Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फटाक्यांची दिवाळी आता अक्षरांची

वेबदुनिया
WD
दिवाळीचे माझ्या दृष्टीने दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारातील दिवाळी फटाक्यांची, फराळाच्या पदार्थांची आहे. दुसरी दिवाळी मात्र अक्षरांची आहे. लहानपणी गावाकडे दिवाळीची धामधूम दसरा संपला की सुरू होत असे. गावभर घरे रंगवण्याचे काम चालू असे. रंगरंगोटी झाल्यावर घरात वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार होत. बहिण माहेराला येई. घर सगळं गजबजून जात असे. फटाक्याच्या दुकानावर आम्हा पोरांचा राबता सुरू होई. एक दिवस वडील फटाके घेऊन देत. अर्थात कितीही फटाके घेतले तरी कमीच पडत. फटाक्यासाठी भांडणे नको म्हणून आम्हा बहीण-भावामध्ये फटाक्याच्या वाटण्या केल्या जायच्या. मग स्वतःच्या वाटणीचे फटाके सुरक्षित ठेवून दुसर्‍याचे फटाके ढापण्याचे उद्योग सुरू होत.

WD
धनत्रयोदशीला हातात मातीचे दिवे घेऊन भल्या पहाटे गुरखी गोठ्यात येत. गोठ्यातल्या गायी-म्हशींना ओवाळत. नरकचतुर्दशीला भल्या पहाटेच्या थंडीत घरातल्या सगळ्यांना तेल माखून उटण्याने स्नान घातले जाई. थंडीत गरम पाण्याचा स्पर्श आल्हाददायक वाटे. नंतर देवदर्शन करून आल्याबरोबर शेवयाची खीर आणि चुलीवर भाजलेला पापड, असा ठरलेला बेत असायचा. अशा वेळी रेडिओवर नरकासुराच्या वधाचं कीर्तन लागलेल असे. आम्हा पोरांची फटाके उडवण्याची धांदल सुरू असे.

अशा फटाक्याच्या-फराळाच्या वातावरणात परगावी नोकरीला असलेला भाऊ न चुकता विनोदी दिवाळी अंक 'आवाज' घेऊन यायचा. त्यातली विनोदी चित्रे बघून मजा वाटायची. पुढे माझं लेखन दिवाळी अंकातून प्रकाशित होऊ लागले. जून महिन्यापासूनच आता दिवाळीची चाहूल लागते. कारण दिवाळी अंकांच्या संपादकांची पत्रे यायला सुरुवात जूनपासूनच होते. आजकाल वेगवेगळे पदार्थ वर्षभर खायला उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचे कौतुक उरले नाही.

फटाके उडवणे तर पूर्णपणे थांबले आहे. शुभेच्छापत्रांचा मात्र अजून शौक आहे. मी स्वतःसाठी शुभेच्छापत्र छापत नाही. कारण शुभेच्छापत्र द्यायची ठरवली तर हजारात छापावी लागतील. तरीही मित्रांचा, स्नेह्यांचा गोतावळा संपणार नाही. म्हणून मी भावासाठी व एका स्नेही मित्रासाठी दरवर्षी नवीन कल्पना लढवून शुभेच्छापत्र तयार करतो. माझ्या कवितांना सजवून धजवून दिवाळी अंक घेऊन येतात.

दिवाळीनंतरही अंक येणे सुरूच असते. घरात दिवाळी अंक जमायला लागतात. काय वाचू नि काय नको असे करताना बरेच चांगले वाचायचे राहूनही जाते पण दिवाळीच्या निमित्ताने खूप चांगले वाचायला मिळते. कविता वाचून कुणी तरी फोनवर किंवा पत्रातून कळवतं. एखाद्या वेळी कविता आवडल्याचा विजय तेंडुलकर, विजया राजाध्यक्ष, अमर हबीब, वसंत आबाजी डहाके, प्रशांत दळवी, सुकन्या कुलकर्णी, विश्वास पाटील, विजय पाडळकर, मधुकर धर्मापुरीकर, नरेंद्र लांजेवार, अशोक जैन, अशा ज्येष्ठांचा अचानक फोन येतो. मग तर दिवाळी रोशन होते. एकूण काय तर फटाक्यांची दिवाळी अक्षरांची कधी झाली हे मलाही कळले नाही. अंधाराला दूर सारणार्‍या दिव्यांची पूजा करण्याची कल्पनाच मला कवितेसारखी वाटते. यानिमित्ताने अक्षरांचा हा प्रपंच होतो म्हणून दिवाळी मला महत्त्वाची वाटते.


शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments