Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी मुंबई बोलतेय...

विकास शिरपूरकर
बुधवार, 25 नोव्हेंबर 2009 (18:22 IST)
'' मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी Bombaim तर कधी बंबई आणि Bombay. गेल्‍या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्‍दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत. त्यालाच तुमच्या इंग्रजी की काय भाषेत म्हणतात ना 'मुंबई स्पिरीट', तेच ते....

वर्षे सरलीत. कॅलेंडरची पाने एकामागोमाग उलटत गेलीय, पण इतक्या वर्षांच्या माझ्या आयुष्यांत गेल्या वर्षीचा २६ नोव्हेंबरचा दिवस मात्र विसरू म्हणता विसरता येत नाही. जणू भूतकाळ ठप्प होऊन स्तब्ध झालाय. धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या थारोळ्यात पडलेली माझी लेकरं....ग्रेनेड, बॉम्ब नि गोळीबाराचे आवाज... जळालेल्‍या मानवी मांसाचा दर्प...मृत्यूचे तांडव चाललं होतं नुसतं.

माझ्या अंगाखांद्यांवर अभिमानानं लेवून मिरवावं अशा माझ्या वैभवशाली इतिहासाच्‍या पाऊखुणांवरच त्या 'नापाक' मंडळींनी घाला घातला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज आणि ओबेरॉय इतकचं काय ज्यू धर्मियांचं नरीमन हाऊस... या इमारतींत घुसून या दुष्टांनी धाडधाड गोळीबार करत निष्‍पाप, निरपराध आणि निरागस जीवांना निर्दयपणे ठार केलं. नृशंस हत्याकांडाचीही परिसीमा म्हणावी असंच हे चाललं होतं. जोडीला ग्रेनेडने हल्‍ले सुरूच होते. माझ्या लाडक्या ताजला तर विद्रुप करण्याचा जणू चंगच बांधला होता. माणसांना तर मारलंच, पण नंतर या वास्तुला आग लाव, हातबॉम्ब फोड असले उद्योगही त्या दुष्टांनी केले. 60 तास मृत्युचं हे तांडव सुरू होतं....

आणि मी हतबल होऊन सगळं काही पाहत राहण्‍याशिवाय काहीही करू शकले नाही....

पुढील पानावर पहा...








पण माझ्या नि माझ्या लेकरांच्‍या संरक्षणासाठी अगदीच तुटपुंज्या शस्‍त्रांसह धावून आलेले माझे ती वीरही आठवताहेत. निधड्या छातीनं दहशतवादाचा तो राक्षसी डाव उधळून लावण्‍यासाठी निघालेल्या त्या हेमत करकरे, विजय साळस्‍कर आणि अशोक कामटे नि त्यांना साथ देणारी त्यांच्या दलातली मंडळीही आठवतात. नि त्या नापाक धरतीचे इरादे जगापुढे उघड करणारा पुरावा आपल्या पोलादी हातांनी पकडून ठेवताना रक्त सांडलेले तुकाराम ओंबळेही आठवतात. माझ्या ताजची प्रतिष्ठा राखून तिथे लपलेल्या त्या भेकड दहशतवाद्यांवर तुटून पडलेला संदीप उन्नीकृष्णन नि कॅप्टन गजेंद्रसिंगही आठवतोय. नि या सगळ्यांच्या पराक्रमामुळेच मी वाचले. भर दरबारात द्रौपदीची अब्रू काढण्याचा प्रसंगच जणू होता. पण या वीरांनी आपले प्राण लावून माझी अब्रू वाचवली.

हे साठ तास मी कुढत होते, आतल्या आत. या साठ तासात माझी 173 लेकरं गेली. कित्येक जायबंदी झाली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. कित्येक अनाथ झाले. नि कित्येक अपंग. कितिकांची कितीक दुःख. असं वाटत होतं जणू त्यांच्या या दुःखाला मीच तर जबाबदार नाही? या जगात माझं महत्त्वंच इतकं वाढलं की माझी ही प्रतिष्ठा धुळीला मिळवायसाठी हा कट रचला गेला. नि त्यात या निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. हे थांबलं तरी माझ्या डोळ्यातली आसवे थांबत नव्हती. दहशतवाद्यांना मारले, पण मी कशी उभी राहू? पार खचूनच गेले होते मी. पुन्हा उभे रहाण्याची हिंमतच नव्हती माझ्यात. अगदीच असहाय झाले होते. पण मला धीर दिला, माझ्याच लेकरांनी. माझ्या मुंबईकरांनी.

माझ्यासाठी हा घाव मोठा होता, पण नवीन नव्हता. १९९३ मध्येही कुण्या दाऊदने बॉम्बस्फोट केले. त्याआधी दंगलही झाली. त्यानंतरही पुन्हा पुन्हा बॉम्बस्फोट होतच राहिले. दोन वर्षांपूर्वी २६ जुलैलाच महापूरही आला. संकटे मला नवीन नाहीत नि त्यांच्या मालिकाही. पण त्या प्रत्येकातून मी उभी राहिले. चालत राहिले. धावत राहिले. पण गेल्या वर्षीचा हल्ला माझ्या अगदी वर्मी लागला होता. पण तरीही दुसर्‍या दिवशी मी डोळे किलकिले केले नि त्याच छत्रपती टर्मिनसकडे पाहिलं, लोकल आली होती, लोक येत होते. लोकल येतच गेल्या नि लोकंही येत गेले. माझ्या दुःखी चेहर्‍यावर किंचित हसू पसरलं. पाण्याच्या काठावर माणसांचा समुद्र पुन्हा एकदा माझ्यात हेलकावू लागला.

माझं चैतन्य परत आलं. हसू पुन्हा फुललं. समाधान ओसंडून वाहू लागलं. दहशतवाद्यांना वाटलं एका हल्ल्यात मी संपून जाईन. धुळीत मिळून जाईल. जणू माझं वैराण वाळवंट होईल. पण तसं काहीच झालं नाही. तो हल्ला उरात ठेवूनही माणसं येतच राहिली. काम करतच राहिली. माणसांचा समुद्र पुन्हा एकदा काठोकाठ भरला. माझं 'स्पिरिट' लोकांमध्ये शिगोशिग भरलंय. एका हल्ल्याने ते विरून जाणार नाही, याची खात्री पटली.

कुणीतरी उगाच नाही म्हटलंय, 'मुंबई नगरी बडी बाका। तिन्ही लोकी वाजे तिचा डंका'

शेवटी मी मुंबई आहे. मुंबई. कधीच न थांबणारी. अखंड वाहत रहाणारी.....

मुंबई नगरी बडी बॉंका
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

काँग्रेसने बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांची 6वर्षांसाठी हकालपट्टी केली

मुंबई पोलिसांनी ट्रक मधून 80 कोटी रुपयांची 8476 किलो चांदी जप्त केली

महाराष्ट्रात ट्रेन रुळावरून उतरवण्याचा कट,चाकात लोखंडी गेट अडकले

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक,आतापर्यंत 24 आरोपींना अटक

उदय सामंत पुन्हा रत्नागिरीतून विजयी होणार की उद्धव सेना जाणून घ्या समीकरण

Show comments