Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘स्पेस’- आपल्यातली आणि त्यांच्यातली

- मेघना ढोके

Webdunia
गुवाहाटीत पाय ठेवला. मोबाईलचं नेटवर्क गायब! तसं हे नेहमीचच. मागच्यावेळेस गेले तेव्हाही असंच झालं होतं. त्यामुळे फार काही चिडचिड झाली नाही. मात्र ऐनवेळेस मोबाईल `डे ड` होऊन पडला आणि आता जगात कुणाशीच आपला संपर्क नाही, आपण लांब फेकले गेलोय ही अस्वस्थता पचवणं महाअवघड. ते तुटलेपण पचवायला तसा वेळ लागलाच. नंतर मात्र एसटीडी शोधत वार्या करणं एवढीच काय ती कटकट उरली. घरी फोन करण्याच्या गरजेपोटी आणि पुढच्या भेटीगाठींच्या वेळा ठरवण्यासाठीही एसटीडीच्या पायऱ्या झिजवण्याशिवाय दुसरा पर्याय काय होता? वेळ मिळाला की एसटीडी गाठणं सुरू.

माझी ही तगमग पाहून दीपाली मात्र वैतागली. शिणलीच. त्या दोन दिवसांत आम्ही गुवाहाटीतले किती रस्ते तुडवले आणि किती 'फुसके' खाल्ले याचा हिशेब नाही. 'फुसके' खाणं, झालमुरीचे बकाणे भरत चालणं आणि गप्पा मारणं; तोंडाला आराम नाहीच. (फुसके म्हणजे पाणीपुरी आणि झालमुरी म्हणजे भेळ. गुवाहाटीतल्या रस्त्यावर झालमुरीच्या गाडा लागलेल्या असतात. पण दोन प्रकारच्या. एक नेहमीची भेळ आणि दुसरी कडधान्याची. दोन्ही झालमुरीच. त्या चवीला तोड नाही.)

  फोनबिन नाही, काही संपर्कच नाही. म्हणजे काहीतरी गडबड, वाईटसाईट-भलतसलतंच झालं असणार असा आपल्याकडचा साधा हिशेब. गणितं तिचं. सोडवण्याच्या रीती तेवढा वेगळ्या. दिपालीनं तिचं गणित असंच सोडवलं होतं.       
असंच भटकतांना एकदा काही केल्या फोन लागेना. अस्वस्थता कुरतडायला लागलेली. डोक्यात कलकलाट. त्यात दिपालीनं मला थेटच विचारलं, 'आप पंधरा दिन घरवालोंसे बात किए बिना नही रह सकती, आज तीन महिने हो गए मैने घर फोन नहीं किया..तो क्या फर्क पडा? फोन नही, मतलब मै ठीक हूँ ! सिधा हिसाब' पण हा हिसाब मला कुठं येत होता? आणि इकडं काळजीनं व्याकुळ होणाऱ्या माझ्या माणसांना तरी हे समीकरण कुठं माहित होतं. फोनबिन नाही, काही संपर्कच नाही. म्हणजे काहीतरी गडबड, वाईटसाईट-भलतसलतंच झालं असणार असा आपल्याकडचा साधा हिशेब. गणितं तिचं. सोडवण्याच्या रीती तेवढा वेगळ्या. दिपालीनं तिचं गणित असंच सोडवलं होतं.

दिपाली उपाध्याय. राष्ट्र सेविका समितीच्या गुवाहाटी कार्यालयात मला भेटली. तेजपुरला राहणारी ही मुलगी. कामासाठी गुवाहाटीत आली होती. तिशीच्या उंबरठ्यावरची. रुढार्थानं लग्राचं वय उलटलेलंच. ‘बीए’पर्यंत शिकलेली. तिचं गाव तेजपुरपासून पन्नास किलोमीटरवरचं लहान खेडं. कॉलेजात जायचं म्हणून हट्टानं गाव सोडून दहावीनंतर तेजपुरला आली. पदवीधर झाली. त्याच दरम्यान वडील हृदयविकारानं अचानक गेले. एक धाकटा भाऊ. तो हाफलाँगला इंजिनियरिग करत होता, धाकटी बहीण शाळेत जाणारी. घराची जबाबदारी हिच्यावर येऊन पडणं स्वाभाविक होतं. ती तिनं पेललीही. वर्षभर. शेतीतून भाताचं उत्पन्न सुरू झालं. हळूहळू गोष्टी रांगेला लागल्या. आणि दिपालीनं घर सोडलं.

दिपाली सांगते, 'आईला वाटायचं मी घराची जबाबदारी सांभाळावी. भावाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी किमान घर सांभाळावं. तेही नकोच असेल तर लग्र तरी करावं. त्यात काही वावगंही नव्हतं. जबाबदारी म्हणून मी हे सारं करायलाच हवं होतं. माझ्याशिवाय घराचं, आईचं- भावाबहिणीचं कसं होईल असा प्रश्न पडायचा. पण मग माझं काय? मला स्वतःला समाजसेवेत झोकून द्यायचं होतं. आपण चार भिंतीत बांधून पडलोय या विचारानं जीव तुटायचा. कधी वाटायचं, मला माझ्याच माणसांची काळजी वाटत नसेल, मी त्यांचंच भलं करणार नसेल तर समाजसेवा काय डोंबलाची करणार? काय त्यागाच्या बाता मारणार? वर्षभरात मी बर्याच गोष्टी लायनीला लावल्या आणि घराबाहेर पडले. आईला सांगितलं आता मी नसले तरी तुमचं काही अडणार नाही; अडलंच तर मी परत येईन. पण आता मी जाणार. घर सोडून तेजपुरला परत आले.

आज या सार्‍याला तीन वर्षे झाली. अजून तरी माझ्याशिवाय त्यांचं काही अडलं नाही. ते खुष आहेत, मी मजेत!' दिपालीला म्हटलं अवघड होता तुझा निर्णय. खूप इमोशनलही. भांडण झालं असेल स्वतःशी. तरी घर सोडलंस ते कसं?' ..अगर तब नहीं निकलती तो फिर कभी नही निकलती! चार दिन सब रोए, अब सब ठीक है! साथ रहना मतलब साथ देना नही होता ना? अभी भी मै घरवालोंके साथ हुँ, लेकीन मै उनका सहारा नही! वो मेरे साथ है, लेकीन मुझे बाँधते नही!' हा दिपालीचा साधा हिशेब.

नेपाळी वंशाची ही आसामी तरुणी. आसामात कायम 'नेपाली' म्हणून उपरेपणानं त्यांच्याकडं पाहिलं जातं त्या समाजातली. उपेक्षितच. पण तिनं तिची सारीच अवघड गणितं स्वतःसाठी सोपी करून घेतली आहेत. या सार्‍यावरही तिचं एक साधं म्हणणं, 'पिछले डोर नहीं तुटे, तो ना हम आगे के रहते है, ना पिछे के! जुडना और बंधना अलग होता है ना?' आता ही मुलगी तिचं 'आगे'चं मनासारखं आयुष्य जगतेय.

मनावर कसलंही ओझं नाही, की जबाबदारी नाही. अपराधीपणाची भावना नाही. ज्यांची जबाबदारी घ्यावी ती तिची माणसं आता स्वतःची जबाबदारी उचलण्याइतकी सक्षम झाली आहेत. ना कुणी तिच्यामागे लग्राची भुणभूण करतं. ना घरी ये असा धोशा लावतं, ना तिच्या फोनची वाट पाहतं. अजुनही कधीतरी आईच्या हातच्या कच्च्या केळाच्या भाजीच्या आठवणीनं हिच्या डोळ्यात पाणी येतं. पण आपण आता जे जगतोय ते आपलं आयुष्य, 'जुडना'-बंधना नही, हा तिचा साधा हिशेब!' म्हणूनच तिला प्रश्न पडला असावा, की मी जर इतक्या लांब स्वतःहून आलेय तर मग या जगात रमण्याऐवजी जिकडून आलेय तिकडचा संपर्क तुटला म्हणून एवढी हैराण का होतेय? का पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतेय?

  आपण श्वास जितक्या सहजतेनं, जन्मतः घ्यायला लागतो तशी ही माणसं जन्मतःच स्वतंत्र असतात. कोणी कुणाला बांधून घालत नाही. सारी सुटी -सुटी, तरी एकमेकांशी प्रेमानं घट्ट जोडलेली. ज्या 'स्पेस'चे आग्रह सध्या आपल्याकडे चर्चेत आहेत, ती 'स्पेस' माणसांना असतेच.      
काळजी वाटण्याचा बहाणा तिच्यासमोर तकलादूच ठरला असता. 'संपर्क तुटल्या'चा ( आणि तोडण्याचाही) फायदा तिला नीट माहित होता, तिच्यासमोर कसं काळजीचं घोडं दामटायचं? दिपालीच्या निमित्तानं लागला असेल पण त्या सार्‍या प्रवासात एक नाद लागला. नॉर्थ ईस्टातल्या 'स्वतंत्र' माणसांकडे बघायचा. त्या स्वतंत्रपणाला वयाचं बंधन नव्हतं. आपण श्वास जितक्या सहजतेनं, जन्मतः घ्यायला लागतो तशी ही
माणसं जन्मतःच स्वतंत्र असतात. कोणी कुणाला बांधून घालत नाही. सारी सुटी -सुटी, तरी एकमेकांशी प्रेमानं घट्ट जोडलेली. ज्या 'स्पेस'चे आग्रह सध्या आपल्याकडे चर्चेत आहेत, ती 'स्पेस' माणसांना असतेच, तिची वेगळी आधुनिक चर्चा करायची वेळच का यावी, असा मुलभूत प्रश्न त्यांच्याकडं पाहिलं की आपसूक पुढं येतोच. कितीही टाळायचं म्हटलं तरी मनात अशी तुलना अकारण सुरू होते. या प्रवासात ती तुलना टाळण्याचा धडाही जाता जाता शिकावाच लागत होता.

मेरा लडका गडबड है!
ईटानगरातली अशीच एक निवांत दुपार होती. मला तवांगला भेटलेल्या मार्कपने त्याच्या एका ईटानगरातल्या मैत्रिणीचा पत्ता दिला होता. जमलंच तर जाऊन भेट असा आग्रहही केला होता. मी तिला भेटायला गेले. तर ती तिनसुखियाला गेली होती. तिचा भाऊ गुवाहाटीला. घरी फक्त तिचे आईवडील होते. गप्पा सुरू झाल्या. तेवढात तिच्या भावाचा फोन आला. वडील तुटकतुटक दोनतीन वाक्य बोलले. ठेवून दिला फोन. समोरच बसलेल्या आईकडे अशा नजरेनं पाहिलं की बराचवेळ त्या बाईंनी नजर वर उचलली नाही.

बदलत चाललेल्या अरुणाचलविषयी बोलणं सुरू होतं. शिक्षण-विकास अशी चर्चा. तसे ते गृहस्थ भडकलेच. म्हणाले, 'मी शिकलो. नोकरीला लागलो. माझ्या बस्तीतल्याच नाही तर आजुबाजूच्या दहा बस्तीत कुणी तेव्हा दहावी पास नव्हता. किती किलोमिटर चाललो, किती जंगलं तुडवली, विचारू नका. कोण बरंवाईट सांगणारं होतं? माझं मीच लग्र ठरवलं. बायको केली, घरी नेली. मुलंबाळं झाली. आता माझा मुलगा माझ्यापेक्षा कितीतरीपट जास्त शिकला, तो म्हणेल तेवढा पैसा मी त्याला दिला. पण तोसारखा मला विचारतो, हे करू का ते करू? या कॉलेजात जाऊ का त्या जाऊ? मला नाही तर आईला विचारतो, नाहीतर बहिणीला विचारतो. मित्रांना विचारतो. त्याचं काहीच नक्की नाही. पप्पा-पप्पा करके मेरी सलाह लेता है, ये बराबर नही, मेरा लडका गडबड है!' हे ऐकून गम्मत वाटली. पण का नाही त्या वडिलांनी चिडू? आपला मुलगा स्वतंत्र नाही, स्वतःचे निर्णय स्वतःच न घेता सतत आईवडिलांना विचारतो. हे त्या वडिलांच्या आकलनापलिकडचं होतं.

निसर्गाचा नियम, पिल्लू मोठं झालं की सुटं होतं. आपलं मुल कुठं फिरतंय याची चिंता आईवडील करत नाही. त्याच्या लहानसहान गोष्टीत नाक खुपसत नाही. तरुण मुल-मुली दिवसभर नाहीच आले घरी तरी चिंता नाही. येतील. आल्यावर प्रश्नांची सरबत्ती नाही. कुठे? का? गेला होतास? प्रश्न नाही. तरुण मुलगा नाही आला एक-दोन दिवस घरी तरी कुणी फार काळजी करत नाही. जबाबदार आहे तो, कामासाठी गेला असेल येईल काम संपलं की; इतकं सोपं सगळं. मुलींसाठीही ही स्थिती फार वेगळी नाही. सगळं भरवशावर चालतं, अविश्वासाची टांगती तलवार मानेवर धरल्यासारखे लोक जगत नाहीत.

  ओमेन म्हणाला, 'उलटापुलटा आरसा पाहिलाय का कधी? शहरी समाजातल्या आरशात ज्यासाठी झगडा चाललाय ना ते आमच्याकडं आहे, आणि जे तुमच्याकडं आहे, ज्यातून तुम्हाला सुटायचंय त्यासाठी आम्ही झगडतोय!'      
बस्तीतली ( बस्ती म्हणजे पहाडावर वसलेली छोटी वस्ती. शहरापासून दुर आणि दुर्गमही) एक रीत म्हणूनच अजुनही अनेक घरांत चालू असलेली दिसते. तीन-चार दिवस कुठं बाहेर जाणार असेल तर घरातल्या वडिलधार्‍याला जातोय असं सांगायचं. ( जाऊ का? -अशी परवानगी मागायची नाही!) घरी कोणीच नसेल आणि तातडीनं जावं लागलं तर घरातल्या मोठा खांबाला सांगायचं. 'बाबा रे जातो, येईल लवकर. तोवर घराची-माणसांची काळजी घे!' आणि सांगायचं म्हणजे असं शब्दशः सांगायचं, प्रार्थना म्हणून. बाकी काही नाही. विश्वास ठेवायच्या घरच्या वडिलधार्‍यांवर, ते नसतील तर घरातल्या खांबावर. आपण सांगितलंय ना तर तो घेईल सगळ्यांची काळजी. आपण आपल्या कामाची चिंता करायची मागची नाही, ही त्यापाठची श्रद्धा. असं पाहत पाहत, तरुण होता होता मुलं अशी स्वतंत्र होतात. आणि जबाबदारही.

तवांगला भेटलेल्या मार्कपचंच उदाहरण घ्या. तो गुवाहाटीत शिकतो. ईटानगरात त्याची एक लग्र झालेली बहिण असते तिचा क्रॉकरीचा बिझनेस. हा सुट्टीत तवांगहून भुतानी लोकांकडून क्रॉकरी विकत घेतो. बहिणीला नेऊन देतो त्यातून थोडं कमिशन घेतो. गुवाहाटीत विमा एजंट म्हणून फिरतो. त्याची दुसरी एक बहिण तवांगला नोकरी करते. तिला वाटलं की करील लग्र, हे त्याचं मत. मोठा भाऊ दिल्लीत ड्रेस डिझायनर. आणि त्याचे आईवडील. ते गावी असतात. अरुणाचलात दुर अलाँगजवळच्या खेड्यात. आजवर त्यांनी इटानगर पाहिलं नाही की गुवाहाटी.

मुलं आपापल्या वाटांनी उडून गेली पण आईवडिलांना त्या वाटा आहेत हेच माहित नाही. अशा समाजात एखाद्या मुलाला जर वडिलांनी आपला मार्गदर्शक व्हावं असं वाटत असेल, तो सतत स्वतःच्या आयुष्याविषयी वडिलांशी बोलत असेल तर त्या वडिलांना त्याची धास्तीच वाटते. आपला मुलगा स्वतंत्र- कमक्या नाही अशी. बदललेल्या काळात मुलाला आपली गरज आहे ही वडिलांच्या आकलनापलिकडची गोष्ट आहे आणि गुवाहाटीतले शहरी वडिल मुलांच्या आयुष्यात कसे डोकावतात हे पाहणार्‍या त्या मुलाला वडिलांचा हा तटस्थपणा जीवघेणा वाटत असणार, हे उघड! घरोघर आता या अशा जनरेशन गॅप्स बर्‍याच दिसायला लागल्या आहेत. त्या 'गॅप्स' नाहीत बदलत्या काळामुळं पडलेल्या तडा आहेत. आणि त्या तडा जगण्यावर-नात्यावर पडल्या की मनांवर ओरखडे पडणार हे उघडच!

ओमेन क्री नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण. अरुणाचली. अनेक वर्ष मुंबईत होता आणि आता गुवाहाटीत स्वतःचा बिझनेस करतोय. त्याचं या गॅप्सविषयी काही निरिक्षण आहे. तो त्याच चक्कीत भरडून इथवर आलाय. ओमेन म्हणाला, 'उलटापुलटा आरसा पाहिलाय का कधी? शहरी समाजातल्या आरशात ज्यासाठी झगडा चाललाय ना ते आमच्याकडं आहे, आणि जे तुमच्याकडं आहे, ज्यातून तुम्हाला सुटायचंय त्यासाठी आम्ही झगडतोय!' यातून वेगळ्याच झगडात मुलं आणि पालक आता फसायला लागली आहेत. मुलांनी काय कपडे घालावेत? काय शिकावं?त्यासाठी कुठून पैसे आणायचे? काय काम करावं? याची पालकांना खंत नाही, असली तरी मुलं मोठी झाली आता त्यांचे प्रश्न आपली जबाबदारी नाही असं पालकांना वाटतं.

त्यात स्वतःची जबाबदारी झटकण्याची भावना नसते तर मुलं मोठं- स्वतंत्र आहे, त्याचं आयुष्य तो जगेल ही पिढ्यानपिढ्या अंगात मुरलेली रीतच. मुलांनी प्रेमात पडावं, वेळेत शरीरसंबंधाची सोय करावी, पोरंबाळ जन्माला घालावीत. भले ती पोरं आपल्याला सांभाळायला लागली तरी चालतील पण एखादं पोरं मुलीला-मुलाला वेळेवारी झालेलं बरं, ही त्यांची भावना. त्यासाठी लग्र केलंच पाहिजे अशी सक्तीही कोणी अरुणाचलातल्या अनेक जमातींत करत नाही.

मुलं मात्र आता काळाच्या या टप्प्यावर गळ्याच प्रश्नांपाशी अडली आहेत. त्यांच्याकडे शिक्षणाच्या धड सोयी नाहीत. हातात पैसा नाही. शहरांत नोकरीचा प्रश्न. आयडेटिंटीचे प्रश्न. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष. स्पर्धेत टिकण्यासाठी नव्हे तर शिरण्यासाठीही करावा लागणारा झगडा त्यांच्यासमोर आहे. त्यात शहराचे लागलेले वेध. बदलती आधुनिक लाईफस्टाईल हवीशी वाटते. हे सगळं पालकांना समजत नाही. मुलांना धड सांगता येत नाही. त्यातून घरोघर भांडणं होताहेत. किंवा संवाद तुटून अबोले धरले जात आहेत. आपण हिमतीनं जगणारी -स्वतंत्र माणसं. मग आपली शिकलर सवरली मुलं अशी एकदम बिनकण्याची सैरभैर का वागायला लागली हा पालकांचा संताप. आणि पालकांनी आपल्याला वार्‍यावर सोडलंय ही मुलांची भावना. त्यांच्या आजच्या सार्वत्रिक उपेक्षेच्या भावनेला घरचं हे नवं तुटलेपण मग अधिक एकारलं करत.

  मला सतत वाटायचं माझ्या वडिलांनी- काकांनी-मामानी विचारावं. त्यावर अधिकार गाजवावा प्रसंगी. पण ते केवळ ऐकून घेत. तुझं तू ठरव असं म्हणत. बरेचदा एकाकी वाटायचं. मी मुंबईत गेलो तर तिथली मुलं 'स्पेस' साठी भांडत होती. आणि मला माझी स्पेस नकोशी.      
ओमेन क्री सांगतो, ' हे सारं मी अनुभवलंय. मला सतत वाटायचं माझ्या वडिलांनी- काकांनी-मामानी विचारावं माझ्या आयुष्याविषयी. त्यावर अधिकार गाजवावा प्रसंगी. पण ते केवळ ऐकून घेत. तुझं तू ठरव असं म्हणत. बरेचदा एकाकी वाटायचं. मी मुंबईत गेलो तर तिथली मुलं 'स्पेस' साठी भांडत होती. आणि मला माझी स्पेस नकोशी.' सामाजिक जडणघडण असे शब्द वापरून समाजशास्त्रीय अभ्यास केला तर कदाचित घरोघरचे हे प्रश्न क्षुल्लक वाटतील. पण अडकित्यात अडकल्यासारखी ही माणसं अनेक बाजुनं पिसली जात आहेत. आणि पिसणार्‍या प्रत्येकाचं आयुष्य पिळवटून निघतंय!

बस्तीचे शिलेदार..पन्नास माणसांचं कुटूंब! घराबाहेर पंख पसरवून पडणारी ही मुलं मग नव्या संधी शोधतांना आधार शोधतात. त्यांच्यापेक्षा मोठा, जवळपासच्या बस्तीतला, शिकला-सवरला कुणी इटानगर-गुवाहाटी-कोलकाता- दिल्ली अशा शहरांत आहे का हे शोधून काढतात. आडभिंतीच्या पलिकडं काहीच संबंध नसतांना थेट त्या माणसापाशी जाऊन धडकतात. आणि पहिल्यांदा शाळेचं तोंड पाहिलेली, बस्तीपलिकडं या मोठ्या शहरांत येऊन ज्यांनी थोडाबहुत जम बसवला आहे अशी ती 'मोठी' माणसं बस्तीबाहेर पडणार्‍या या मुलांना आधाराचा हात देतात. आपल्या कुटूंबातच सामावून घेतात.

अरुणाचलातल्या या मोठ्या कुटूंबाची गोष्ट उलगडली तेव्हा वेगळीच ओळख झाली अरुणाचली माणसाच्या जगण्याची. इटानगरमधल्या नॉर्थ ईस्टन रिजनल इन्सिटूट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्राध्यापक असलेले प्रदीप लिंगफा. त्यांच्या बस्तीतलेच नाही तर आजुबाजूच्या पाचपन्नास बस्तीत कुणी मुलगा इंजिनियर झालेला नाही. बंगळूर- केरळ-मुंबई -दिल्लीत राहून, अमेरिकेत जाऊन जग पाहून आलेले प्रो. लिंगफा. पण इटानगरात राहून अरुणाचलातल्याच ऊर्जाप्रश्नात काही काम करावं असा निर्धार करून ते परतले. आता त्यांचं छोटा विद्युतनिर्मिती तंत्राचं संशोधन सुरू आहे.

त्यांच्या घरी संध्याकाळी गप्पा मारता मारता बराच उशीर झाला. निघता निघता त्यांनीं हौशीनं बांधलेलं घर दाखवलं. घरात बरीच लगबग दिसत होती. घरात समारंभाला पाहुणे जमावेत तसे खोल्यांमध्ये माणसं होती. पाहुणेरावळे आलेले असताना त्यांचा एवढा वेळ घेतला म्हणून दिलगीरी व्यक्त केली तर ते हसले. म्हणाले, 'पाहुणे कसले? ही माझ्या घरातलीच माणसं आहेत.' अंदाजे पन्नास माणसं तरी असतील घरभरातल्या त्या खोल्यांत.

लिंगफाचं तर त्रिकोणी कुटूंब, ते-बायको आणि मुलगी. मग हा एवढा मोठा परिवार? प्रो. लिंगफा ज्या बस्तीतून आले. त्या बस्तीतली, आजुबाजूच्या बस्तीतली. नात्याची, नात्यातल्या नात्यातली जी म्हणून माणसं इटानगरात येतात. यांच्याच घरी राहतात. कुणी शिकायला आलेलं असतं. तर कुणी आजारपणाच्या औषधोपचारासाठी, कुणी सहज फिरायला, तर कुणी नोकरी शोधायला. या माणसांची हक्काची जागा म्हणजे लिंगफांचं घर. निवारा आणि भोजनाची सोयही हक्काची. अमक्या-तमक्याचा संदर्भ सांगत येणार्‍यालाही त्यांच्या छताखाली आसरा नक्की मिळतो. हे असं का? लिंगफा सांगतात.

' माझ्यासारखी माणसं ही आज बस्तीचा एकमेव आधार आहे. माझ्या कुटूंबाकडं पैसे नव्हते तर बस्तीतल्या माणसांनी वर्गणी काढून माझ्या शिक्षणाला पैसे दिले. माझ्यासारखी अनेक माणसं आपापल्या बस्तीच्या पाठबळावर इथवर पोहोचली. बस्तीतला एक मुलगा एवढा मोठा झाला याचं बस्तीला कौतुक. बाकीची मुलंही आदर्श म्हणून माझ्यासारख्यांकडं पाहतात. त्यांना शिकायची, झगडायची एक वाट आम्ही दाखवलीय. पण आता त्यांना पुढं जायला आधार हवा. साथ हवी. ती देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. कारण आम्ही बस्तीपासून तोडून 'शहरी' झालो तर मग बस्तीतून पुढं येणार्यांना मदत कोण करणार? पोटच्या पोराच्या आधी बस्तीतल्या हुशार मुलांचा विचार लोक करतात. आपल्या बस्तीतून एक तरी इंजिनियर व्हावा म्हणून लोक पदराला खार लावतात. मग या सार्यांना आपल्या माणसाची सोय नको करायला?'

  देशाच्या मुख्य प्रवाहापासून अलगथलग पडलेल्या या भागात गरीबीपासून दहशतवादापर्यंत आणि फुटीरतेच्या मागणीपासून विकासापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. पण घरात शिरलेल्या प्रश्नांच्या या वादळांनी मात्र माणसांचं जगणं कित्येकपट अस्वस्थ करुन सोडलं आहे.      
लिंगफाच्या घराचं ते दर्शन झालं आणि मग मी शिकल्यासवरल्या ज्या ज्या माणसांच्या घरी गेले. घराचं असं गोकुळ हमखास दिसलं. सगळ्यांचीच घरं मोठी नसतात. पण आपली अडचण कोणी सांगत नाही. एक मोठं भाताचं आणि एक कालवणाचं पातेलं रटरटत शिजतं. ज्याला वेळ असेल तो शिजवतो, कामाची वाटणी करायचीसुद्धा वेळ येत नाही. शिकली-सवरली माणसं स्वतःहून अशी जबाबदारी उचलतात. कम्युनिटी लिव्हिगचं बदलत्या काळातलं हे वेगळं रुपच. आपल्या माणसांशी 'स्वतःला' असं जोडून ठेवण्यामागे आणखीही एक भावना असते. एखादा कुणी बस्तीतला नाराज झाला किंवा चुकून कधी दाखवलीच जबाबदारीला पाठ तर बस्तीची दारं कायमची बंद होतात. म्हणजे आपल्या माणसांपासून कायमची फारकत. बस्तीपासून तुटण्याच्या शिक्षेचा विचारसुद्धा माणसांच्या जीवाची घालमेल वाढवतो इतकं

कम्युनिटी लिव्हिग रक्तात मुरलेलं असतं. शहरी अरुणाचली घरांचा आकार म्हणूनच दिवसेंदिवत वाढत जातांना दिसतो. एवढा माणसांचं घर चालवायचं म्हणजे त्यासाठीचा पैसा कसा उभारायचा याची चिंता अनेकांच्या जगण्याला वेगळे फाटे फोडते, ते वेगळेच! अनेक घरात पुढच्या दारानं येणार्या पैशापेक्षा मागच्या दारानं येणार्या पैशाचं प्रमाण वाढतं. त्यातून पैशाच्या व्यवहारांचे जे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत ते वेगळेच!

आधुनिक कोण? आणि कोण मागास? बस्तीतले मुलं-मुली. अनवाणी पायानं जंगलं तुडवत, उपाशी राहत, कधी निवासी शाळांत वर्षानुवर्षे शिकून शहरांत येतात. पुढच्या शिक्षणाला नाहीतर नोकरीसाठी. गुवाहाटीत आलं की जग बदलतं. कलकत्ता- दिल्ली-मुंबई- बंगरुळ-हैद्राबाद नावाच्या शहरांतलं तर जगच वेगळं. उच्च् शिक्षणासाठी दरवर्षी हजारो नॉर्थ ईस्टर्न तरुण या शहरांत येतात. दक्षिण भारतातल्या हायटेक शहरांत जाण्याचं प्रमाण सर्वाधिक. सहज ताळा केला तर दिसेल गुवाहाटीहून उत्तरेला जाणाऱ्या गाडांपेक्षा दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचं एकूण प्रमाण नक्की जास्त आहे.

जाणाऱ्यांचं प्रमाण जास्त तसं परतून येणाऱ्यांचं प्रमाणही मोठं. आपल्या शहरांत काम करायचं, आपल्या भागाचा विकास करायचा हे स्पिरीट या मुलामुलींमध्ये कमालीचं तीव्र आहे. परतून येणार्या मुलामुलींसमोर परत आल्यावर शिक्षणाला साजेसाच रोजगार मिळवण्याचा प्रश्न नसतो. तर नव्या जगाचं वारं लागलेल्या या मुलांसमोर आता आणखी काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. इटानगरात उणीपुरी चार वृत्तपत्रं. सगळ्यात जुन्याचं वय १० वर्षे सुद्धा नाही. मी इटानगरात होते त्या दरम्यान या वर्तमानपत्रांत तापलेल्या चर्चां प्रसिद्ध होत होत्या. बायकांनी मंगळसुत्रं घालावं का? लग्र कधी करावं? कोणत्या पद्धतीनं करावं? इत्यादी.

नव्या-जुन्या विचारांच्या माणसांची एक नवीच धुमश्चक्री सुरू झाली आहे. जुनी-जाणती काही जमातीतली माणसं म्हणतात. की काळ बदलला. महिलांसाठी पुर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही. आदिवासी नसलेल्या बाहेरच्या माणसांचं आपल्यात येणंजाणं वाढलं. त्या माणसांच्या चालीरीती वेगळ्या. त्यामुळे बायकांनी लग्र झालेलं असल्याची काही चिन्ह वापरणं सामाजिक सुरक्षेसाठी गरजेचं ठरेल. मुळात प्रश्न हा की ज्या जमातीत लग्र करणंच बंधनकारक नाही, त्या जमातीतली २५ वर्षे एकत्र राहिलेली काही जोडपीही आता विवाह करायला लागली आहेत.

बाहेरुन शिकून आलेल्या मुलामुलींचं म्हणणं यासंदर्भात वेगळं आहे. त्यांना स्वतःवर ही बंधनं लादून घेणंच मान्य नाही. ज्या गोष्टी आपल्या रितीतच नाहीत त्या आधुनिक म्हणून का स्वीकारायच्या हा त्यांचा प्रश्न. म्हणजे दिल्ली-मुंबईत राहून आलेल्या मुली म्हणतात, 'आधुनिक शहरी नागरी समाजातील मुलींनी कधीच सौभाग्यलंकार वापरणं सोडलं. बंधनं म्हणून स्त्रीमुक्तीवाल्या विचारांनी बाईच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी संघर्ष केला. तिच्या निवडीचं स्वातंत्र्य मागितलं. आणि आता आपण ती बंधन का स्वीकारायची?

आपल्या व्यवस्थेत तर बाईनं केलेली निवड स्वीकारणं पुरूषावर बंधनकारक आहे. लग्राचंही तेच. शहरी मुलं लग्र टाळून लिव्ह-इन - रिलेशनशिपचा पुरस्कार करताना दिसतात. आणि एकमेकांच्या प्रेमापोटी -विश्वासानं ज्या समाजात स्त्रीपुरूष कुठल्याही बंधनाशिवाय एकत्र राहतात. त्याला आता सामाजिक मान्यता नावाची लग्राची मोहोर कशाला हवी? नैतिक-अनैतिकतेचे ही नवी परिमाणं कशाला? जगण्यात या बोचर्या प्रश्नांनी आरपार छेद द्यायला सुरूवात केली आहे.

शिक्षण -विकासरोजगार- दुरसंचार या पायाभूत गोष्टी हव्यात म्हणून सामाजिक संघर्ष एकीकडे पेटला आहे. आणि ज्या काही चिमुटभर प्रमाणात या गोष्टी घरांत पोहचल्या त्यांनी त्या घरात नवीन प्रश्न निर्माण केले आहेत. नवी वादळं निर्माण होत आहेत. देशाच्या मुख्य प्रवाहापासून अलगथलग पडलेल्या या भागात गरीबीपासून दहशतवादापर्यंत आणि फुटीरतेच्या मागणीपासून विकासापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. पण घरात शिरलेल्या प्रश्नांच्या या वादळांनी मात्र माणसांचं जगणं कित्येकपट अस्वस्थ करुन सोडलं आहे. या अस्वस्थेची उत्तरं काळाच्या प्रवाहात सापडतील की येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर प्रश्नांचा हा भोवरा वाढेल? या अस्वस्थ उत्तराखेरीज आज तरी कुणाच्याच हातात फारसं काही दिसत नाही!

( लेखिका लोकमत वृत्तसमूहात कार्यरत आहेत.)
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

Show comments