंकोनिया अमरांला । जिंकीयेलें ॥३४॥
नामें अशोकसुंदरी । बलात्कारे तिला धरी । शाप दे ती तुला मारी । आयुपुत्र ॥३५॥
तिला ठेवी तो बंदींत । जेव्हां कन्या हे सांगत । तेव्हां शाप आठवीत । दैत्य मनीं ॥३६॥
जावोनी तो त्या राणीला । पाहे म्हणे गर्भी आला । ईचे शत्रू हाचि मला । मारील कीं ॥३७॥
पोटी रिघोनी मारुं कीं । म्हणे तंव तो विलोकी । सुदर्शन फिरे झोकीं । दुःखी झाला ॥३८॥
म्हणे कोण राखी याला । नावरे हें चक्र मला । दावी कोपानें राणीला । दुष्‍ट स्वप्नें ॥३९॥
सुदर्शन दैत्य पाहे । राणीला तें ठावें नोहे । म्हणोनी ते भीती वाहे । पाहे सूर्या ॥४०॥
जय सूर्यां तेजःपुंजा । चेतवीसी तूं ह्या प्रजा । दुष्‍टस्वप्‍ना काश्यपजा । माजा वारी ॥४१॥
ऐसी सूर्या ती प्रार्थुनी । भय मनीचें सोडुनी । राहे दैत्य तें जाणूनी । मनीं धाके ॥४२॥
सोडूनी दे खाणेंपिणें । म्हणे माझें सरे जिणें । उणें केलें बल ईणें । शीणे असा ॥४३॥
असा किती काल जातां । राज्ञी प्रसूत न होतां । भूप उपाय योजिता । झाला मंत्रे ॥४४॥
देवा सप्‍तवध्रि भीता । नाथमाना सोडा आतां । गर्भा माता न शीणतां । प्रसूत हो ॥४५॥
या मंत्रानें जल देती । अर्ध रात्रीं इंदुमती । प्रसवली पुत्रज्योती । हो ती हृष्‍ट ॥४६॥
तेज बाळाचें फांकलें । दीप निस्तेज जाहले । रायें जातकर्मं केलें । धालें मन ॥४७॥
गीतवाद्यांचे गजरीं । महोत्सव होती पुरी । राजा हर्षोनी अंतरीं । करी दानें ॥४८॥
तें देखोनी हुंडदैत्य । म्हणे हाची शत्रु सत्य । याला हराया हें कृत्य । करुं आतां ॥४९॥
म्हणे महामाये देवी । माझे ठायीं कृपा ठेवी । स्वहिताचा मार्ग दावीं । भाविक मी ॥५०॥
क्लीं मोहिनी हो प्रसन्न । ठेवीं सर्वांला मोहून । माझें कार्य दे साधून । बळी देयीं ॥५१॥
स्तवी ऐसें मोहिनीसी । तेव्हां बाहेर ये दासी । दैत्य तीचे अंगी घूसी । तीशीं गेला ॥५२॥
असा दैत्य तेथें आला । त्याला कोणी न देखिला । तो प्रस्वापिनी मंत्राला । योजी तेव्हां ॥५३॥
देवि स्वप्‍नाधिकरणीं । ठेवीं सर्वां निजवूनी । प्रातःकाळीं प्रस्वापिनी । ऊठवीं तूं ॥५४॥
जरी बाळा रक्षी दत्त । तरी मंत्रा मान देत । दैत्यें सर्व होतां सुप्‍त । बाळा नेला ॥५५॥
तो नेवोनी दे भार्येला । म्हणे वधीं आतां याला । रक्‍त मांस देयी मला । मुलाचें ह्या ॥५६॥
राणी म्हणे अगई हें । कसें करुं साहस हें । ताजें बाळ प्रिया पाहे । न हें बरें ॥५७॥
दैत्य म्हणे शत्रू माझा । आणीला हा यत्‍नें तूझा । काय विचार हा माझा । प्राण घेई ॥५८॥
अर्थकाम साधाया हा । यत्‍नें आत्मा राखावा हा । नष्‍ट होतां पुढें पहा । न हा भोग ॥५९॥
ऐसें गुरुचें हें मत । मूढें कां तूं न जाणत । ऐसें ऐकोनी हातांत । पोत घे तू ॥६०॥
जय लाभ मृत्यु हाणी । त्या त्या वेळीं घडे कोणी । न वारी हें मनीं प्राणी । नाणीती हो ॥६१॥
माराया दे दासीकरी । राणी गुंते कार्यांतरीं । ती दे बाळ सूदाकरीं । मारी तो त्या ॥६२॥
सुदर्शन रक्षीतसे । शस्त्र तुटोनी जातसे । कौतुक तें पहातसें । हंसे बाळ ॥६३॥
तेव्हां दासीला ये दया । म्हणें सूदा न मारीं या । सूद म्हणे मारवी या । राया कां गे ॥६४॥
दिव्य लक्षण बाळ हा । पहातां मीं घेयीं मोहा । या मारवी दैत्य पहा । महादुष्‍ट ॥६५॥
आतां येथोनी या न्यावें । कोठें तरी लपवावें । असें म्हणोनी तें जवें । नेती बाळ ॥६६॥
पोरा वसिष्‍ठाच्या द्वारा । ठेवोनी मृगाच्या पोरा । मारोनीयां तें असूरा । मांस देती ॥६७॥
दैत्य विश्‍वासें खावोनी । आपणातें धन्य मानी । प्रातःकाळीं द्वारीं मुनी । देखे बाळा ॥६८॥
