Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १३
Webdunia
बुधवार, 9 डिसेंबर 2020 (23:22 IST)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा ।
हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥
तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता ।
गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥
तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन ।
ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥
दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला ।
रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥
तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा ।
दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥
मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी ।
मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥
ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत ।
माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥
आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण ।
विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥
भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली ।
वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥
गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत ।
मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥१०॥
कुबेर त्यांचा भंडारी । मग कशास फिरतां दारोदारीं ? ।
चिठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥
ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन ।
या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्यासाठीं ॥१२॥
श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठ-मठीं ।
ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥१३॥
स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा ।
अवघीं वनें हा बगीचा । पलंग ज्यांचा मेदिनी ॥१४॥
अष्टसिद्धि दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं ।
तो न तुमची पर्वा करी । त्याचें वैभव निराळें ॥१५॥
सविता सूर्यनारायण । त्यासी दीप कोठून ।
प्रकाश देऊं शकेल जाण । प्रतिकार करण्या तमाचा ॥१६॥
तो मुळींच प्रकाशमयी । त्याला दीपाचें काज नाहीं ।
हलकारा तो कोठून होई । सार्वभौमा भूषविता ? ॥१७॥
इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची ।
ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥१८॥
रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली ।
प्राणासाठीं नसे झाली । ती हें ध्यानीं धरा हो ॥१९॥
रोग भय शरीरास । नाहीं मुळींच प्राणास ।
जन्ममरण हेंही त्यास । नाहीं मुळीं राहिले ॥२०॥
तैसी तुमची सुसंपन्नता । रक्षण व्हाया सर्वथा ।
पुण्यरुप औषधी आतां । मिळणें भाग आहे कीं ॥२१॥
संपन्नता हें शरीर । रोग त्याचें अनाचार ।
त्याचा नाश होणार । या पुण्यरुप औषधीनें ॥२२॥
म्हणून पुण्यसंचय करा । कुतर्क ना चित्तीं धरा ।
पुण्य मेदिनीमाजीं पेरा । करा आपुल्या संपत्तीचा ॥२३॥
वीज पेरितां खडकावर । तें वायां जातें साचार ।
त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥
अनाचार दुर्वासना । हे खडक असती जाणा ।
तेथें टाकिल्यावरी दाणा । तो किडे पांखरें भक्षिती ॥२५॥
संतसेवेसमान । कोणतें नाहीं पुण्य आन ।
स्वामी सांप्रत गजानन । मुगुटमणी संतांचे ॥२६॥
संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा ।
एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥२७॥
त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती ।
तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥२८॥
ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर ।
खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥२९॥
नेता असल्या वजनदार । वर्गणी ती जमे फार ।
क्षुल्लकाच्यानें न होणार । कार्य कधीं वर्गणीचें ॥३०॥
असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं ।
झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥
बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें ।
दगड चुना रेतीचें । सामान गाडया वाहती ॥३२॥
त्या वेळीं समर्थस्वारी । होती जुन्या मठावरी ।
त्यांनीं विचार अंतरीं । ऐशा रीतीं केला हो ॥३३॥
आपण येथें बसल्याविणें । काम न चाले झपाटयानें ।
म्हणून कौतुक समर्थानें । केलें कसें तें परियेसा ॥३४॥
एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी ।
तो गाडीवान झाला दूरी । महार होता म्हणून ॥३५॥
तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? ।
आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ॥३६॥
महार बोले त्यावरी । महाराज तुमच्या शेजारीं ।
मी न बसे गाडीवरी । तें आम्हां उचित नसे ॥३७॥
मारुती रामरुप झाला । परी रामासन्निध नाहीं बसला ।
तो उभाच पहा राहिला । कर जोडूनी रामापुढें ॥३८॥
बरें बापा तुझी मर्जी । त्यास हरकत नाहीं माझी ।
बैलांनों, नीट चला आजी । गाडीवाल्यामागून ॥३९॥
बैल तैसे वागले । नाहीं कशास बुजाले ।
गाडीवाल्यावांचून आले । नीट सांकेतिक स्थलास ॥४०॥
समर्थ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले ।
तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥४१॥
ही जागा शेगांवांत । आहे दोन नंबरांत ।
त्रेचाळीस पंचेचाळीस । सातशें सर्व्हे नंबराच्या ॥४२॥
महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी ।
मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥४३॥
त्या दोन नंबरांतून । जागा थोडथोडी घेऊन ।
साधिला तो मध्य जाण । ऐसे चतुर कारभारी ॥४४॥
एक एकराचा हुकूम झाला । परी बांधकामाच्या वेळेला ।
समाधिमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥
त्यासाठीं म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण ।
जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥४६॥
पुढार्यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्यांनीं ।
आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥४७॥
यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास ।
परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥४८॥
यामुळें पुढारी । थोडे घाबरले अंतरीं ।
त्यांत जो पाटील होता हरी । तो बोलला समर्था ॥४९॥
अकरा गुंठे जागेचा । तपास करावया साचा ।
एक जोशी नांवाचा । आला असे अधिकारी ॥५०॥
हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला ।
जागेबद्दल जो कां झाला । दंड तुम्हां तो माफ होईल ॥५१॥
त्या अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती ।
चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥५२॥
कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला ।
दंड गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥५३॥
मी करुन आलों चौकशी । जाऊन त्या शेगांवासी ।
या घडलेल्या प्रकारासी । दंड होणें उचित नाहीं ॥५४॥
म्हणून तो माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला ।
तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥५५॥
तो म्हणे समर्थांचें । वाक्य ना खोटें व्हावयाचें ।
मजवरी किटाळ महाराचें । येऊन गेलें नुकतें एक ॥५६॥
त्या वेळीं महाराजांनीं । भिऊं नकोस म्हणोनी ।
तुझ्या एकाही केसालागुनी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥
तेंच खरें अखेर । घडून आलें साचार ।
तैसाच हाही प्रकार । आज दिनीं झालासे ॥५८॥
समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें ।
असो शेगांवाचे लागले । लोक भजनीं स्वामींच्या ॥५९॥
आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडले प्रकार ।
म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥६०॥
मेहेरकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला ।
त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥६१॥
यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग ।
उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥६२॥
करपद बोटें झडून गेलीं । तनूप्रती चढली लाली ।
कानाच्या सुजल्या पाळी । कंडू सुटला तनूतें ॥६३॥
म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती ।
समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥६४॥
श्रोते त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत ।
तुला रक्तपिति आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥६५॥
महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई ।
कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥६६॥
हा स्पर्शजन्य रोग फार । म्हणून वैद्य डाँक्टर ।
सांगती याचा विचार । तूं आपल्या मनीं करी ॥६७॥
परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती ।
येता झाला सत्वर गतीं । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥६८॥
डोई ठेवितां पायावर समर्थांनीं चापट थोर । मारिली त्याच्या डोक्यावर ।
अति जोरानें विबुध हो ॥६९॥
म्हणून तो उभा ठेला । समर्थास न्याहाळूं लागला ।
स्वामींनीं त्याचे थोबाडाला । दोन्ही करें ताडिलें ॥७०॥
फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ ।
खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥७१॥
तोच त्यांनीं मानिला । समर्थांचा प्रसाद भला ।
बेडका होता जो कां पडला । तयाचीया अंगावर ॥७२॥
तो त्यानें घेऊन करीं । चोळून अवघ्या शरीरीं ।
लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥७३॥
तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथें होता ।
तो गोसाव्यासी बोलतां । झाला पहा येणें रीति ॥७४॥
आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें ।
त्यावरी यांनीं टाकिलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥
तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला ।
जा लावून साबणाला । धुऊन टाकी सत्वर ॥७६॥
हे ऐसे वेडेपीर । विचरुं लागतां भूमीवर ।
त्यांशीं अंधश्रद्धेचे नर । साधु ऐसें मानिती ! ॥७७॥
त्याचा परिणाम ऐसा होतो । अविधि कृत्यांस ऊत येतो ।
तो येतां सहज जातो । समाज तो रसातळां ॥७८॥
यासी तुझेंच उदाहरण । तूं औषध घेण्याचें सोडून ।
आलास कीं रे धांवून । या वेडयापिशापाशीं ॥७९॥
गोसावी तें ऐकतां । हंसूं लागला सर्वथा ।
म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥८०॥
अमंगळ साधूपाशीं । कांहीं न राहतें निश्चयेंसी ।
कस्तुरीच्या पोटाशीं । दुर्गंधी ना वसे कदा ॥८१॥
तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा ।
कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥८२॥
तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास ।
हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥८३॥
त्यांत थुंक्याचें नांव नाहीं । अवघी औषधी आहे पाही ।
मी इतुका वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥
तुझा त्याशीं संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां ।
समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥८५॥
त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार ।
स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥८६॥
समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी ।
तेथल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥८७॥
ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला ।
तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥८८॥
मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची ।
तों गोसाव्याच्या हातींची । बसली औषधी होऊन ! ॥८९॥
कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित ! ।
दुर्गंधीही किंचित् । येत होती तियेला ॥९०॥
तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं ।
कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥९१॥
असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसूं देत नव्हतें ।
हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥९२॥
आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा ।
अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥९३॥
ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें ।
लालीनें तें सोडिलें । जयाचिया अंगाला ॥९४॥
चाफे झाले पूर्ववत् । भेगा पदींच्या निमाल्या समस्त ।
दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥९५॥
गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन ।
प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥
बायको गंगाभारतीची । अनुसूया नांवाची ।
ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥९७॥
संतोषभारती कुमार । होता तिच्याबरोबर ।
येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥९८॥
तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली ।
समर्थ साक्षात् चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असें ॥९९॥
मुलगा तेंच बोलला । म्हणे बापा गांवीं चला ।
पुसून गजानन महाराजाला । येथें राहणें पुरें झालें ॥१००॥
गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडूं कर ।
आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥१॥
ही अनाथाची माउली । स्वामी गजानन येथे बसली ।
त्यानें माझी उतरली । धुंदी चापट मारुन ॥२॥
राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत ।
केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥३॥
ऐसें संकेतें बोलले । थापटया मारुन जागें केलें ।
आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥४॥
हे संतोषभारती कुमारा । तूं तुझ्या आईस नेईं घरा ।
येथें नकोस राहूं जरा । सवडद जवळ करावें ॥५॥
हिचें जीवमान जोंवरी । तोंवरी हिची सेवा करी ।
ही तुझी माय खरी । हिला अंतर देऊं नको ॥६॥
मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा ।
पुंडलिकाचा ठेवावा । इतिहास तो डोळ्यांपुढें ॥७॥
मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत् ।
म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥८॥
आजवरी तुमचा होतों । आतां देवाकडे जातों ।
नरजन्माचा करुन घेतों । कांहीं तरी उपयोग ॥९॥
हा वायां गेल्या खरा । नराचा जन्म साजिरा ।
चुकेल चौर्यांशींचा फेरा । ऐसें साच सांगितलें ॥११०॥
समर्थकृपेनें निश्चिती । झाली मलाही उपरती ।
या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥११॥
ऐसें सांगून कुटुंबाला । मुलांसह सवडदाला ।
दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवीं ॥१२॥
पदपदांतरें समर्थांचीं । आवडीनें म्हणावीं साची ।
त्यास कला गायनाची। येत होती विबुध हो ॥१३॥
प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा ।
समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥१४॥
ऐकून त्याचें भजन । इतरांचेंही हर्षें मन ।
वस्तु अशीच आहे गान । रंजविणारी सर्वांतें ॥१५॥
हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला ।
मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥१६॥
असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी ।
बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥१७॥
मम भाच्याच्या गृहाला । अडगांवीं नेण्याला ।
मी आलों होतों आपणांला । तयीं आपुला करार ॥१८॥
ऐसा होता समर्था । मी नाहीं येत आतां ।
नको करुं आग्रह वृथा । पुढें मागें येईन ॥१९॥
त्याला दिवस झाले बहुत । आतां चला मुंडगांवांत ।
मी आहें आपुला भक्त । माझी इच्छा पूर्ण करा ॥१२०॥
मुडंगांवात माझे घरीं । कांहीं दिवस राहा तरी ।
मी अवघी करुन तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥
झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवीं आले साधुवर ।
दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥२२॥
झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा ।
मुंडगांव झालें गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥२३॥
पैठणामाजी एकनाथ । मुंडगांवीं गजानन संत ।
भजनी दिंडया अमित । आल्या भजन करावया ॥२४॥
आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका ।
तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥२५॥
झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी ।
भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥२६॥
झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार ।
लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥२७॥
स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहार दृष्टीनें ।
योग्यपरी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥
झ्यामसिंगा, हें अन्न । न येईल उपयोगाकारण ।
तुम्हां प्रापंचिकालागून । आपलेंच व्हावें वाटतें ॥२९॥
पंक्ती बसल्या भोजना । तों एका एकी आकाश जाणा ।
भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघाची ॥१३०॥
चमके वीज माथ्यावरी । झंझावात सुटला भारी ।
कडकडा ती कांतारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥
घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें ।
मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥
आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी ।
हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥३३॥
निवाराया पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा ।
आगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥
आतां पाऊस पडेल । तरी शेतीचें होईल ।
वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥
झ्यामसिंगे केलें पुण्य । हा भंडारा घालून ।
तें भोंवलें आम्हांलागून । वा खूप तर्हा पुण्याची ॥३६॥
तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा ।
तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥३७॥
आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी ।
पाहूं लागला पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥३८॥
मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें ।
हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥
दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला ।
तो नियम चालला । अजून या मुंडगांवीं ॥१४०॥
झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली ।
महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥४१॥
लोक त्या मुंडगांवांत । समर्थाचे झाले भक्त ।
पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्या असे ॥४२॥
हा उकिरडया नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा ।
भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारीं ॥४३॥
हें उकीर्डा नाम वर्हाडांत । पोर नसल्या वांचत ।
लोक नवसें ठेवितात । ऐसा प्रघात त्या प्रांतीं ॥४४॥
तें पेंटय्या तेलंगणांत । केर पुंजा महाराष्ट्रांत ।
तैसा उकीर्डा वर्हाडांत । नांव ठेविती बालकाचें ॥४५॥
हा पुंडलिक वद्य पक्षासी । करावया वारीसी ।
येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥४६॥
जैसें कां ते वारकरी । वद्यपक्षामाझारीं ।
जाती इंद्रायणीचे तीरीं । देहू आळंदी गांवाला ॥४७॥
तैसाच हा वर्हाडांत । वारी वद्यपक्षांत ।
करी येऊन शेगांवांत । परम भावभक्तीनें ॥४८॥
असो एकदां वर्हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात ।
बळावला अत्यंत । गांव बाहेर पडलें कीं ॥४९॥
या तापांत ऐसें होतें । प्रथमतां थंडी वाजते ।
अंग ज्वरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥
आणि कोठें तरी सांध्यावर । ग्रंथि उठे सत्वर ।
ती होतां करी जोर । वात तिच्या मागुनी ॥५१॥
मग रोगी बरळतसे । शुद्धि न कांहीं राहातसे ।
तलखी अंगाची होत असे । बेशुद्ध होई क्षणक्षणां ॥५२॥
पूर्वीं हा रोग विपरीत । नव्हता भरतखंडांत ।
त्याचा वास युरोपांत । होता मोठया प्रमाणीं ॥५३॥
ती सांथ इकडे आली । गांवोगांव पसरली ।
त्याच्या प्रतिकारा सोडून दिलीं । लोकांनीं तीं घरेंदारें ॥५४॥
त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी।
तों पुंडलिकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥५५॥
कसकस त्याला घरींच आली । परी ती त्यानें चोरिली ।
शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥५६॥
येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर ।
एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥
गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत ।
ऐसें पाहून पुसे तात । कां रे पुंडलिका ऐसें करिशी ? ॥५८॥
पुंडलिक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला ।
गोळा एक कांखेला । उठला आहे येधवां ॥५९॥
शक्ति सारी क्षीण झाली । आतां मशीं न चालवे मुळीं ।
काय करुं ही राहिली । वारी हायरे दुर्दैवा ॥१६०॥
हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना ।
दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्त वत्सला कृपानिधी ॥६१॥
वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर ।
जरी सांडलें शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥६२॥
माझा पुण्यठेवा हीच वारी । ती रक्षण आतां करी ।
ही सांथ झाली वैरी । नाश तिचा करावयातें ॥६३॥
शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर ।
बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिति ॥६४॥
तोही रडूं लागला । हा एकुलता एक पुत्र मला ।
देवा न दिवा नेईं भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥
उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास ।
आणूं का या समयास । तुला बाळा बसावया ॥६६॥
पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी।
उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥६७॥
मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास ।
नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥६८॥
बसत उठत पुंडलिक आला । अति कष्टें शेगांवाला ।
पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥६९॥
तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली ।
कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥१७०॥
आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका, तुझें गंडांतर
टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥७१॥
तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलिकाची गांठ जाणी ।
गेली जागच्या जागीं जिरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥
कंप अशक्ततेनें । राहिला देहाकारणें ।
करीं पुंडलिकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥७३॥
घांस त्या नैवेद्याचे । समर्थें घेतां दोन साचें ।
कांपरें तें पुंडलिकाचें । गेलें बंद होवोनिया ॥७४॥
पुंडलिक झाला पूर्ववत् । अशक्तता राहिली किंचित् ।
हें गुरुभक्तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥७५॥
गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी ।
कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥७६॥
सांग करुन वारीला । पुंडलिक गेला मुंडगांवाला ।
हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥७७॥
संतचरित्र ना कहाणी । अनुभवाची खाण जाणी ।
मात्र अविश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
सुखद होवो भाविकांप्रत । हेंच देवा मागणें ॥१७९॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥
श्रीगजाननविजयग्रंथअध्याय१४
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १२
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ११
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १०
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ९
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ८
सर्व पहा
नवीन
गुरुवारची आरती.. निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा..
आरती गुरुवारची
बाबा खाटू श्याम चालीसा
Budh Pradosh Vrat 2024: बुध प्रदोष व्रत आज, महत्व, पूजा विधी आणि उपाय
Tulsi Vivah 2024 तुळशी विवाहाची संपूर्ण विधी
सर्व पहा
नक्की वाचा
Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल
Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या
पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय
डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा
पुढील लेख
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १२
Show comments