दोन ताम्रकलश (एक पूजेसाठी पाणी ठेवण्याचा आणि दुसरा लक्ष्मी पूजनासाठी पाण्याने अर्धा भरलेला), केळीचे पान, पाट, आसने, लक्ष्मीची मूर्ती, तीन तबके किंवा ताम्हण (एक कलशावर ठेवण्यासाठी, एक फुले ठेवण्यासाठी, एक आचमन कार्यासाठी), पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी मोठे ताट, भांड- पळी, समई, निरांजन, धूपारती, कापूरारती, समई, तेलवात, तूप, फुलवात, उदबत्ती, शंख, घंटा, पंचामृत, कुंकवाचा करंडा, रांगोळी, रंग, अत्तर, नैवेद्यासाठी मोठी पात्रे, दोन किलो तांदूळ, शुद्ध पाणी, गंध, अक्षता, अबीर, सिंदूर, काड्यांची पेटी, हळदी- कुंकू, धणे, गूळ-खोबरे, साखर- फुटाणे, साळीच्या लाह्या, बत्तासे, पेढे, गुलाबपाणी, विड्याची 10 पाने, 10 सुपार्या, 2 नारळ, एक उपरणे, एक खण, गणपतीसाठी कापसाची दोन वस्त्रे, दक्षिणा, सुटी नाणी, दागिने, सोने नाणे, रत्ने, चांदीची नाणी, हिशेबाच्या नवीन संवत्सरांच्या वह्या, दौत, टाक, लेखणी, तराजू, वजनेमापे, दूर्वा, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा, तोरण, पताका, दिव्यांची रोषणाई, पान- सुपारी, आंब्याचे डहाळे, निर्माल्यासाठी परडी, देवीला रात्री निद्रेसाठी एक लहान पाट.
पूजास्थान स्वच्छ करावे. आरस करुन जागा सुशोभित करावी. 'लक्ष्मी' च्या रुपात नाणी, सोन्या- चांदीचे दागिने, भांडी, पैसे यांची व्यवस्था असावी. लक्ष्मी पूजनासाठी घेतलेली नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावी त्यात वाढ करत राहावी. सरस्वती पूजनासाठी चोपड्याच्या पहिल्या पृष्ठावर स्वस्तिक आखून संवत्सर, तिथी, महिना यांचा उल्लेख करावा. ॥शुभ॥ ॥लाभ॥ लिहावे. सोबत लेखणी, आणि आपल्या व्यवसायाप्रमाणे सामान ठेवावे.
पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावे. कलशात नाणी, फुले असावी आणि त्यावर आंब्याचा टहाळा आणि त्यावर तबक असावे. तबकात तांदूळ, तांदळावर कुंकवाने स्वस्तिक, त्यावर लक्ष्मी देवीची मुर्ती तसेच तबकात एक नारळ ठेवावे. पाटाच्या बाजूस अक्षता ठेवून त्यावर गणपती प्रतीक एक सुपारी ठेवावी. कलशासमोर जमाखर्चाच्या वह्या ठेवाव्यात.
पूजा करणार्याने स्नान करून स्वच्छ आणि नवीन वस्त्र नेसावे. कपाळावर तिलक लावावा. घरातील देवांना व वडील मंडळींना नमस्कार करावा. पाटावर आसन घालून बसावे. पूजकाने डाव्या हातास पाण्याचा तांब्या, समोर ताम्हन, पळीभांडे ठेवावे. देवाजवळ समई, उदबत्ती, निरांजन लावावी. आचमन करत पूजेस प्रारंभ करावा.
आचमन प्राणायाम
दोनदा आचमन
कलशातील पाणी भांड्यात घ्यावे. पाणी एकेक पळी उजव्या तळहातावर घेत पहिल्या तीन नामांनी ते प्राशन करावे.
ॐ गोविंदाय नमः ।
म्हणताना एक पळी पाणी उजव्या हातावरून ताम्हनात सोडावे. असे दोनदा करून मग
ॐ विष्णवे नमः । ते ॐ श्रीकृष्णाय नमः ।
ही नावे हात जोडून म्हणावी.
ॐ केशवाय नमः ।
ॐ नारायणाय नमः ।
ॐ माधवाय नमः ।
ॐ गोविंदाय नमः ।
ॐ विष्णवे नमः ।
ॐ मधुसूदनाय नमः ।
ॐ त्रिविक्रमाय नमः ।
ॐ वामनाय नमः ।
ॐ श्रीधराय नमः ।
ॐ ह्रषीकेशाय नमः ।
ॐ पद्मनाभाय नमः ।
ॐ दामोदराय नमः ।
ॐ संकर्षणाय नमः ।
ॐ वासुदेवाय नमः ।
ॐ प्रद्युम्नाय नमः ।
ॐ अनिरुद्धाय नमः ।
ॐ पुरुषोत्तमाय नमः ।
ॐ अधोक्षजाय नमः ।
ॐ नारसिंहाय नमः ।
ॐ अच्युताय नमः ।
ॐ जनार्दनाय नमः ।
ॐ उपेन्द्राय नमः ।
ॐ हरये नमः ।
ॐ श्रीकृष्णाय नमः ।
प्राणायाम -
दोनदा प्राणायाम करावा. प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा, 5 सेकंद कुंभक करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा.
श्रीगणेशांगभूत ऋद्धिसिद्धींची पूजा - हळद- कुंकू सुपारीवर वाहावे-
श्रीमहागणपतये नमः । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ।
फूले वाहावीत-
श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।
उदबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करावा-
श्रीमहागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
निरांजन लावून उदबत्तीप्रमाणेच ओवाळावे. त्यावेळी घंटानाद करावा-
श्रीमहागणपतये नमः । (नैवेद्याचे नाव घ्यावे) नैवेद्यं समर्पयामि ।
सुपारीसमोर पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा इतर जे काही नैवेद्य दाखवायचा असेल तो ठेवावा. त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे- हे करताना प्राणाय स्वाहा इत्यादि स्वाहाकार दोनदा म्हणावे. प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत आहोत अशी क्रिया उजव्या हाताने करावी -
कलशाजवळच जमा- खर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे. वह्यांचे पहिले पान ज्यावर स्वस्तिक तसेच शुभ लाभ लिहिले असेल ते उघडून ठेवावे. चांदीचे लक्ष्मी छापाचे नाणे, सुवर्णादि धातूचे दागिने, लक्ष्मी व सरस्वती मूर्ती ठेवावी. मूर्ती किंवा नाणे ताम्हनात तांदळावर ठेवावे. दागिने पाटावर वस्त्र घालून त्यावर ठेवावे.
श्रीलक्ष्मीध्यान
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ॥
गंभीरावर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ॥
या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः ।
देवीची मूर्ती ताम्हनात घेउन त्यावर पंचामृतातील दूध, दही, तूप, मध व साखर हे पदार्थ एकेक, पुढीलप्रमाणे वाहावे. प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर असल्यास पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावे व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे-
पंचामृतसमायुक्तं जान्हविसलिलं शुभम् ।
गृहाण विश्वजननि स्नानार्थं भक्तवत्सले ॥
पयो दधि घृत चैव मधुशर्करया युतम् ।
पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।
या मंत्राने पुढील क्रमाने एकैकशः पंचामृत व जल अर्पण करावे-
नैवेद्य - नैवेद्य पात्रात देवीपुढे ठेवूप पात्राखाली पाण्याने लहानसा चौकोन करून वर पात्र ठेवावे. नैवेद्यावर तुळस दलाने उदक प्रोक्षण करावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्रत्येक स्वाहाकार म्हणताना देवीला उजव्या हाताने नैवेद्य भरवीत आहोत अशी कृती करावी. नैवेद्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने फिरवावे-
मंत्रपुष्पांजलि - 'ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त० पासून सभासद इति ।" पर्यंतचे मंत्र सर्वांनी यथाशक्य सुस्वर म्हणावेत व हातातील फुल एकेकाने देवीवर वाहावीत. त्यावेळी
लक्ष्मीगायत्री मंत्र म्हणावा.
लक्ष्मीगायत्री - ॐ महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।
ताम्हनात किंवा केळीच्या पानावर ठेवलेल्या चांदीच्या नाण्यांची, दागिन्यांची, नोटांची धनपति कुबेर म्हणून पूजा करावी. संपत्तीवर गंधाक्षता व फूल वाहावे. नमस्कार करावा.
पूजा झाल्यावर फटाके वाजवावेत नंतर सर्वांना प्रसाद, पानसुपारी, अत्तर, गुलाबपाणी, शीत किंवा उष्ण पेये यथाशक्ती देऊन संतुष्ट करावे. रात्री यथाशक्ती जागर करून करमणुकीचे कार्यक्रम करावेत.
रात्री निजण्यापूर्वी (सुपारीवर) गणपतीवर गंधाक्षता व फूल वाहावे -
यांतु देवगणा सर्वे पूजामादाय मामकीम् ।
इष्टकाम-प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥
अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन करावे. इतर देवतांचे, देवीचे व वह्या तराजू, इत्यादींचे विसर्जन नाही. दुसर्या दिवशी सकाळी पूजा साहित्य आवरावे. निर्माल्य मोठ्या जलाशयात टाकावे. पूजेची उपकरणी पुन्हा घरात जागी ठेवावी. मूर्ती, तसबिरी घरात होत्या तेथे ठेवाव्यात. ब्राह्मणाला तांदूळ, वस्त्र, फळे, दक्षिणा, लोकांनी अर्पण केलेले द्रव्य आदि जे योग्य ते द्यावे. धन, नाणी, दागिने आदि काळजीपूर्वक उचलून जागच्या जागी व्यवस्थित ठेवावेत.
सूचना - रात्री देवीला निद्रा घेण्यासाठी एका पाटावर रांगोळीने कमलाकृती काढावी. हळदकुंकू भरावे, मूर्ती तेथे ठेवावी व देवीने तेथे निद्रा घ्यावी अशी मनोमन प्रार्थना करावी.
केवळ श्रीमहागणपतये नमः व श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।
अशा नाममंत्रानीही हा पूजाविधी करता येतो. स्वतः पूजा करताना त्याचा उपयोग होईल.