ध्यानें सर्व जाणे मुनी । दयेनें घे उचलोनी । अरुंधतीला नेवोनी । दे त्या बाळा ॥६९॥
ऋषींसह आशीर्वादा । वदे दत्ता बाळा सदा । राखें ग्रहभूतबाधा । कदां न हो ॥७०॥
शत्रू बांधील निकाम । म्हणोनी नहुष नाम । ठेवी वाढवी तो प्रेम । बाळ त्यांचें ॥७१॥
थोर होतां व्रतबंध । केला सर्वविद्याबोध । झाला नहुष तो बुध । सर्वगुणी ॥७२॥
इकडे तो प्रातःकाळ । होतां गेलें मंत्रबळ । इंदुमती पाहे बाळ । न दिसेची ॥७३॥
म्हणे कटकटा हाय । माझें बाळ झालें काय । कोणीं नेलें तान्हें माय । बहिणी हो ॥७४॥
चोरीलें म्यां काय धन । किंवा हिरोनी घे रत्‍न । त्या पापें कीं पुत्ररत्‍न । नष्‍ट झालें ॥७५॥
लाभे होतां महाकष्‍ट । पुत्ररत्‍न जें उत्कृष्‍ट । केलें कोणी तें अदृष्‍ट । कष्‍ट हे कीं ॥७६॥
श्रीदत्ताचा हा प्रसाद । तेथें केवी ये विषाद । काय आम्ही केला भेद । मंदबुध्या ॥७७॥
न झाल्याचें एक दुःख । ह्या दुःखाचा कोण लेख । करी जें दे सदा शोक । ऐक दत्ता ॥७८॥
पुरे पुरे देवा आतां । परीक्षा हे गुरुनाथा । पदीं आठवूनी गाथा । माथा ठेवी ॥७९॥
असें म्हणोनी ती दीन । भूमीवरी लोळे खिन्न । शोक करी आक्रंदोन । दोन घडी ॥८०॥
आयूराजा तें ऐकोन । आला तेथें तो धांवोन । पाहे कष्‍टी बाळावीण । दीन राणी ॥८१॥
म्हणे बाळा कोणी नेले । किंवा भूतें लपविलें । मायाजाळ पसरिलें । भले कोणी ॥८२॥
मंत्ररक्षा मी ठेविली । तो हो सर्व व्यर्थ झाली । कुलदेवी कोठें गेली । मेलीं सर्व ॥८३॥
धिक्प्राकारा धिक्‌ ह्या पुरा । धिक्‌ धिक्‌ वीरां महाशूरा । मंत्र तंत्र यंत्राकारां । सुरां धिक्‌ धिक्‌ ॥८४॥
खोटें जणूं तप फळ । मुळीं धर्मा नाहीं बळ । दान समजें निर्फळ । काळ येतां ॥८५॥
मुळीं जन्माचा मी वांझ । काय देयी देव मज । हेंची ठावें झालें आज । मज पूर्ण ॥८६॥
दत्ता त्वां हें काय केलें । मज आशेनें गोविलें । हातीं देवोनी घेतलें । दिल्हें फळ ॥८७॥
बापा हातांत देऊन । कसें घेसी हिसकून । साजे हें कीं दयाघन । दीननाथा ॥८८॥
लावोनियां कान मन । आतां ऐके हा मी दीन । बाहें तुला मतिहीन । खिन्न चित्तीं ॥८९॥
धांवें पावें गा सत्वर । किती बाहुं वारंवार । गळा टाळा फुटे धीर । धरवेना ॥९०॥
देवा खास तूं अनंत । माझा काय घेसी अंत । झालों मी हा तवांकित । चित्त दे गा ॥९१॥
पूर्वी अंगिकारोनियां । आतां देसी लोटोनियां । ऐसें न करीं सखया । दयानिधे ॥९२॥
मी धेनूसा हो व्याकूळ । वत्साविना तळमळ । करीं माझा तूं सांभाळ । बाळ दावीं ॥९३॥
असा राजा करी शोक । दत्तावांचोनी आणिक । मना नाणीं हो का दुःख । शोक तरी ॥९४॥
जगीं होती भक्‍त चार । त्यांत अर्थी आर्त दूर । जिज्ञासू हा अविदूर । ज्ञानी आत्मा ॥९५॥
राजा संतान न होतां । पुत्रार्थी शरण दत्ता । ये तो दैवें झाला आतां । आर्त भक्‍त ॥९६॥
भक्‍ति द्विगुणित झाली । श्रीदत्तासी कृपा आली । केवी करीं तो आपुली । बोली व्यर्थ ॥९७॥
न मे भक्‍तः प्रणश्यति । हीच साच जाणा उक्‍ती । भुक्‍ति देवोनी दे अंतीं । गती जो हा ॥९८॥
दत्त म्हणे नारदासी । तुवां जावें आयूपाशीं । शोकें आर्त झाला त्यासी । बोध करीं ॥९९॥
तें ऐकोनी ये नारद । वीणा वाजवी स्वानंद । राजा ऐकोनी ये नाद । खेद सोडी ॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृताब्धिसारे आयुर्वरदानाष्‍टमलहरी समाप्‍ता ।ओव्या॥८००॥

ALSO READ: श्रीदत्तलीलामृताब्धिसार - नवमलहरी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments