Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळी विशेष : लक्ष्मीची पहिली प्रतिमा साकारली तरी कुणी?

Webdunia
गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:19 IST)
जय मिश्रा
दिवाळीच्या पाच दिवसांतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या फोटोची पूजा केली जाते. पण देवीचा हा फोटो पहिल्यांदा कोणी चितारला असेल?
 
धनत्रयोदशीने दिवाळीची सुरुवात झाली आहे. जगभरातले भारतीय पाच दिवसांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.
 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या ज्या चित्राची पूजा होते ते ऐतिहासिक तर आहेच शिवाय भारतीय कला जगतात या चित्राच्या समृद्ध वारशाच्या अनेक कथाही सांगितल्या जातात.
 
कला इतिहासाचे जाणकार सांगतात गेल्या शतकातील सुप्रसिद्ध कलावंत असलेले राजा रवी वर्मा यांनी देवी लक्ष्मीचं पहिलं चित्र काढलं. हिंदूंच्या अनेक देवी-देवतांची चित्र त्यांनीच सर्वप्रथम चितारल्याचं बोललं जातं.
 
बडोद्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी-विलास महालात राजा रवी वर्मा यांनी चितारलेलं लक्ष्मीचं पहिलं मूळ चित्र अजूनही आहे.
 
राजा रवी वर्मा यांनी हे चित्र 1891 साली काढल्याचं कला इतिहासाच्या जाणकार आणि बडोद्याच्या फतेसिंह संग्रहालयाच्या प्रमुख मंदा हिंगोराव सांगतात.
 
त्या म्हणतात, "लक्ष्मी आणि सरस्वती यांचं चित्र चितारणारे चित्रकार म्हणून राजा रवी वर्मा यांचं नाव फारच प्रसिद्ध झालं होतं. त्या काळी बडोदा प्रांताचे शासक असलेले महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्यासाठी ही चित्र काढण्यात आली होती. आसपासच्या चेहऱ्यांमधून प्रेरणा घेऊन राजा रवी वर्मा यांनी हिंदू देवतांची सुंदर चित्र साकारली."
 
"लक्ष्मीचं हे चित्र नंतर प्रिंट करण्यात आलं आणि अशा प्रकारे त्यांनी काढलेलं लक्ष्मीचं चित्र भारतात घराघरात पोहोचलं," असं त्या म्हणाल्या.
 
हिंगोराव सांगतात, "आधीही देवी लक्ष्मीची चित्र होती. मात्र राजा रवी वर्मा यांनी जो मानवी चेहरा या चित्रात दाखवला तसा पूर्वीच्या चित्रांमध्ये नव्हता."
 
रवी वर्मा यांनी देवी लक्ष्मीला मानवी चेहरा दिला. रवी वर्मा यांनी साडी नेसलेली लक्ष्मी चितारली.
 
दरबार हॉलमधल्या मूळ चित्रात दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत. मात्र प्रिंट केलेल्या चित्रात एकच हत्ती आहे.
 
प्राध्यापक रतन परिमू कला इतिहासाचे अभ्यासक आणि महाराज सयाजीराव विद्यापीठातील कला इतिहास विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांच्या मते चित्रात जी साडी लक्ष्मीने नेसली आहे ती मराठी नववार आहे.
 
रवी वर्मा यांना मराठी संस्कृतीची चांगली जाण होती. त्यांच्या इतर चित्रांमधूनही ते स्पष्ट दिसतं. लक्ष्मीची ही प्रतिमा फार लोकप्रिय ठरली आणि देशात घराघरात पोहोचली.
 
प्रा. परिमू म्हणतात, "रवी वर्मा त्रावणकोर प्रांतातले होते. मात्र महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यभिषेकाची चित्रं काढण्यासाठी 1882 साली त्यांना बडोद्याला आमंत्रित करण्यात आलं. बडोद्याचे दिवाण टी. माधव राव यांनी त्यांना शोधून काढलं आणि त्रावणकोरहून बडोद्याला घेऊन आले."
 
"या वास्तव्यात त्यांनी महाराज सयाजीराव यांची अनेक चित्रं काढली आणि त्यांच्याच कल्पनेतून साकारलं आहे लक्ष्मीचं हे चित्र. हे चित्र अजूनही दरबारात जपून ठेवण्यात आलं आहे," परिमू म्हणाले.
 
त्यानंतर याच चित्राच्या प्रिंट काढण्यात आल्या आणि त्या आज आपण सगळीकडे बघतो.
 
मुंबईतल्या घाटकोपर भागातल्या एका प्रिटिंग प्रेसने रवी वर्मा यांच्या अनेक चित्रांच्या प्रिंट काढल्या. 1892 साली सुरू झालेली ही प्रिंटिग प्रेस नंतर लोणावळ्याला हलवण्यात आली.
 
प्रा. परिमू सांगतात, "या प्रिंटिंग प्रेसच्या मालकाने रवी वर्मा यांच्या चित्रात थोडा बदल केला. त्यामुळे लक्ष्मीच्या प्रिंट केलेल्या फोटोत फक्त एकच हत्ती आहे."
 
प्रिंटेड फोटोला मिळाली प्रसिद्धी
इतिहासकारांच्या मते जर्मन व्यक्ती मालक असलेल्या या प्रेसने रवी वर्मा यांनी चितारलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांच्या चित्रांच्या प्रिंट काढल्या. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे या चित्रांची मोठ्या प्रमाणावर छपाई करण्यात आली.
 
रवी वर्मा यांनी काढलेलं हे चित्रं अनेक कॅलेंडर्सवर झळकलं आणि मग या चित्राने भारतातल्या अनेक घरांच्या भींतींची शोभा वाढवण्याचं काम केलं.
 
मात्र त्यानंतर या देवतांची इतरही चित्र बाजारात आली आणि त्यांनाही प्रसिद्धी मिळाली.
 
सचिन कळूस्कर यांच्याकडे राजा रवी वर्मांच्या चित्रांचा बराच मोठा संग्रह आहे. ते सांगतात, "रवी वर्मा यांची अनेक चित्र काही बदलांसह प्रिन्ट करण्यात आलेली आहेत. ती खूप लोकप्रियदेखील ठरली आहेत."
 
सचिन 2004पासून रवी वर्मा यांनी काढलेली अशी प्रिंटेड चित्र जमा करत आहेत.
 
लक्ष्मीच्या चित्राविषयी ते सांगतात, "या प्रिंटस खूपच उपयोगी होत्या आणि त्यामुळे लक्ष्मीचं चित्र लोकप्रिय होण्यासाठी मदतच झाली. हे चित्र मला माझ्या मित्राने भेट म्हणून दिलं होतं. त्यानंतरच रवी वर्मा यांच्या कार्यात मला रस निर्माण झाला."
 
"मी शोध घेऊ लागलो आणि मला कळलं की राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या चित्राची ही प्रिंट आहे. त्या चित्राच्या प्रिंटस निघाल्या नसत्या तर आज लक्ष्मीची वेगळीच प्रतिमा आपण बघितली असती," असं ते म्हणतात.
 
रवी वर्मा यांनी काढलेल्या सर्व देवींच्या आणि स्त्रियांच्या चित्रांमध्ये एक चेहरा कायम दिसतो. सचिन यांच्या मते हा चेहरा सुगंधा नावाच्या स्त्रीचा आहे.
 
ते सांगतात, "रवी वर्मा यांच्या चित्रात दिसणाऱ्या एका स्त्री चेहऱ्यावरून बराच वाद आहे. त्यांनी देवी आणि स्त्री पात्र असलेल्या इतर चित्रांमध्ये सुगंधा नावाच्या स्त्रीचा चेहरा वापरल्याचं बोललं जातं."
 
"मात्र याबद्दल कला तज्ज्ञ आणि अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. एक मात्र नक्की या देशातली माणसं देवींच्या चित्रांमध्ये जो चेहरा बघतात तो रवी वर्मा यांच्या कल्पनेतून साकारला आहे."
 
राजा रवी वर्मा आणि वाद
राजा रवी वर्मा आणि त्यांच्या आयुष्याशी अनेक वादही जोडले गेले आहेत. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात आला तेव्हा त्यावरूनही वाद झाला होता.
 
'रंगरसिया' नावाच्या या चित्रपटात राजा रवी वर्मा सुगंधा यांच्या प्रेमात होते, असं दाखवण्यात आलं होतं. सुगंधाविषयी असलेल्या प्रेमामुळेच त्यांनी आपल्या अनेक चित्रांमध्ये तिचाच चेहरा वापरल्याचं कथानकात सांगण्यात आलं होतं.
 
काही पौराणिक पात्रांच्या नग्न चित्रांवरूनही वाद झाला होता. ती चित्रदेखील राजा रवी वर्मा यांनीच काढल्याचं बोललं जातं. त्यातली काही पात्र धार्मिक होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
 
ही घटनाही रंगरसिया चित्रपटात दाखवण्यात आली होती. धार्मिक पात्र चितारण्याच्या राजा रवी वर्मा यांच्या कौशल्यामुळेच त्यांची कला आज सामान्य माणसापर्यंत पोहोचली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

अष्टविंशतिविष्णुनामस्तोत्रम्

आरती मंगळवारची

मंगळवारचे उपास कधी पासून सुरु करावे जाणून घ्या

गोविन्ददामोदरस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments