Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक संबंध- मागल्या पानावरून पुढे....

वेबदुनिया
सोमवार, 23 नोव्हेंबर 2009 (15:51 IST)
ND
ND
मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अमिर अजमल कसाब या अतिरेक्याला पकडले, त्यावेळी तुकाराम ओंबळेंना माहितही नसेल की आपण केवढा मोठा पुरावा गोळा करतोय. दुर्देवाने ते पहायला ओंबळे राहिले नाहीत. पण भारताला पाकिस्तानविरोधात प्रथमच या निमित्ताने सज्जड पुरावा मिळाला. कसाब पाकिस्तानी असल्या-नसल्याच्या कोलांट्या उड्या पाकिस्तानने कितीही मारल्या तरी तिथल्या पत्रकारांनी कसाबचे कूळ आणि मूळ शोधून काढून भारताच्या पुराव्यांना मदतच केली.

या हल्ल्यात पाकिस्तानी हात आहे हे कळाल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली. ती स्वाभाविकही होती. सरकारवरही दबाव वाढला. पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच हवा असे पुन्हा एकदा बोलले जाऊ लागले. पण धडा शिकवायचा म्हणजे नेमके काय करायचे ते मात्र कळले नाही. भारताने या काळात कोणतेही आततायी कृत्य केले नाही, पण पाकिस्तानशी बोलण्याची भाषा तेवढी कडक केली.

पाकिस्तान त्यांच्या देशातून संचलित होत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करत नसेल तर 'आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत,' हेही सांगून झाले. पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवर हल्ले करण्याची धमकीही तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. तिकडे पाकिस्तानही आम्ही कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचे सांगत होता.

उभय देशांत चाललेल्या या घडामोडींमुळे चिंतीत झालेल्या अमेरिकेने या दोन्ही देशांत पेटलेला संघर्ष थंड करण्यासाठी पाऊल उचलले. त्यासाठी उच्चपदस्थ नेत्यांनी उभय देशांच्या वार्‍या आरंभल्या नि फोनाफोनी सुरू झाली. दोघेही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने या संघर्षाचे अंतिम रूपांतर युद्धात झाल्यास नुसत्या दक्षिण आशियावरच नव्हे तर जगावर काय अनावस्था प्रसंग ओढवेल याची कल्पना इतर राष्ट्रांनाही आली होती. म्हणूनच अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या देशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यास बजावले.

अमेरिकेने असा दबाव अद्यापही कायम ठेवला आहे. केरी-लुगार विधेयकांतर्गत पाकिस्तानला दहशतवादासाठी लढण्यास मोठी मदत देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी त्या देशातून संचलित केल्या जाणार्‍या दहशतवाद्यांचा सफाया करण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे.

मुंबई हल्ल्यानंतर भारताने तातडीने पाकिस्तानसोबत सुरू असलेली बोलणी, व्यापार, राजनैतिक पातळीवरील चर्चा सारे काही थांबविले.

मुंबई हल्ल्यानंतर पाकने आयएसआयच्या प्रमुखांना भारतात पाठवावे असे भारताने सुचविले. अध्यक्ष झरदारी त्याला तयारही झाले होते. पण लष्कप्रमुख अश्फाक कियानींनी हस्तक्षेप करून 'आज आयएसआयप्रमुख उद्या मलाही पाठवाल, असे सांगत,' त्यास नकार दिला.

भारत-पाकमध्ये तणाव असला तरी तो युद्धात परिवर्तित होऊ नये याची काळजी अमेरिका घेत होती. म्हणूनच भारत कितीही ताठर भूमिका घेत असला तरी पाकला कानपिचक्या देत अमेरिकेने जे साध्य करायचे ते केले.


ND
ND
या घटनेनंतर गेल्या जुलैत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांची भेट रशियात शांघाय कॉर्पोरेशन समिटमध्ये झाली. त्यावेळी संपूर्ण माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मनमोहनसिंगांनी झरदारींना जाहिर कानपिचक्या देत, तुमच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ देऊ नका असे ठणकावून सांगितले. या पहिल्या बैठकीत भारताच्या पंतप्रधानांच्या आक्रमक भूमिकेने देशभरात कौतुकाची पावती मिळाली. त्यानंतर १६ जुलैला इजिप्तमध्ये शर्म अल शेख येथे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यासोबत त्यांची भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आपापल्या सहकार्‍यांना खोलीबाहेर काढत चर्चा केली. दोन तास चर्चा झाली. पण त्याचे फलित मात्र निराळेच निघाले. संयुक्त जाहिरनाम्यात परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा पुन्हा सुरू करावी, दहशतवादाशी चर्चेचा संबध न जोडता ती सुरूच राहू द्यावी आणि बलुचिस्तानातील स्वातंत्र्य चळवळीला भारतातर्फे फूस लावली जाते त्याचा शोध घ्यावा. या तीन मुद्यांभोवती केंद्रित जाहिरनामा प्रसिद्ध झाला नि भारतात वादळ उठले.

दहशतवादी घटना होतच असतील तर पाकशी चर्चा चालू ठेवण्यात अर्थ काय? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्याचवेळी बलुचिस्तानातील अतिरेक्यांना भारतातर्फे मदत केली जाते, या प्रकाराची चौकशी म्हणजेच तिथे भारतीय हस्तक्षेप मान्य करणे असा होत असल्याचा तर्क लढवून विरोधी पक्षाने मनमोहनसिंग सरकारला खिंडीत पकडले. त्यावर पंतप्रधानांनी निवेदन केले. पण त्यानंतरही पाकिस्तान आता वारंवार भारतासंदर्भात बलुचिस्तानचा उल्लेख करते आहे.

सुरवातीला मुंबई हल्ल्यात आपला सहभाग नाहीच असेच पाकिस्तान म्हणत होते. पण त्यानंतर ते मान्य केले. त्यासाठी काही लोकांना पकडण्यातही आले. त्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये छापे टाकण्यात आले. जमात उद दवाचा प्रमुख झाकिर उर रहमान लखवीसह अनेकांना पकडण्यात आले. पण त्यांना भारताच्या ताब्यात न देता पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर खटला चालवू असे सांगण्यात आले. या सगळ्यांचा कर्ताकरविता व लष्कर ए तोयबाचा प्रमुख हफीझ सईद मात्र मोकळा फिरतो आहे. त्याच्यावर कारवाईचे नाटकच तेवढे करण्यात आले.

भारताने या खटल्यासंदर्भात पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुंबई हल्ल्यात हात असल्याचे पुरावे देणारी कागदपत्रे पाठवली. त्यात शस्त्रे, दुधाची पाकिटे, कॅंडी बारचे कपटे, सॅटेलाईट फोन्स या सगळ्या वस्तू पाकिस्तानी बनावटीच्या होत्या. कराचीहून भारतापर्यंत आणण्यात आलेल्या नावेचा तपशीलही पुरवला. इतका तपशील पुरवूनही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करायला का कू करत होता.

आता अमेरिकेच्या एफबीआयने या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावत डेव्हिड हेडली उर्फ दाऊद गिलानीसह (कॅनडाचा नागरिक पण पाकवंशीय) तहव्वूर राणा या पाकिस्तानी नागरिकाला अमेरिकेत अटक केली आहे. यांची मुळे शोधण्यासाठी भारताने पाकला बजावले आहे.


पुढे काय?
मुंबई हल्ल्यासंदर्भात विचार करताना पाकिस्तानमध्येही वर्षभरात काय झाले ते तपासावे लागेल? भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍यांना आपल्याच देशांत आसरा देणारा पाकिस्तान या काळात स्वतःच खोदलेल्या खड्ड्यात पडला आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाची आपल्या कारवायांनी चाळणी केली आहे. पेशावर हे शहर बॉम्बस्फोटांच्या मुखावर वसले आहे. लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर हल्ला करून नंतर शेजारच्या मनावर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरही दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. स्वात खोरेही पाकिस्तानी तालिबान्यांनी ताब्यात घेतले होते. वझिरीस्तान, वायव्य सरहद्द प्रांतातही त्यांच्या हालचाली सुरू आहेत. एका मुंबई हल्ल्यात गेलेल्या बळींपेक्षा जास्त माणसे पाकिस्तानात गेल्या वर्षभरातील दहशतवादी हल्ल्यात मरण पावली आहेत. मुंबई हल्ल्याने भारत हादरला नि सावरलाही. पण पाकिस्तान मात्र हादरण्याने खिळखिळा झाला आहे.

दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकच्या डोक्यावरच या भस्मासुराने हात ठेवला आहे. आता मुंबई हल्ल्यासंदर्भात तपासाला पाकने मदत करावी यासाठी अमेरिकेने दबाव वाढविला आहे. भारतही तेच करतो आहे. पाक याला किती मदत करेल ते सांगता येणे आत्ताही शक्य नाही. पण दुसर्‍याचे वाटोळे करण्याच्या नादात स्वतःचेही वाटोळे होते, हा धडा या निमित्ताने पाकला शिकायला मिळाला हेही काही कमी नाही. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याबाबत पाक किती प्रामाणिक आहे हे पुढे कळेलच. पण त्यांनी ती प्रामाणिकता दाखवली नाही, तर मग मात्र या देशाला कोणीही वाचवू शकेल असे वाटत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments